छत्तीसगड राज्यातील विधानसभा निवडणूक भाजपाने मोठ्या बहुमताने जिंकली. त्यानंतर आता लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने भाजपाने आपली तयारी सुरू केली असून छत्तीसगडमध्ये या पक्षाने महत्त्वाचा बदल केला आहे. भाजपाने छत्तीसगडच्या प्रदेशाध्यक्षपदी पहिल्यांदाच आमदार झालेल्या किरणसिंह देव यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. देव यांनी अरूण साओ यांच्याकडून प्रदेशाध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला आहे.
देव बस्तर जिल्ह्यातील दुसरे प्रदेशाध्यक्ष
किरणसिंह देव हे बस्तर जिल्ह्यातील जगदलपूरचे मतदारसंघाचे आमदार आहेत. गेल्या काही वर्षांपासून देव यांचे या प्रदेशात राजकीय प्रस्थ वाढत आहे. हीच बाब लक्षात घेऊन भाजपाने देव यांच्यावर प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे. २०१८ साली काँग्रेसने या प्रदेशातील १२ पैकी ११ जागांवर विजय मिळवला होता. एका जागेवर नंतर पोटनीवडणूक झाली होती. या पोटनिवडणुकीही येथे काँग्रेसनेच बाजी मारली होती. मात्र आता नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने एकूण १२ पैकी आठ जागांवर विजय मिळवला आहे. देव हे बस्तर जिल्ह्यातील दुसरे नेते आहेत, ज्यांची भाजपाने प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केलेली आहे. याआधी २०१९ ते २०२० या काळात छत्तीसगड भाजपाच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी बस्तर जिल्ह्यातीलच विक्रम उसेंडी यांच्यावर सोपवण्यात आली होती.
जातीय, प्रादेशिक समीकरण साधण्याचा प्रयत्न
देव यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती स्वत:चा विस्तार करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. जातीय समीकरण साधण्याचाही भाजपाने यातून प्रयत्न केला आहे.
भाजपाच्या नेत्यांकडून देव यांच्या नियुक्तीवर प्रतिक्रिया
देव यांच्या नियुक्तीनंतर छत्तीसगडचे नवनियुक्त मुख्यमंत्री विष्णू देव साय यांनी प्रतिक्रिया दिली. “देव यांच्या नेतृत्ववाखाली भाजपा छत्तीसगडमध्ये नक्कीच नवी उंची गाठेल” असे साय म्हणाले. “देव यांच्यात ती पात्रता आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काँग्रेसला छत्तीसगडमधून हद्दपार करू. आम्ही लोकसभेच्या पूर्ण ११ जागा जिंकू,” असेही साय म्हणाले. छत्तीसगड विधानसभेचे अध्यक्ष तसेच तीन वेळा मुख्यमंत्री राहिलेले रमणसिंह यांनीदेखील देव यांना शुभेच्छा दिल्या. देव यांच्या नेतृत्वाखाली आमचा प्रत्येक कार्यकर्ता भाजपाची विचारसरणी लोकांमध्ये पोहोचवणार आहे. आमचा कार्यकर्ता भाजपाचे विचार राज्याच्या दुर्गम भागापर्यंत घेऊन जाणार आहे, असे रमणसिंह म्हणाले.
विद्यार्थी नेता म्हणून राजकारणात
दरम्यान, देव यांच्या त्यांच्या राजकीय कारकिर्दीला १९८५ साली सुरूवात झाली. विद्यार्थी नेते म्हणून त्यांनी काही काळ भाजपा युवा मोर्चात काम केले. २००२ ते २००५ या काळात ते जगदलपूर येथील भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष होते. २०१८ ते २०२२ या काळात ते भाजपा पक्षाचे सरचिटणीस होते. ते जगदलपूर महापालिकेचे २०१४ ते २०१९ या काळात महापौर होते. देव यांनी वकिलीचे शिक्षण घेतलेले आहे. वकिली आणि शेती हा माझा व्यवसाय आहे, असे त्यांनी निवडणुकीच्या शपथपत्रात सांगितलेले आहे.