उत्तर प्रदेशमधील अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनामुळे देशाच्या राजकारणाची दिशा बदलली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाकडून राम मंदिर उभारणीचा उल्लेख वेळोवेळी केला जाणार आहे. हा मुद्दा मागे पडू नये असाच भाजपाचा प्रयत्न आहे. तर दुसरीकडे भाजपाच्या याच रणनीतीचा सामना करून विरोधकांना मतदारांना आकर्षित करावे लागणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अर्थसंकल्प सादर करताना प्रभू रामाचा उल्लेख

लोकसभा निवडणूक जिंकायची असेल तर उत्तर प्रदेशमधील ८० जागा फार महत्त्वाच्या आहेत. या जागा ज्याने जिंकल्या त्याचीच सत्ता केंद्रात येते, असे म्हटले जाते. याच कारणामुळे भाजपाकडून राम मंदिराच्या मुद्द्याला घेऊन जोमात प्रचार केला जात आहे. उत्तर प्रदेश सरकारने नुकतेच आपला अर्थसंकल्प सादर केला. यावेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रभू रामाचा उल्लेख केला. हा अर्थसंकल्प प्रभू रामाला समर्पित आहे. अर्थसंकल्पाच्या प्रत्येक पानावर प्रभू राम आहेत, प्रत्येक शब्दात प्रभू राम आहेत, असे योगी आदित्यनाथ म्हणाले.

लोकांपुढे कोणता मुद्दा घेऊन जावे?

भाजपाच्या या भूमिकेमुळे विरोधकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. कारण उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पार्टी वगळता काँग्रेस आणि बहुजन समाज पार्टी (बसपा) या पक्षांची स्थिती फारशी चांगली नाही. भाजपाशी लढत द्यायची असेल तर नेमका कोणता मुद्दा समोर आणावा, याची चाचपणी हे पक्ष करत आहेत. गेल्या दोन्ही लोकसभा निवडणुकीत भाजपानेच या राज्यांत बाजी मारलेली आहे. त्यामुळे अशा वेळी अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणुकीत कोणता मुद्दा घेऊन लोकांपुढे जावे, असा प्रश्न या पक्षांना पडला आहे. कारण राम मंदिराचा मुद्दा तसा संवेदनशील आहे. त्याला थेट विरोध करता येणार नाही. राम मंदिराच्या उद्घाटन कार्यक्रमावर टीका करतानाही वादग्रस्त विधान करण्याचे विरोधकांनी टाळले होते. या कार्यक्रमाला थेट विरोध कोणत्याही विरोधी पक्षाने केला नव्हता.

समाजवादी पार्टी सर्वांत असुरक्षित

२०२२ सालच्या उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत समाजवादी पार्टीने समाधानकारक कामगिरी केली. हा पक्ष दुसऱ्या क्रमांकावर राहिला. मात्र पक्षाचे दिवंगत नेते मुलायमसिंह यादव यांनी १९९० साली राम मंदिर आंदोलनातील कारसेवकांवर कारवाई करण्याचा आदेश दिला होता. त्यामुळे समाजवादी पार्टी हा पक्ष या बाबतीत सर्वांत असुरक्षित आहे. अखिलेश यादव यांनी या मुद्द्यावर भाष्य करण्याचे टाळलेले आहे. मात्र पक्षाचे नेते शिवपाल यादव यांनी ‘मुलायमसिंह यादव यांनी कायदा आणि सुव्यवस्था कायम राखण्यासाठी गोळीबार करण्याचा आदेश दिला होता,’ असे स्पष्टीकरण दिलेले आहे.

राम मंदिर उद्घाटनावर समाजवादीची भूमिका काय होती?

राम मंदिर उद्घाटाचा कार्यक्रम हा राजकीय फायदा समोर ठेवून आयोजित करण्यात आला आहे, अशी भूमिका घेत काँग्रेसने या कार्यक्रमाचे निमंत्रण नाकारले होते. समाजवादी पार्टीने मात्र या कार्यक्रमाविषयी कोणतीही थेट भूमिका घेतली नव्हती. आम्हाला या कार्यक्रमाचे निमंत्रणच मिळाले नाही, असे अखिलेश यादव म्हणाले होते. तसेच ‘प्रभू रामाने बोलावल्यास मी दर्शनास नक्की जाईन. प्रभू राम जेव्हा स्वत:हून बोलावतात, तेव्हाच त्यांचे दर्शन घडते, असे म्हटले जाते,’ अशी प्रतिक्रिया अखिलेश यादव यांनी दिली होती. तर अखिलेश यांची पत्नी डिंपल यादव यांनी “निमंत्रण मिळाल्यास आम्ही नक्की जाऊ. तसेच आताजरी आम्ही दर्शनास नाही गेलो तरी भविष्यात अखिलेश यादव मंदिराला नक्की भेट देतील,” अशी प्रतिक्रिया दिली होती.

बसपाची भूमिका काय?

बसपा हा उत्तर प्रदेशमधील प्रमुख पक्षांपैकी एक पक्ष आहे. उत्तर प्रदेशच्या पूर्व, मध्य आणि पश्चिम भागात कुर्मी, यादव, लोहार, बधाई, लोनिया किंवा नोनिया, राजभर, कुंभार, मल्लाह, निषाद, कोरी (कुशवाह), जाट, गुर्जर, संथवार या जातीची लोकसंख्या जास्त आहे. या जातीत येणारे मागास समजले जातात. दलितांमधील जाटव समाजाच्या लोकांनी बौद्ध धर्म स्वीकारलेला आहे. त्यामुळे सोनकार, वाल्मिकी, पासी, धोबी या समाजाचे लोक हिंदू धर्मचेच पालन करतात. याच कारणामुळे बहुजन समाज पार्टीने राम मंदिर उद्घाटनाचे स्वागत केले आहे. या कार्यक्रमाचे राजकारण केले जात आहे, असा आरोप बसपाने केला होता. मात्र तरीदेखील या पक्षाने हिंदू धर्मीयांचे अभिनंदन करणारे निवेदन जारी केले होते.

हिंदू मतदारांना आकर्षित करण्यासाठी काँग्रेसची योजना काय?

उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसकडून हिंदू मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून काँग्रेसने उत्तर प्रदेशचे प्रभारीपद अविनाश पांडे या ब्राह्मण जातीच्या नेत्याकडे सोपवले आहे. तर प्रदेशाध्यक्षपद भूमिहार समाजातून येणारे अजय राय यांच्याकडे आहे. अयोध्येतील राम मंदिर उद्घाटनाच्या महिन्यात काँग्रेसने उत्तर प्रदेशमध्ये ‘उत्तर प्रदेश जोडो यात्रे’चे आयोजन केले होते. या यात्रेच्या माध्यमातून उत्तर प्रदेशच्या पश्चिम भागातील लोकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. या यात्रेदरम्यान, काँग्रेसच्या नेत्यांनी हिंदू आणि मुस्लीम अशा दोन्ही धर्माच्या प्रार्थनास्थळांना भेटी दिल्या. तर राम मंदिराच्या उद्घाटनाआधी उत्तर प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांनी तेथे तात्पुरत्या स्वरुपात उभारण्यात आलेल्या राम मंदिराची भेट घेत प्रभू रामाचे दर्शन घेतले होते.

बसपा, काँग्रेस आव्हान कसे पेलणार?

दरम्यान, राम मंदिराला केंद्रस्थानी ठेवूनच भाजपाकडून लोकसभा निवडणुकीसाठी प्रचार केला जाणार आहे. त्यामुळे काँग्रेस, बसपा हे आव्हान कसे पेलणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp campaign in up with ram temple congress bsp what challenges facing prd
Show comments