नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या राष्ट्रीय युवा महोत्सवाला भव्य दिव्य व दिमाखदार स्वरुप देत भाजपसह महायुतीने युवा मतदार आणि आगामी निवडणुकीत प्रथमच मतदान करणाऱ्या नवमतदारांवर प्रभाव पाडण्यात कुठलीही कसर सोडली नाही. देशाची अर्थव्यवस्था जगातील पाचमध्ये येण्याचे श्रेय युवाशक्तीला देत पंतप्रधानांनी महामार्गांचा विस्तार, वंदे भारत रेल्वे, परदेशातील धर्तीवर विमानतळांचा कायापालट, हे सारे त्यांच्यासाठी असल्याची जाणीव करून दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुंभनगरीत देशातील युवकांचा कुंभमेळा भरल्याचे सांगत पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली भारताची महासत्तेकडे वाटचाल सुरू असल्याचा दावा केला. केंद्रीय क्रीडामंत्री तथा भाजपचे नेते अनुराग ठाकूर यांनी काँग्रेस सरकार आणि विद्यमान मोदी सरकार यांच्या कारभारातील फरकाचे दाखले दिले. महोत्सवात देशभरातील हजारो युवक सहभागी झाले आहेत. याचा अधिकाधिक राजकीय लाभ पदरात पाडण्याचा भाजपसह महायुतीचा प्रयत्न आहे.
हेही वाचा : नवी मुंबईतील दि.बा. पाटील नामांतराचा प्रश्न अधांतरीच, स्थानिकांमध्ये चलबिचल वाढली
केंद्र आणि राज्य युवा व क्रीडा विभागाच्यावतीने नाशिकमध्ये आयोजित पाच दिवसीय २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत दिमाखदार सोहळ्यातून सुरुवात झाली. उद्घाटन सोहळ्यापूर्वी त्यांचा शहरात जल्लोषात रोड शो झाला. पंचवटीतील काळाराम मंदिरात ते गेले. मंदिर परिसराची स्वच्छता करून त्यांनी श्रीरामाचे दर्शन घेतले. रामकुंडावर गोदापूजन करून मार्जन स्नान देखील केले. पंतप्रधानांच्या पूर्वनियोजित दौऱ्यात प्रारंभी युवा महोत्सव उद्घाटन आणि रोड शो हे दोनच कार्यक्रम असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले होते. काळाराम मंदिर दर्शन, गोदापूजन हे कार्यक्रम नंतर समाविष्ट झाले. राजकीय समीकरणे लक्षात घेऊन भाजप नेत्यांच्या आग्रहास्तव युवा महोत्सवाचे स्थळ अंतिम क्षणी सोलापूर ऐवजी नाशिक असे बदलले गेले. आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, महोत्सवाच्या आयोजनाच्या मिळालेल्या संधीचे सोने करण्यावर महायुती सरकारने भर दिला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘न भूतो न भविष्यति‘ अशा महोत्सवाचा संकल्प करुन तयारीला वेग दिला. अल्पावधीत दोन वेळा नाशिकला येऊन त्यांनी आढावा घेतला होता. भाजपचे संकटमोचक म्हटले जाणारे गिरीश महाजन हे नाशिकमध्येच तळ ठोकून होते. रोड शोवेळी रस्त्यावर उतरून त्यांनी गर्दीचे व्यवस्थापन केले. जखमी होऊनही ते मुख्य सभामंडपात सक्रियतेने कार्यरत राहिले. नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी प्रशासकीय यंत्रणा आणि शिवसेना (शिंदे गट) संघटनेच्या माध्यमातून मेहनत घेतली. पंतप्रधानांची सभा, रोड शो यशस्वी करण्यात भाजप आणि शिवसेनेचे नेते, कार्यकर्त्यांनी अक्षरश: झोकून देत काम केले. नियोजनात दृष्टीपथास न पडलेला राष्ट्रवादी अजित पवार गट थेट महोत्सव उद्घाटनावेळी अवतीर्ण झाला.
राष्ट्रीय युवा महोत्सव दिमाखदार करण्यासाठी ५२ कोटींचा खर्च अपेक्षित होता. त्यासाठी केंद्रीय युवा व क्रीडा मंत्रालयाने १० कोटींचा भार उचलला. उर्वरित ४२ कोटींची उपलब्धता महायुती सरकारने आपल्या तिजोरीतून केली. महोत्सवात सर्व महाविद्यालयांतील विद्यार्थी सहभागी होतील, याची काळजी प्रशासनाने प्राचार्यांच्या बैठकीतून घेतली होती. रोड शो मार्गावर हजारो विद्यार्थी, नागरिकांनी गर्दी केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फुले व पाकळ्यांची उधळण, जय श्रीरामच्या घोषणा देत स्वागत झाले. युवकांना मार्गदर्शन करताना पंतप्रधानांनी राजकारणातील घराणेशाहीला विरोध करण्यासह युवकांनी राजकारणात सक्रिय होण्याची गरज मांडली. केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही युवकांना साद घालत महोत्सवातून राजकीय लाभ उठवण्याची धडपड केल्याचे अधोरेखीत झाले. मुख्यमंत्री शिंदे यांनी तर, मोदी यांच्यावर वारेमाप स्तुतीसुमने उधळून आपण पूर्णपणे भाजपमय झाल्याचे दाखवून दिले. या भव्य शक्तीप्रदर्शनाचा आगामी निवडणुकांमध्ये लाभ उठविण्यासाठी महायुती अधिक जोरकसपणे कामाला लागेल हे नक्की.