छत्रपती संभाजीनगर : एका बाजूला हिंदू मतांचे ध्रुवीकरण करण्यासाठी गावाचे नाव बदलण्याचा निर्णय घेतला जात असून दुसरीकडे लाभार्थींना मतदार करण्याच्या प्रक्रियेला राज्यात वेग देण्यात आला आहे. उत्तर प्रदेश निवडणुकीनंतर महिलाकेंद्रित योजनांवर लक्ष केंद्रित करत भाजपकडून आता त्यात योग आणि क्रीडा महोत्सवाची भर टाकण्याचे निर्देश देण्यात आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राज्यात यापूर्वी यश न मिळालेल्या लाेकसभा मतदारसंघात भाजपचे वेगवेगळे प्रयोग सुरू असून, चार- पाच मतदान केंद्रांसाठी अनौपचारिक पातळीवर भाजपने ठरविलेल्या शक्तिकेंद्रातील युवकांसाठी विस्तारकही नेमण्यात येत आहेत. कर्ज मेळावे, रोजगार मेळाव्याचे स्वरूप पूर्णत: राजकीय करण्यात आले असून, महिला मतदारांवर लक्ष केंद्रित केल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा – करमाळ्यातील बागल गट भाजपच्या वाटेवर

पंतप्रधान नरेंद्र मोदी महिलांच्या सर्व प्रश्नी कमालीचे सजग आहेत. तेच वेगवेगळ्या माध्यमांतून लाभ मिळवून देतात, असे चित्र मतदारांच्या मनात बिंबविण्याचे कार्यक्रम पद्धतशीरपणे आखले असून, याच श्रृखंलेतील ‘सेल्फी विथ लाभार्थी’ या कार्यक्रमाचे उद्घाटन अलिकडेच छत्रपती संभाजीनगर येथे केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर लगेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात प्रधानमंत्री स्वनिधीतील लाभार्थ्यांना कर्जवितरण करण्याचा कार्यक्रम केंद्रीय अर्थ् राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या हस्ते करण्यात आला.

हेही वाचा – राहुल गांधींच्या वादग्रस्त विधानांवरून संसदेत भाजपकडून काँग्रेसची कोंडी

एका बाजूला महिला लाभार्थी, दुसरीकडे कर्ज मेळावे घेत भाजपच्या बांधणीला ध्रुवीकरणातूनही वेग दिला जात आहे. छत्रपती संभाजीनगर, तसेच धाराशिव या दोन्ही मतदारसंघात नामांतराच्या, तसेच त्याला होणाऱ्या विरोधातून ध्रुवीकरणास लाभच होत असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रक्रियेत नवनवीन कार्यक्रमांची भर टाकण्यात येत असून, येत्या काही दिवसांत योगा शिबीर आणि क्रीडा महोत्सवातूनही नवी बांधणी केली जाणार असल्याची माहिती भाजपमधील सूत्रांनी दिली.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp building itself through yoga and sports festival print politics news ssb