Milkipur By Election Result 2025 : दिल्ली विधानसभा निवडणुकीबरोबर उत्तर प्रदेशातील मिल्कीपूर विधानसभा मतदारसंघाचीही पोटनिवडणूक पार पडली होती. या प्रतिष्ठीत लढतीत भाजपाने विजय मिळवला असून, चंद्रभानू पासवान यांनी समाजवादी पक्षाचे उमेदवार अजित प्रसाद यांना ६१,७१० मतांनी पराभूत केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

फैजाबाद लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या मिल्कीपूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपा ने सर्वस्व पणाला लावले होते. कारण २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत फैजाबादमध्ये भाजपाचा पराभव झाला होता आणि याच मतदारसंघात अयोध्येचाही समावेश आहे. भाजपाच्या या पराभवानंतर त्यांची देशभरातून खिल्ली उडवण्यात आली होती. फैजाबादमधून लोकसभा निवडणुकीत विजयी झालेले सपाचे उमेदवार अवधेश प्रसाद यांनी मिल्कीपूरच्या आमदारकीचा राजीनामा दिला होता, त्यामुळे ही पोटनिवडणूक लागली होती. यावेळी भाजपाच्या उमेदवारासमोर अवधेश प्रसाद यांचे पुत्र अजित प्रसाद सपाचे उमेदवार होते.

जातीय समिकरणे

भाजपाच्या विजयावरून असे दिसून येते की, मुलिम आणि यादव मतदार समाजवादी पक्षाच्या उमेदवाराबरोबर राहिले असले तरी, पासी आणि इतर अनुसूचित जाती समुदाय भाजपाच्या मागे उभे राहिला आहे. दरम्यान लोकसभा निवडणुकीत, पासी समुदायाच्या मतदारांनी समाजवादी पक्षाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती. पण, आता परिस्थिती बदलली आहे.

अनुसूचित जातींसाठी राखीव असलेल्या मिल्कीपूर विधानसभा मतदारसंघात सुमारे १.२५ लाख अनुसूचित जातीचे मतदार आहेत. त्यापैकी सुमारे ७०,००० पासी समाजाचे आहेत. तर मुस्लिम आणि यादव समाजाचे मतदार अनुक्रमे सुमारे ५५,००० आणि ३२,००० इतके आहेत. दुसरीकडे चौरसिया, विश्वकर्मा, मौर्य आणि चौहान यांसारख्या इतर मागासवर्गीयांनी भाजपला पाठिंबा दिल्याचे दिसून येते. ज्यांची संख्या ३० हजार इतकी आहे.

सपा उमेदवाराला सुरुवातीपासून विरोध

मुस्लिम आणि यादव वगळता जवळजवळ सर्व समुदायातील लोकांचा अजित यांच्या पोटनिवडणुकीतील उमेदवारीला विरोध झाल्याचे पाहायला मिळाले. त्यांचे असे मत होते की, सपाने दुसऱ्या कोणत्याही उमेदवाराला उमेदवारी दिल्यास चुरशीची लढाई झाली असती. तर मतदारसंघातील काहींचे असे मत होते की, फैजाबादचे खासदार लोकसभा विजयानंतर अहंकारी झाले असून, त्यांच्या मुलांप्रमाणे ते नागरिकांसाठी अनुपलब्ध झाले आहेत. याबाबत इंडियन एक्सप्रेसने वृत्त दिले आहे.

अनेक पासी-बहुल गावातील लोकही अजित यांच्या उमेदवारीवर नाराज होते. त्यांचा असा दावा आहे की, अवधेश यांनी त्यांच्या मुलाला उमेदवारी देत त्यांच्यासोबत काम करणाऱ्यांचा विचार केला नाही. त्यामुळे पासवान त्याच समुदायाचे असल्याने त्यांना संधी मिळायला हवी.

आदित्यनाथांनी घेतली प्रचाराची जबाबदारी

दुसरीकडे मिल्कीपूर विधानसभेची पोटनिवडणूक जिंकण्यासाठी जिंकण्यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सर्वाधिक प्रयत्न केले. यासाठी त्याेंनी स्वतः प्रचाराची जबाबदारी घेतली होती. निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्र्यांनी आठपेक्षा जास्त वेळा मतदारसंघाला भेट दिली. याचबरोबर प्रचारासाठी नऊ मंत्री आणि ४० आमदारांनाही मतदारसंघात पाठवले होते.