गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी भाजपानं १६० उमेदवारांची पहिली यादी गुरुवारी जाहीर केली. या यादीत माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या मंत्रिमंडळातील ११ मंत्र्यांसह विद्यमान ६९ आमदारांना पुन्हा स्थान देण्यात आले. तर ३८ आमदारांचा पत्ता कट करण्यात आला आहे. भाजपानं पहिल्या यादीत २०१७ विधानसभा निवडणुकीतील जवळपास निम्म्या उमेदवारांना वगळलं आहे. गुजरातमधील पाटीदार समाजाच्या आंदोलनातून प्रकाशझोतात आलेले हार्दिक पटेल आणि क्रिकेटर रविंद्र जडेजाची पत्नी रिवाबा या नव्या चेहऱ्यांना भाजपानं संधी दिली आहे.
हार्दिक पटेल यांना विरमगाम तर रिवाबा जडेजा यांना उत्तर जामनगरमधून तिकीट देण्यात आलं आहे. विजय रुपाणी यांच्या मंत्रिमंडळातील पाच मंत्र्यांना तिकीट नाकारण्यात आलं आहे. मंत्रिमंडळात नंबर दोनचे मंत्री राजेंद्र त्रिवेदी आणि मोरबीचे आमदार ब्रिजेश मेरजा यांचेही तिकीट कापण्यात आले आहे. गुजरातच्या पहिल्या महिला सभापती निमा आचार्य यांनाही पहिल्या यादीत स्थान देण्यात आलेलं नाही. गेल्या पाच वर्षात काँग्रेसमधून भाजपात दाखल झालेल्या १९ उमेदवारांना भाजपानं तिकीट दिलं आहे.
काँग्रेस, आपच्या राजकीय खेळीमुळे भाजपाची डोकेदुखी वाढणार? गुजरातमधील कटरगाम मतदारसंघात कोण जिंकणार?
“भाजपा सहसा २० टक्के आमदार बदलत असते. लोकशाहीमधील निवडणुकांमध्ये बदल गरजेचा आहे. आम्ही अनेक युवकांना पक्षाचं तिकीट दिलं असून ३८ जागांवर बदल केले आहेत. या यादीत गुजरात भाजपाने पीढीनुसार बदल अंगिकारल्याचे दिसून येत आहे”, अशी प्रतिक्रिया भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सीआर पाटील यांनी दिली आहे.
अहमदाबादमध्ये १६ पैकी १५ मतदारसंघांच्या उमेदवारांची घोषणा झाली आहे. या क्षेत्रात मुख्यमंत्री पटेल आणि दोन विद्यमान आमदार वगळता इतर आमदारांना तिकीट नाकारण्यात आलं आहे. वाटवा विधानसभेच्या जागेसाठी अद्याप उमेदवाराची घोषणा करण्यात आली नाही. दरम्यान, सुरतमधील आठ मतदारसंघामध्ये नव्या चेहऱ्यांचा संधी देण्यात आली आहे. तर राजकोटच्या चारही जागांवरील उमेदवार भाजपानं बदलले आहेत. वडेदरामधील पाच पैकी तीन जागांवर नव्या उमेदवारांना संधी देण्यात आली आहे.