रवींद्र जुनारकर
चंद्रपूर : चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघातील ओबीसी मतदारांना आकर्षित करण्यासाठी विदर्भवादी ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे व रमेश राजुरकर या दोन नेत्यांच्या पक्षप्रवेशानिमित्ताने भाजपने शक्तीप्रदर्शन करीत लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले. स्थानिक पातळीवर भाजपमधून या दोन्ही नेत्यांच्या प्रवेशाला विरोध होता. मात्र, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आशीर्वादाने दोन्ही नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश झाला.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत चंद्रपूर मतदारसंघातून भाजपचे हंसराज अहीर यांचा काँग्रेसचे बाळू धानोरकर यांनी ४४ हजारापेक्षा अधिक मतांनी पराभव केला होता. राज्यात काँग्रेसचा एकमेव खासदार चंद्रपुरातून निवडून गेला. धनोजे कुणबी समाजाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या धानोरकर यांच्या पाठिशी ओबीसी समाज भक्कमपणे उभा राहिल्यामुळेच त्यांना चार वेळा या लोकसभा मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या अहीर यांचा पराभव करता आला. या पराभवातून धडा घेतलेल्या भाजपने आता सावध पवित्रा घेतला आहे.
हेही वाचा >>> जमाखर्च : चंद्रकांत पाटील; सूर हरवला….
चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात एकूण सहा विधानसभा मतदारसंघ मोडतात. या सहाही मतदार संघात ओबीसींची संख्या सर्वाधिक आहे. यामुळेच जीवतोडे व राजुरकर यांना भाजपने पक्षात सामील करून घेतले. त्यांच्या पक्षप्रवेशासाठी उपमुख्यमंत्री फडणवीस आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्युहरचना आखली होती. या पक्षप्रवेश सोहळ्यात फडणवीस यांनी केंद्र आणि राज्य सरकारने केलेल्या कामांचा लेखाजोखा मांडत ओबीसी समाजाला साद घातली. फडणवीसांनी या कार्यक्रमांच्या माध्यमातून भाजप हाच ओबीसींचा खरा उद्धारकर्ता आहे, असा संदेश दिला.
हेही वाचा >>> वसंतदादांच्या तिसऱ्या पिढीला विश्वजित कदमांचे नेतृत्व पचनी पडणार का?
तत्पूर्वी, केंद्रीय पर्यावरण, वन, श्रममंत्री भुपेंद्र यादव यांनीही आपल्या दोन दिवसांच्या चंद्रपूर लोकसभा मतदार संघाच्या दौऱ्यात ओबीसी समाजाला चुचकारण्याचा प्रयत्न केला. चंद्रपूर, राजुरा व वणी या ओबीसीबहुल विधानसभा मतदार संघातच त्यांचे सर्व कार्यक्रम झालेत. त्यांनीही ओबीसी समाजाचा खरा मित्र भाजपच असल्याचा संदेश दिला.
स्थानिक ओबीसी नेत्यांमध्ये अस्वस्थता
ओबीसी मतदारांची सर्वाधिक संख्या असलेल्या चंद्रपूर लोकसभा मतदार संघात भाजपकडे सध्यातरी एकही मोठा ओबीसी चेहरा नाही. माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री तथा मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर गवळी या अल्पसंख्यांक समाजातून येतात, तर राज्याचे वन, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार आर्य वैश्य समाजातून येतात. त्यामुळे भाजप ओबीसींना आकर्षित करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर जीवतोडे व राजूरकर यांच्या पक्षप्रवेशाने भाजपला किती फायदा होईल, हे कळेलच. तूर्त या दोन नेत्यांच्या प्रवेशाने भाजपमधील ओबीसी नेत्यांमध्ये कमालीची अस्वस्थता पहायला मिळत आहे.