सौरभ कुलश्रेष्ठ
बुद्धिबळाच्या पटावर काही मोहरे असतात काही प्यादे असतात. राजाला शह देण्यासाठी प्रतिस्पर्धी समोरच्या मोहऱ्यांना लक्ष्य करून त्यांच्यावर हल्ले करत एकेकाला पटावरून दूर करतात. त्यापैकी बहुतांश मोहरे हे एकाच दिशेने हल्ला किंवा बचाव करतात. वझीर एकमेव असा मोहरा जो आडवा-उभा-तिरका सर्व प्रकारे चालतो. तो गारद झाला की राजाला शह देऊन डाव जिंकणे सोपे जाते. बुद्धिबळाचा हाच खेळ मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर आणि राज्यसभा-विधान परिषद निवडणुका जवळ असताना परिवहनमंत्री अनिल परब यांच्यावरील ईडीच्या छापासत्रातून सुरू झाला आहे. केवळ मातोश्रीचे विश्वासू नव्हे तर महापालिका निवडणुकीची वॉर रूम सांभाळणे, पश्चिम उपनगरातील वांद्रे ते दहिसर या पट्ट्यातील निवडणुकीत महत्त्वाची भूमिका पार पाडणे, केबल संघटनेच्या माध्यमातून आर्थिक-संघटनात्मक ताकद पक्षासाठी उभी करणे, राजकीय शक्तीप्रदर्शन-आंदोलन असो की प्रचारमोहिमेतील रस्त्यावरील लढाईतील शिवसेनेचा मोहरा अशा अनेक भूमिका पार पाडत मुंबईच्या राजकारणाच्या बुद्धिबळाच्या पटावर शिवसेना व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासाठी वझीर असलेले अनिल परब यांच्यावरील कारवाई हा भाजपचा निर्णायक हल्ला मानला जात आहे.
शिवसेनेत पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी वेगवेगळ्या नेत्यांवर वेगवेगळ्या जबाबदाऱ्या टाकत एकप्रकारे विकेंद्रीकरण केले आहे. कोणी केंद्रातील-राज्यातील इतर पक्षांशी संवादाची भूमिका आणि कागदपत्रांच्या कामात लक्ष घालतो. कोणी शिवसेनेसाठी अत्यंत किचकट अशा राजकीय वाटाघाटी अत्यंत चिकाटीने करतो. तर कोणी माध्यमांतून विरोधकांवर हल्ले करत पक्षाची भूमिका जोरकसपणे मांडतो. म्हणजेच बुद्धिबळाच्या भाषेत कोणी सरळ-उभा-आडवा, कोणी तिरकाच तर कोणी अडीच घर अशा ठराविक पद्धतीने चालतो. या पार्श्वभूमीवर कट्टर व रांगडे शिवसैनिक आणि त्याचवेळी कायदा-रणनीती यातील जाणकार असलेले अनिल परब हे महाराष्ट्रातील राजकारणासाठी नाही पण मुंबई महानगरपालिकेपुरते का होईना शिवसेना व उद्धव ठाकरे यांचे वझीर म्हणून काम करतात. नुकतीच वांद्रे येथे पार पडलेली शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विशाल सभा आयोजित करण्यात, त्या सभेत राजकीय शक्ती प्रदर्शनात महत्त्वाची जबाबदारीही परब यांनी पार पाडली होती.
मातोश्रीचे विश्वासू असल्यानेच संसदीय कार्य या वरकरणी तांत्रिक पण राजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील विभाग अनिल परब परब यांच्याकडे दिला गेला. मुंबईतील केबल व्यवसाय हा राजकीय अर्थकारणाचा मोठा भाग आहे. कार्यकर्ते-स्थानिक नेत्यांचे हितसंबंध त्यातून जपले जातात. या व्यवसायवर अनिल परब यांची संघटनात्मक पकड आहे. त्यातून पक्षासाठी एक निष्ठावंत फौज सज्ज ठेवण्याचे व राजकीय कार्यासाठी तिचा योग्यवेळी वापर करण्याचे कसब परब यांच्याकडे आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेची वॉर रूम हाताळण्याची मोठी जबाबदारी अनिल परब यांनी आतापर्यंत यशस्वीपणे पार पाडली आहे. कोणत्या प्रभागात काय समीकरणे आहेत, प्रतिस्पर्ध्यांची काय गणिते आहेत याचा पट मांडत रणनीती ठरवणे, पक्ष नेतृत्वाच्या आदेशानुसार प्रचार मोहिमेची आखणी व अंमलबजावणी करण्यात परब यांची भूमिका मोलाची असते. मुंबई महापालिका निवडणुकीत निर्णायक ठरणारा वांद्र ते दहिसर पट्ट्यात शिवसेनेसाठी ताकद लावण्याच्या कामगिरीत समन्वयाची महत्त्वाची भूमिका त्यांच्याकडे असते. वाद्रे व अंधेरीतील विभाग त्यांच्या अखत्यारित येतात. आता चांदिवली भागाची जबाबदारीही परब यांच्यावर टाकण्यात आली होती. या अशा विविध भूमिका पार पडत असल्यानेच मुंबईच्या पटावर ते मातोश्रीचे वझीर ठरत होते. त्यांच्या राजकीय यशात याच गोष्टी त्यांचे शक्तीस्थळ होत्या. आता याच शक्तीस्थळांमुळे ते विरोधकांच्या राजकीय वेढ्यात सापडले.
अनिल परब यांना ईडीने चौकशीसाठी बोलवल्यानंतरच हळूहळू त्यांच्याभोवतीचा फास आवळत नेण्यात येत असल्याचे संकेत भाजपच्या नेत्यांकडून वारंवार देण्यात येत होते. राज्यसभेच्या सहा जागांसाठी १० जूनला तर विधान परिषदेच्या १० जागांसाठी २० जूनला मतदान होत आहे. या दोन्ही निवडणुकीत यंदा अपक्ष आमदारांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. राज्यसभेसाठी खुले मतदान असले तरी विधान परिषदेसाठी गुप्त मतदान असते. अशावेळी पक्षाशी एकनिष्ठ असलेला संसदीय कार्यमंत्री म्हणून अपक्ष आमदारांशी संवादाची जबाबदारी अनिल परब यांच्यावरही होती. अशा मोक्याच्या वेळी ईडीच्या कारवाईची अत्यंत आक्रमक खेळी झाली असून मुख्यमंत्री ठाकरे यांच्या वझिराला पटावरून दूर करण्याचा डाव टाकण्यात आला आहे.