उमाकांत देशपांडे
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुरुवारच्या दौऱ्यात महापालिका आणि मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) या शासकीय यंत्रणांच्या अनेक प्रकल्पांची भूमीपूजने आणि लोकार्पण समारंभ वांद्रे-कुर्ला संकुलात डिजीटल पद्धतीने होणार आहे. पण या ठिकाणी होणार असलेली सभा ही भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना युतीकडून महापालिका निवडणुकीसाठी रणशिंग फुंकणाऱ्या राजकीय सभेप्रमाणे घेण्याची तयारी सुरू आहे. त्यास काँग्रेसने आक्षेप घेतला असून शासकीय समारंभांचा वापर राजकीय फायद्यासाठी करणे अयोग्य असल्याची टीका केली आहे. त्यामुळे या मुद्द्यावरून वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत.
हेही वाचा >>> “पेगासस, राफेल अन्…”, पंतप्रधानांविरोधात अपप्रचार करणाऱ्यांना निर्मला सीतारमन यांनी सुनावलं
भाजप-बाळासाहेबांची शिवसेना राज्यात सत्तेत आल्यानंतर पंतप्रधान मोदी प्रथमच मुंबई भेटीवर येत आहेत. मुंबई महापालिकेसह राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील काही महिन्यात होणार आहेत. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांच्या बीकेसीतील सभेची युतीकडून जंगी तयारी सुरू आहे. सभेसाठी एक-दीड लाखांची विक्रमी गर्दी जमविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. मोदींच्या भेटीच्या तयारीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जातीने लक्ष ठेवून आहेत. त्यासाठी त्यांनी दाव्होस येथील आंतरराष्ट्रीय वित्तीय परिषदेला जाण्याचे टाळले.
हेही वाचा >>> “लोकसभा निवडणुकीसाठी ४०० दिवस बाकी, त्यामुळे मुस्लीम समाजापर्यंत…”, पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कार्यकर्त्यांना आवाहन
शासकीय यंत्रणांच्या तयारीबरोबरच भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना यांच्याकडून मोदींच्या सभेची जोरदार तयारी सुरू असून दोन्ही पक्षांचे नेते गेल्या काही दिवसांपासून बीकेसी मैदानात जाऊनही बैठका घेत आहेत. शिंदे गटाचे मुंबईतील विभाग प्रमुख आणि ठाण्यातील नेत्यांकडूनही कार्यकर्ते जमविण्याची जोरदार तयारी सुरू आहे. मोदी विमानतळावरून बीकेसी मैदानात येण्याच्या मार्गावर आणि मेट्रो स्थानकांच्या परिसरात त्याचबरोबर शहरातील महत्वाच्या ठिकाणी युतीकडून जाहिरात फलक, पोस्टर्स लावण्यात येणार आहेत. बीकेसी मैदान परिसरातही मोठ्या प्रमाणावर जाहिराती, पक्षांचे झेंडे लावले जाणार आहेत. बीकेसी मैदानातील सभा ही राजकीय सभेप्रमाणे जंगी होईल, अशी तयारी भाजप व शिंदे गटाकडून सुरू आहे.
हेही वाचा >>> बीड जिल्ह्यातील देवेंद्र फडणवीसांच्या दौऱ्यापासून मुंडे भगिनी पुन्हा दूर
मात्र शासकीय समारंभांचा राजकीय वापर होऊ नये, असा आक्षेप काँग्रेस सरचिटणीस सचिन सावंत यांनी घेतला आहे. शासकीय यंत्रणांनीही राजकीय पक्षांकडून आपल्या कार्यक्रमांचा वापर होऊ नये, याची काळजी घेतली पाहिजे. युतीकडून तसे करण्यात आल्यास ते अयोग्य होईल, असे सावंत यांनी ‘ लोकसत्ता ‘ ला सांगितले.
मोदींच्या लोकप्रियतेमुळे गर्दी होणार – भातखळकर
पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणारे भूमीपूजन व लोकार्पणाचे कार्यक्रम शासकीय यंत्रणा व महापालिकेचे आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या अफाट लोकप्रियतेमुळे बीकेसीतील समारंभास गर्दी होईल. हीच काँग्रेस आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांची पोटदुखी आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत.. भाजप व बाळासाहेबांची शिवसेना युतीची सत्ता येईल, हे चित्र आत्ताच स्पष्ट आहे. त्यामुळे शासकीय समारंभांचा वापर राजकारणासाठी करण्याची आम्हाला गरज वाटत नाही. – आमदार अतुल भातखळकर, मुंबई भाजप प्रभारी