२०२४ साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत विजयी कामगिरी करण्यासाठी काँग्रेस, भाजपा हे पक्ष आतापासूनच कामाला लागेल आहेत. राज्यपातळीवरील संघटन मजबूत करण्यासाठी या पक्षांकडून पक्षांतर्गत फेरबदल केले जात आहेत. हे फेरबदल करताना जातीय समीकरणं साधण्याचाही प्रयत्न या पक्षांकडून केला जात आहे. भाजपाने बिहारमध्ये नुकतेच विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदाची जबाबादारी आर्थिक मागास प्रवर्गाचे (ईबीसी) नेतृत्व करणाऱ्या हरी सहानी यांच्यावर सोपवली आहे.

हरी सहानी हे दरभंगाचे माजी जिल्हाध्यक्ष

बिहारमध्ये भाजपा सध्या विरोधी बाकावर आहे. भाजपाच्या दिल्लीमधील नेतृत्वाने बिहारच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी ओबीसी समाजाच्या नेत्याकडे सोपवलेली आहे. तर विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी उच्च जातीच्या नेत्याची नेमणूक केलेली आहे. त्यानंतर आता या पक्षाने विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी ईबीसी समाजातून येणारे हरी सहानी यांच्यावर सोपवली आहे. हरी सहानी हे बिहारच्या राजारणात फार चर्चेत राहणारे नाव नाही. ते याआधी दरभंगा जिल्ह्याचे अध्यक्ष होते.

“सहानी हे राज्य पातळीवरचेही नेते नाहीत”

सहानी यांच्याबाबत पक्षातील एका वरिष्ठ नेत्याने प्रतिक्रिया दिली आहे. “सहानी हे राज्य पातळीवरचेही नेते नाहीत. मात्र निशाद आणि सहानी समाजाच्या मतदारांना आकर्षित करण्यासाठी त्यांना ही संधी देण्यात आली आहे. मुकेश सहानी हे मल्लाह समाजाचे नेते म्हणून ओळखले जातात. त्यांचे प्रभुत्व कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे,” असे या नेत्याने सांगितले.

निशाद, मल्लाह समाजाच्या मतांसाठी हरी यांना संधी

भाजपा ईबीसी समाज तसेच निशाद आणि मल्लाह समाजाच्या मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे. विकासशील इंसान पार्टी पक्षाचे संस्थापक मुकेश सहानी यांचे मल्लाह आणि निशाद समाजातील लोक समर्थक आहेत. हीच मते स्वत:कडे खेचण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. गेल्या काही वर्षांवासून मुकेश सहानी हे आपली भूमिका सातत्याने बदलत आहेत. त्यांच्या या बदलत्या भूमिकेमुळे भाजपा आपले स्वत:चे अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून भाजपाने निशाद आणि सहानी समाजाचे नेते म्हणून हरी सहानी यांना विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेतेपद दिले आहे.

सहानी यांची राजकीय कारकीर्द

सहानी हे मुळचे दरभंगा जिल्ह्याचे आहेत. मुकेश सहानी हेदेखील याच जिल्ह्यातून येतात. या भागात ईबीसी समाज मोठ्या प्रमाणात आढळतो. सहानी यांनी २०१५ साली भाजपाच्या तिकिटावर दरभंगा ग्रामीण मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवली होती. मात्र या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. २०२० साली त्यांना दरभंगा जिल्ह्यातील केओटी या मतदारसंघासाठी तिकीट देण्यात आले होते. मात्र या जागेवर भाजपाने ऐनवेळी मुरारी मोहन झा यांना तिकीट दिल्यामुळे हरी सहानी यांनी माघार घेतली होती. त्यानंतर २०२२ साली हरी यांना विधानपरिषदेत आमदारकी देण्यात आली.

पद येताच नितीश कुमार यांच्यावर सडकून टीका

सहानी हे कबीरपंथी आहेत. ते मध्य प्रदेशातील बागेश्वर धामच्या धिरेंद्रकृष्ण शास्त्री महाराजांचेही अनुयायी आहेत. विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्यानंतर त्यांनी लगेच बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर ‘झिरो व्हॅटचा बल्ब’ म्हणत टीका केली. तसेच पक्षाने माझ्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. मी गेल्या अनेक वर्षांपासून पक्षाचा प्रामाणिक कार्यकर्ता आहे, असे म्हणत पक्षश्रेष्ठींचे आभार मानले.

Story img Loader