केंद्रीय निवडणूक आयोगाने छत्तीसगडसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा केली आहे. छत्तीसगडमध्ये ७ आणि १७ नोव्हेंबर अशा दोन टप्प्यांत मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. असे असतानाच भाजपाने आपल्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत एकूण ६४ उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

९० पैकी ८५ जागांसाठी उमेदवार जाहीर

भाजपाने छत्तीसगड राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी दुसऱ्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या यादीत एकूण ६४ उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. सध्या भाजपाने एकूण ९० जागांपैकी ८५ जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. भाजपाने छत्तीसगडची निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. म्हणूनच की काय भाजपाने काही खासदारांना तसेच एका केंद्रीय राज्यमंत्र्याला छत्तीसगडच्या विधानसभा निवडणुकीत उतरवले आहे. भाजपाने प्रसिद्ध केलेल्या उमेदवारांच्या दुसऱ्या यादीत एकूण तीन खासदार आहेत. यामध्ये छत्तीसगड काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि बिलासपूरचे खासदार अरुण साओ यांचा समावेश आहे. त्यांना बिलासपूर जिल्ह्यातील लोर्मी येथून उमेदवारी देण्यात आली आहे. यासह रायगडच्या खासदार गोमाती साई यांनादेखील जासपूर जिल्ह्यातील पथालगाव येथून उमेदवारी देण्यात आली आहे. सरागुजाच्या खासदार तथा केंद्रीय आदिवासी कल्याण राज्यमंत्री रेणुका सिंह यांना कोरिया जिल्ह्यातील भारतपूर-सोहनात येथून उमेदवारी देण्यात आली आहे.

खासदारांना उतरवले छत्तीसगडच्या निवडणुकीत

भाजपाने उमेदवारांच्या पहिल्या यादीत दुर्गचे खासदार विजय बघेल यांना विद्यमान मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्याविरोधात उभे केले आहे. आदिवासी समाजातून येणारे माजी केंद्रीय मंत्री विष्णूदेव साई यांची भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारी समितीत निवड करण्यात आली होती. त्यानंतर त्यांच्या जागेवर साओ यांची भाजपाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली होती. विष्णूदेव साई यांना जसलपूर जिल्ह्यातील कुंकुरी येथून उमेदवारी देण्यात आली आहे.

१३ आमदारांची उमेदवारी कायम

सध्या आमदार असलेल्या एकूण १३ नेत्यांची उमेदवारी भाजपाने कायम ठेवली आहे. यामध्ये फक्त बिलासपूर जिल्ह्यातील बेलतारा मतदारसंघाचे आमदार रजनीश सिंह यांना अद्याप तिकीट मिळालेले नाही. भाजपाने अद्याप पाच जागांवर उमेदवार जाहीर केलेले नाहीत. या पाच जागांत रजनीश सिंह यांच्या मतदारसंघाचाही समावेश आहे. माजी मुख्यमंत्री रमण सिंह (राजनांदगाव), माजी मंत्री ब्रिजमोहन अग्रवाल (रायपूर शहर दक्षिण), अजय चंद्रकार (धामती जिल्ह्यातील कुरूड) आदी मोठे नेते यावेळी निवडणुकीच्या मैदानात आहेत.

दंगलीत मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या वडिलांना उमेदवारी

एप्रिल महिन्यात छत्तीसगडमधील बिरानपूर येथे जातीय दंगल झाली होती. अल्पसंख्याक समाजातील पिता आणि पुत्राचा मृत्यू झाल्यामुळे ही दंगल झाली होती. याच दंगलीत २३ वर्षीय भूनेश्वर साहू या तरुणाचा मृत्यू झाला होता. भाजपाने या तरुणाच्या वडिलांना म्हणजेच ईश्वर साहू यांना तिकीट दिले आहे. ईश्वर साहू हे बेमेतारा जिल्ह्यातील साजा या मतदारसंघातून निवडणूक लढवतील. सध्या या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व रविंद्र चौबे हे करतात.

एकूण १४ महिला उमेदवार

छत्तीसगडमध्ये एकूण २९ जागा या अनुसूचित जातींसाठी राखीव आहेत. असे असले तरी भाजपाने अनुसूचित जातीच्या एकूण ३० नेत्यांना उमेदवारी दिली आहे. येथे १० जागा अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राखीव आहेत. येथेही भाजपाने १० अनुसूचित जमातीच्या नेत्यांना उमेदवारी दिली आहे. भाजपाचे ३१ उमेदवार हे ओबीसी समाजातून येतात, तर आतापर्यंत जाहीर केलेल्या उमेदवारांमध्ये एकूण १४ महिलांचा समावेश आहे. माजी आयएएस अधिकारी ओ. पी. चौधरी यांनादेखील रायगड येथून उमेदवारी देण्यात आली आहे. प्रसिद्ध अभिनेते अनुज शर्मा यांनादेखील रायपूरमधील धारशिवा येथून उमेदवारी देण्यात आली आहे.

४३ उमेदवार पहिल्यांदाच निवडणुकीच्या मैदानात

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष अरुण साओ यांनी उमेदवारांच्या यादीबाबत प्रतिक्रिया दिली आहे. “सध्या जाहीर केलेल्या ८५ उमेदवारांपैकी ४३ जणांना पहिल्यांदाच तिकीट मिळालेले आहे. ३४ उमेदवारांचे वय हे ५० वर्षांपेक्षा कमी आहे. आम्ही तरुण तसेच अनुभवी नेत्यांना उमेदवारी दिल्याचे यातून स्पष्ट होते. चांगला अनुभव असलेल्या काही नेत्यांना आम्ही पुन्हा तिकीट दिलेले आहे”, असे साओ म्हणाले. यावेळी त्यांनी काँग्रेसवरदेखील टीका केली. काँग्रेस पक्षात अंतर्गत मतभेद आहेत, त्यामुळेच त्यांनी अद्याप आपल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध केलेली नाही, असे साओ म्हणाले.

भूपेश बघेल यांची भाजपावर टीका

दरम्यान, गेल्या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागलेल्या बहुसंख्य नेत्यांना यावेळी पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आलेली आहे. यामध्ये माजी मंत्री अमर अग्रवाल, राजेश मुनात, प्रेमप्रकाश पांडे, लता उसेंडी या काही नेत्यांचा समावेश आहे. काँग्रेसचे नेते तथा मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी मात्र भाजपावर टीका केली आहे. ज्यांना जनतेने नाकारलेले आहे, त्यांनाच भाजपाने पुन्हा उमेदवारी दिली आहे. त्यांच्याकडे नवा चेहरा नाही, असे बघेल म्हणाले.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp announces second list for chhattisgarh assembly election 2023 given tickets for mp prd
Show comments