संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष नितीशकुमार यांनी विक्रमी म्हणजे नवव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची रविवारी शपथ घेतली. त्यांनी राजदशी असलेली युती तोडून भाजपाला सोबत घेत, बिहारमध्ये पुन्हा एकदा नव्या सरकारची स्थापना केली आहे. एनडीएप्रणीत या सरकारमध्ये नितीश कुमार मुख्यमंत्री असतील; तर त्यांना सरकारमध्ये मदत करण्यासाठी दोन उपमुख्यमंत्री असतील. भाजपाने उपमुख्यमंत्रिपदासाठी दोन नेत्यांची निवड करताना जातीच्या समीकरणाचा विचार केला आहे. आगामी लोकसभा निवडणूक लक्षात घेऊन, भाजपाने सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा यांना उपमुख्यमंत्रिपद दिले आहे.
चौधरी कुशवाह; तर सिन्हा भूमिहार
सम्राट चौधरी हे बिहार भाजपाचे प्रदेशाध्यक्ष; तर विजय सिन्हा हे माजी विरोधी पक्षनेते आहेत. चौधरी हे कुशवाह समाजातून येतात; तर सिन्हा हे भूमिहार समाजाचे आहेत. म्हणजेच भाजपाने बिहारमध्ये ओबीसी व उच्च जात अशा दोन्ही गटांतील नेत्यांची उपमुख्यमंत्रिपदी नियुक्ती केली आहे.
हेही वाचा >>> नितीश कुमार यांना भाजपाचा पाठिंबा, राज्यपालांकडे पत्र सादर, जाणून घ्या सत्तास्थापनेचं गणित!
याआधी तारकिशोर प्रसाद आणि रेणू देवी उपमुख्यमंत्री
२०२० मध्ये एनडीएच्या नेतृत्वाखाली नितीश कुमार यांनी बिहारची विधानसभा निवडणूक जिंकली होती. तेव्हा भाजपाने ओबीसी तारकिशोर प्रसाद आणि नोनिया समाजातून येणाऱ्या ईबीसी नेत्या रेणू देवी यांची उपमुख्यमंत्रिपदी नियुक्ती केली होती. ऑगस्ट २०२२ पर्यंत प्रसाद आणि रेणू देवी उपमुख्यमंत्रिपदी कायम होते. पुढे नितीश कुमार यांनी एनडीएतून बाहेर पडत राष्ट्रीय जनता दलाशी युती करून, पुन्हा एकदा सरकार स्थापन केले आणि या दोन नेत्यांचे उपमुख्यमंत्रिपद गेले.
चौधरी, सिन्हा नितीश कुमारांचे टीकाकार
आता पुन्हा एकदा नितीश कुमार यांनी भाजपाशी युती केली आहे. त्यामुळे यावेळी भाजपाने चौधरी आणि सिन्हा या द्वयींना उपमुख्यमंत्रिपद दिले आहे. हे दोन्ही नेते नितीश कुमार यांचे टोकाचे टीकाकार आहेत. विरोधात असताना हे नेते नितीश कुमार यांच्यावर टीका करण्याची एकही संधी सोडत नव्हते. आता मात्र ते नितीश यांच्यासह सत्तेत सहभागी झाले असून, एकत्र राज्यकारभार हाकणार आहेत.
हेही वाचा >>> “इंडिया आघाडीत फूट पडलेली नाही”; काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचा दावा! भाजपा फूट पाडत असल्याचाही गंभीर आरोप
“समान अटींवर सरकार चालवता यावे म्हणून…”
चौधरी आणि सिन्हा हे दोन्ही नेते आता नितीश कुमार यांच्याबाबत मवाळ धोरण स्वीकारतील, अशी अपेक्षा आहे. नितीश कुमार यांच्यावर अंकुश ठेवता यावा, याच कारणासाठी कदाचित भाजपाने या दोन नेत्यांवर उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सोपवलेली आहे. “सम्राट आणि सिन्हा हे जुळवून घेणारे नेते नाहीत. समान अटींवर सरकार चालवता यावे म्हणून कदाचित हा निर्णय घेण्यात आला असवा,” अशी प्रतिक्रिया भाजपाच्या एका नेत्याने दिली.
राज्याच्या राजकारणातच सक्रिय राहावे म्हणून चौधरी यांना उपमुख्यमंत्रिपद
ओबीसी मतदार ही नितीश कुमार यांची हक्काची व्होट बँक आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत ओबीसी मतदारांपर्यंत पोहोचता यावे म्हणून कदाचित भाजपाने चौधरी यांच्यावर उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सोपवलेली आहे. चौधरी यांनी राज्याच्या राजकारणातच अधिक सक्रिय राहावे म्हणूनदेखील त्यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली असावी, असा अंदाज राजकीय तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे.
हेही वाचा >>> बिहार, पंजाब, बंगालनंतर आता उत्तर प्रदेशमध्येही इंडिया आघाडीत खदखद? अखिलेश यादव यांची भूमिका काय?
ओबीसी, ईबीसी मतांना समोर ठेवून निर्णय
महाआघाडीच्या सरकारमध्ये नितीश कुमार यांनी जातीआधारित जनगणनेचा अहवाल सार्वजनिक केला आहे. या अहवालानंतर बिहारमध्ये ओबीसी, ईबीसी मतांना फार महत्त्व आले आहेत. त्यामुळेदेखील भाजपाने चौधरी यांना उपमुख्यमंत्रिपद दिले असावे. तसेच उच्च जातींचे मतदारही दूर जाऊ नयेत म्हणून सिन्हा यांचीही उपमुख्यमंत्रिपदी नियुक्ती करण्यात आली असावी, असे म्हटले जात आहे.