महाराष्ट्राची मोहीम फत्ते केल्यानंतर भाजपाने आता बिहारवर लक्ष केंद्रित केलं आहे. बहुमताच्या आकड्यांत पिछाडीवर असताना मित्रपक्षांशी हातमिळवणी करण्याचा अनुभव भाजपाला आहेच. महाराष्ट्रात भाजपाने शिवसेना आणि राष्ट्रवादीला मागे टाकले. त्यानंतर आता भाजपा बिहारमध्ये मित्रपक्ष जेडीयू (जनता दल युनायटेड)ला मागे टाकण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. त्यावरून भाजपा राज्यांमध्ये आपले सत्ता संतुलन टिकवत असल्याचे दिसून येते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

२०२० मध्ये जेडीयूने भाजपाच्या ८४ जागांपैकी ४८ जागा जिंकल्या. त्यावेळी भाजपाने मुख्यमंत्रि‍पदाची खुर्ची नितीश कुमार यांच्याकडे सोपवली. मागील लोकसभा निवडणुकीच्या आधी पुन्हा भाजपामध्ये परतण्यापूर्वी नितीश यांनी महाआघाडीकडे जाण्यामागच्या अस्वस्थतेचे हे एक कारण असू शकते. भाजपाने नितीश कुमार हेच भाजपाचा चेहरा असतील हे स्पष्ट केलं असेल तरी त्यामागे बऱ्याच अटी लागू केलेल्या आहेत. भाजपाकडे मित्रपक्ष चिराग पासवान यांच्या नेतृत्वाखाली लोक जनशक्ती पक्षाच्या रूपात दुसरा पर्याय आहेच. त्यावरून २०२० मध्ये भाजपा आणि लोक जनशक्ती पक्ष यांच्यात छुपे सामंजस्य होते, असे लक्षात येते.

गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये झालेल्या निवडणुकीत, महाराष्ट्रात भाजपाला त्यांच्या मित्रपक्षांच्या तुलनेत २८८ पैकी १३२ जागा मिळाल्या होत्या. एकनाथ शिंदेंनी निवडणुकीपूर्वी पुन्हा तेच पद कायम राखण्याचाही प्रयत्न केला. मात्र भाजपाने आपले संतुलन कायम राखले.

अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या ४१ आमदारांचा पाठिंबा भाजपाला मिळाला. त्यामुळे बहुमत हे भाजपाकडेच गेल्याने अखेर शिंदेंनी माघार घेतली.

तसेच महायुतीतली समीकरणे अस्थिर आहेतच. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना सुरू केलेल्या काही योजनांवर फडणवीस सरकारने प्रश्नचिन्ह उपस्थित केले. दुसरीकडे वैयक्तिक सचिव आणि इतर अधिकाऱ्यांच्या निवडीबाबतचे सर्व निर्णय फडणवीस यांच्याकडेच राहतील याची खातरजमा केली गेली. यांतून त्यांच्यातील अस्थिरता ठळकपणे दिसून येते. म्हणजे फडणवीस यांनी बोलावलेल्या बैठकांना शिंदे बहुतांश वेळी गैरहजर राहिलेले आहेत. नाशिक आणि रायगडमधील पालकमंत्री पदावरूनही दोन्ही पक्षांमध्ये तणावाचे वातावरण आहे.

शिंदे हे महाराष्ट्रातले एकमेव लोकनेते आहेत आणि भाजपा त्यांच्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही, असा युक्तिवाद शिवसेनेच्या एका नेत्याने केला आहे. शिवसेनेला यश मिळण्याची शक्यता तशी कमी आहे; पण दुसरीकडे शिंदे यांना पाठिंबा देणारे केंद्रीय नेतृत्व यात हस्तक्षेप करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. “भाजपासाठी ही एक विजयी परिस्थिती आहे. अजित पवार हे एक उत्तम व्यवस्थापक आहेत आणि ते महाराष्ट्रात भाजपासाठी गोष्टी सुरळीत करू शकतात”, असे एक नेते म्हणाले. सध्या एकनाथ शिंदे हे याआधी मुख्यमंत्री आणि सरकारचा चेहरा असल्याकारणाने ती प्रतिमा त्यांना टिकवायची असली तरी त्यांचे हात मात्र सध्या दगडाखाली आहेत.

बिहारमध्ये जेडीयूचे १२ खासदार केंद्रात भाजपासाठी महत्त्वाचे आहेत. मात्र, जेव्हा राज्याचा विचार होतो तेव्हा परिस्थिती वेगळी असते. अलीकडेच भाजपाने सात नवीन मंत्र्यांची निवड करून, पुढची दिशा कशी ठरवू शकतो याची झलक दाखवलीच आहे. या सात नेत्यांपैकी एक नेता कुर्मी तर दुसरा नेता कुशवाह समाजाचं प्रतिनिधित्व करतो. हे दोन्ही समुदाय नितीश कुमार यांचा मोठा पाठिंबा असल्याचे म्हटले जाते.

भाजपा नेत्यांनी असेही म्हटले आहे की, पक्षाच्या वाट्याला येणाऱ्या पदांसाठी इच्छुक चेहरे निवडण्याचा अधिकार तर आहेच. पण जागावाटपाच्या चर्चेपूर्वी आणि विधानसभा निवडणुकीची रणनीती आखण्यापूर्वी एनडीएमधली सत्ता समीकरणांवर प्रकाश टाकण्यास यामुळे नक्कीच मदत होईल.

सध्या बिहार विधानसभेतील विरोधी पक्षांनी असा दावा केला आहे की भाजपने पक्षाचे अपहरण केले आहे आणि नितीश यांचा चेहरा पुढे केलेला आहे. तसेच मुख्यमंत्र्यांच्या तब्येतीबाबतही अफवा पसरत असल्याने जेडीयूमध्ये एकंदर चिंतेचे वातावरण आहे.
महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपासाठी मराठा मतांची कमतरता भरून काढली. अशाच प्रकारे जेडीयूदेखील त्यांच्या मोठ्या संख्येतील विविध समुदायांमधील पाठिंब्यामुळे बिहारमध्ये हे ध्येय पूर्ण करील. याचाच अर्थ भाजपा युती सोडणार नाही.

काही सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बिहारमध्ये एनडीएने सत्ता मिळवल्यास काही काळासाठी का होईना नितीश कुमार यांना मुख्यमंत्रिपदी कायम ठेवले जाईल. दरम्यान, नितीश कुमार यांना मुख्यमंत्रि‍पदाचा चेहरा म्हणून समोर आणत, निवडणूक लढवण्याची मागणी जेडीयू पक्षाकडून वाढत आहे. सध्या महाराष्ट्रात सुरू असलेली राजकारणातील उलथापालथ पाहता, शिंदे गटाला फडणवीस सरकार कितपत सोबत ठेवू शकते याबाबत शंका आहेच. मात्र, बिहारमध्येसुद्धा महाराष्ट्रासारखीच परिस्थिती येईल की आणखी काही हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.