Madhya Pradesh Loksabha BJP Candidates आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने १९५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. या यादीत मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना विदिशामधून, तर ज्योतिरादित्य शिंदे यांना गुनामधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. प्रज्ञा ठाकूर हा भाजपाचा लोकप्रिय चेहरा आहे. परंतु या उमेदवार यादीत त्यांच्या नावाचा समावेश नाही.
नथुराम गोडसे संदर्भात केलेल्या वादग्रस्त विधानांमुळे प्रज्ञा ठाकूर यांना त्यांच्या भोपाळ लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी नाकरण्यात आली, असे सांगण्यात येत आहे. तर दुसरीकडे पक्षाला शिवराज सिंह चौहान, ज्योतिरादित्य शिंदे यांसारख्या महत्त्वाच्या नेत्यांना उमेदवारी देणे आवश्यक आहे; ज्यामुळे अन्य पाच खासदारांनादेखील उमेदवारी नाकारल्याचे सांगण्यात येत आहे. हा निर्णय पक्षासाठी अडचण ठरेल की यामागे पक्षाची काही रणनीती आहे? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. मध्ये प्रदेश भाजपात सध्या काय स्थिती आहे? यावर एक नजर टाकूया.
लोकसभेच्या २९ पैकी २४ जागांसाठी उमेदवार जाहीर
भाजपाने मध्य प्रदेश लोकसभेच्या २९ पैकी २४ जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. मागील निवडणुकीत या २४ जागांपैकी २३ जागा भाजपाने जिंकल्या होत्या. यात मागील निवडणुकीत चांगली कामगिरी करणाऱ्या विद्यमान खासदारांना उमेदवारी नाकारण्यात आली आहे. यात प्रज्ञा ठाकुर (भोपाळ), केपी यादव (गुणा), राजबहादूर सिंग (सागर), जे.एस. डामोर (रतलाम), रमाकांत भार्गव (विदिशा) आणि विवेक शेजवलकर (ग्वाल्हेर) या खासदारांच्या नावांचा समावेश आहे.
उर्वरित पाच जागांवर उमेदवार जाहीर झालेले नाही. मुरैना, सिधी, होशंगाबाद, जबलपूर आणि दमोह या पाच जागांवरही पक्ष नवीन उमेदवार उतरवणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण या जागांवरील विद्यमान खासदारांनी २०२३ च्या राज्य विधानसभेच्या निवडणुका लढवल्या आणि जिंकल्या आहेत. विशेष म्हणजे भाजपाने लोकसभेसाठी जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीत विधानसभा निवडणुकीत विजयी झालेल्या तीन नेत्यांचाही समावेश आहे.
प्रज्ञा ठाकूर यांना उमेदवारी नाकारण्याचे कारण काय?
महात्मा गांधींवर गोळ्या झाडणाऱ्या गोडसे यांचा ‘देशभक्त’ असा उल्लेख केल्यानंतर प्रज्ञा ठाकूर यांनी माफी मागितली होती. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही २०१९च्या सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानाच्या शेवटच्या टप्प्या आधी एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, ते प्रज्ञा ठाकूर यांना कधीच माफ करू शकणार नाही. “गांधीजी किंवा नथुराम गोडसे यांच्याबद्दल जी विधाने केली गेली आहेत, ती समाजासाठी अत्यंत वाईट आणि अत्यंत चुकीची आहेत. त्यांनी माफी मागितली असली तरी मी त्यांना कधीही माफ करू शकणार नाही, असे पंतप्रधान मोदी म्हणाले होते.
याव्यतिरिक्त, भाजपाच्या अंतर्गत सूत्रांनी सांगितले की, २००८ मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी प्रज्ञा यांचा मतदारांशी संपर्क नसल्यामुळे आणि योग्य कामगिरी नसल्यामुळे पक्षाने तिकीट नाकारले आहे. “त्यांनी (प्रज्ञा ठाकूर) बहुतेक भाजपा नेत्यांचे ऐकण्यास नकार दिला. यामुळेच त्या पक्षातील नेत्यांपासुन दुरावल्या. त्या खासदार झाल्यापासून भोपाळमध्ये फारसा विकास झाला नाही. त्यांनी केलेल्या वादग्रस्त विधानांमुळे त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता संपली,” असे भाजपा नेत्याने सांगितले.
प्रज्ञा ठाकूर यांना तिकीट नाकारल्याबद्दल प्रसारमाध्यमांनी विचारले असता, प्रज्ञा यांनी सांगितले, “मी कधीही वादग्रस्त टिप्पणी केलेली नाही. मी नेहमीच सत्य सांगितले आहे. पण माझ्या शब्दाने देशाच्या पंतप्रधानांना दुखावले आणि ते मला कधीच माफ करणार नाहीत असे म्हणाले, पण माझा असा हेतू नव्हता. मी तसे पुन्हा केले नाही. काँग्रेसने पंतप्रधानांवर आरोप केले आणि पक्षाची बदनामी केली, ” असे त्या म्हणाल्या.
ज्योतिरादित्य शिंदे यांना उमेदवारी देण्याचे कारण काय?
काँग्रेसमधून भाजपात प्रवेश केल्यानंतर भाजपाने शिंदे यांना राज्यसभेद्वारे संसदेत आणले होते. ते गुना या जागेवरून निवडणूक लढवत आहेत. २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार असताना शिंदे यानं माजी निष्ठावंत-भाजपा नेते के. पी. यादव यांच्याकडून १.२५ लाख मतांनी पराभव पत्करावा लागला होता. आता दोन्ही नेते भाजपामध्ये आहेत. यादव समुदायाला शिंदे सक्रिय खासदार असल्याचे दाखवून देतांना दिसले आहेत. गुना येथे नुकत्याच झालेल्या गारपिटीमुळे पीक नष्ट झाले आहेत. याबद्दल ज्योतीरदित्य शिंदे यांनी पंतप्रधान मोदींना पत्रे पाठवली आहेत.
गुना मतदारसंघात यादवांची मजबूत व्होटबँक असल्याने भाजपाला याचा फायदा होईल, अशी शक्यता आहे. काँग्रेसचे दिग्गज नेते आणि शिंदे यांचे प्रतिस्पर्धी दिग्विजय सिंह यांचा मुलगा राघोगडचे आमदार जयवर्धन सिंह म्हणाले, “गेल्या वेळी ते (शिंदे) गुना मतदारसंघातून का यशस्वी झाले नाहीत? कारण ते येथील रहिवासी नाहीत. केपी यादव हे रहिवासी आहेत. पण शिंदेजींना पुन्हा एकदा तिकीट देण्यात आले आहे.” परंतु काँग्रेसपुढे ज्योतीरदित्य शिंदे यांना टक्कर देणारा मजबूत उमेदवार शोधण्याचे आव्हान आहे.
भाजपाच्या एका नेत्याने सांगितले की, फारसा विरोध होणार नाही. यादव पक्षासोबत आहेत. गुनात भाजपाचाच विजय होईल, असा आम्हाला विश्वास आहे. इतर विद्यमान खासदार ज्यांना यंदा तिकीट देण्यात आलेले नाही, त्यापैकी राज बहादूर सिंह (सागर) यांची कामगिरी योग्य नसल्याचे मानले जात होते, तर जी.एस. डामोर (रतलाम) यांच्यावर सणासुदीसाठी पाण्याच्या टाक्यांच्या खरेदीसह अनेक भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत. यामुळे त्यांची लोकप्रियता कमी झालेली पाहायला मिळाली आहे.
शिवराज सिंह चौहान यांना लोकसभेचे तिकीट
माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान त्यांच्या जुन्या लोकसभा जागेवर विदिशामध्ये परतले आहेत. याचाच अर्थ असा की, विद्यमान खासदार रमाकांत भार्गव यांना ही जागा सोडावी लागणार आहे. चौहान यांच्या प्रमुख निष्ठावंतांनाही लोकसभेच्या जागांमध्ये स्थान देण्यात आले आहे. यात भोपाळ जागेसाठी आलोक शर्मा, दर्शन सिंह चौधरी (होशंगाबाद), विद्यमान खासदार रोडमल नगर (राजगढ), लता वानखेडे (सागर) आणि अनिता नगर सिंह चौहान (रतलाम) यांच्या नावांचा समावेश आहे.
ग्वाल्हेरमध्ये, माजी केंद्रीय मंत्री नरेंद्रसिंग तोमर यांना ग्वाल्हेर-चंबळ पट्ट्यातून लोकसभेत परत आणण्याचा विचार केला जात असताना, त्यांच्या तीन प्रमुख निष्ठावंतांना उमेदवारी देण्यात आली आहे. यात विद्यमान खासदार संध्या राय (भिंड), माजी आमदार शिवमंगल सिंह तोमर (मोरेना) आणि माजी खासदार भारत सिंह कुशवाह (ग्वाल्हेर) यांच्या नावांचा समावेश आहे. २०२३ च्या राज्याच्या निवडणुका लढवणारे तोमर सध्या मध्य प्रदेश विधानसभेचे अध्यक्ष आहेत.
उर्वरित पाच जागांचे काय?
भाजपाने ज्या पाच जागांसाठी उमेदवार अद्याप जाहीर केलेले नाहीत त्यात छिंदवाडा, इंदोर, बालाघाट, धार आणि उज्जैन यांचा समावेश आहे. छिंदवाडा मतदारसंघ राज्य काँग्रेसचे प्रमुख कमलनाथ यांचा बालेकिल्ला आहे. २०१९ मध्ये भाजपाचा या एकमेव जागेवर पराभव झाला होता. कमलनाथ यांचा मुलगा नकुल नाथ या जागेवर विद्यमान खासदार आहेत. नाथ यांच्या भाजपामध्ये प्रवेश करण्याच्या गोंधळामुळे, छिंदवाडामध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांचा मोठ्या प्रमाणावर भाजपात प्रवेश झाला आहे.
हेही वाचा : शानन जलविद्युत प्रकल्पावरून पंजाब-हिमाचलमध्ये वाद, ‘हा’ प्रकल्प नेमका काय आहे?
भाजपाच्या एका नेत्याने कबूल केले की, उर्वरित जागांसाठी नावे जाहीर करण्यास उशीर होत असेल तर पक्षाच्या विद्यमान खासदारांसाठी हे चांगले संकेत नाहीत. “पक्ष या जागांवर नवीन चेहरे आणि महिला उमेदवारांची निवड करू शकतो. छिंदवाड्याला तगड्या उमेदवाराची गरज आहे. भाजपा सत्ता टिकवण्याच्या आपल्या ध्येयाने मजबूत ट्रॅक रेकॉर्ड, स्थानिक लोकप्रियता, मतदारांशी संपर्क साधण्याची क्षमता असलेल्या उमेदवारांना संधी देईल.