नाशिक : राज्यात मराठा, धनगर, ओबीसी आणि आदिवासी घटकात आरक्षणाच्या मुद्यावरून संघर्ष सुरू असताना दुसरीकडे भाजपने आदिवासी भागातील धर्मांतरितांना अनुसूचित जनजाती श्रेणीतून वगळण्यासाठी खास मोहीम हाती घेतली आहे. आदिवासी भागात धर्मांतराचे प्रमाण मोठे आहे. नाशिकसह संपूर्ण देशात त्याची पाळेमुळे खोलवर रुजली असून देशातील अनुसूचित जनजाती समाजासाठी हा धोका असल्याकडे भाजपच्या जनजाती सुरक्षा मंचने लक्ष वेधले आहे. धर्मांतरणाने आदिवासी समाजाला त्यांच्या मूळ संस्कृती व परंपरापासून दूर नेले जात असल्याचा आक्षेप घेत मंचने नाशिक येथे आदिवासी बांधवांच्या मेळाव्याचे आयोजन केले आहे.
या मेळाव्यासाठी भाजपने सिंहस्थ नगरीची निवड केली आहे. २९ ऑक्टोबर रोजी त्र्यंबक रस्त्यावरील हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर आयोजित मेळाव्याची जय्यत तयारी भाजपचे स्थानिक लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांनी चालविली आहे. प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांनी मेळाव्याच्या पूर्वतयारीचा नुकताच आढावा घेतला. हजारो आदिवासींना मेळाव्यात सहभागी करून भाजप शक्ती प्रदर्शन करण्याच्या तयारीत आहे. दसऱ्याच्या दिवशी आदिवासी बांधवांना सोने (आपट्याची पाने) वाटप करून त्यांच्याशी सुसंवाद साधला जाईल. यावेळी मेळाव्यात सामील होण्याचे निमंत्रण देण्याची सूचना कार्यकर्त्यांना करण्यात आली आहे.
या मेळाव्यातून धर्मांतर करणाऱ्यांविरोधात महत्त्वाच्या मागण्या भाजप पुढे करणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यात सध्या आरक्षणाचा विषय चांगलाच तापला आहे. मराठा-ओबीसी आणि आदिवासी-धनगर समाज परस्परांविरोधात शुड्डू ठोकून उभे आहेत. या वातावरणात भाजप धर्मांतर करणाऱ्यांचा विषय ऐरणीवर आणत आहे. धर्मांतरित झालेल्या नागरिकांना अनुसूचित जनजाती श्रेणीतून तत्काळ दूर करावे. त्या संदर्भात आवश्यक संविधानिक संशोधन केले जावे, ही जनजाती सुरक्षा मंचची प्रमुख मागणी आहे. भोळ्या, भाबड्या आदिवासींचे धर्मांतर करण्याचे प्रकार नवीन नाहीत, परंतु यात सातत्याने वाढ होत असून त्याची विशेष काळजी वाटत असल्याचे मंचने म्हटले आहे. या महामेळाव्यात त्या अनुषंगाने धर्मांतरित व्यक्तींना अनुसूचित जमातींच्या यादीतून वगळणे (डि लिस्टिंग) या एकाच मागणीचा हुंकार असणार असल्याचे भाजपने म्हटले आहे.
नशिक जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून आदिवासी बांधव या मेळाव्यात सहभागी होतील. त्यांच्यासाठी वाहन व्यवस्थेची तयारी करण्यात आली आहे. आदिवासी समाजासाठीच्या केंद्र व राज्य शासनाच्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचे नियोजन आहे. मेळाव्यास येणाऱ्या आदिवासी बांधवांची कुठलीही गैरसोय होणार नाही, याची पुरेपूर काळजी घेतली जाणार आहे. भाजपच्या आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी प्रत्येक मंडळ अध्यक्षांकडून नियोजित कार्यक्रमाविषयीच्या रचनांचा आढावा घेतला. त्या रचना प्रभावीपणे राबविण्याबाबत मार्गदर्शन केले. दिवाळीच्या निमित्ताने आदिवासी बांधवांना फराळ वाटपाच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
हेही वाचा – १९८४ नंतर पहिल्यांदाच शीखबहुल भागात काँग्रेसची सभा; काय असेल काँग्रेसची रणनीती ?
जय्यत तयारी
आदिवासी बांधवांचा मेळावा यशस्वी करण्यासाठी भाजपचे शहर-ग्रामीण भागातील सर्व आमदार, आजी-माजी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्ते विविध पातळीवर तयारी करीत आहेत. भोजन, वाहनतळ, आसन, मंडप, व्यासपीठ उभारणी आदींसह आवश्यक व्यवस्थांसाठी समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. कामांची जबाबदारी त्या त्या समितीवर सोपविली गेली असून प्रत्येक व्यवस्थेची जबाबदारी सांभाळणाऱ्या प्रमुखांची नावे भाजपचे महानगर अध्यक्ष प्रशांत जाधव यांनी जाहीर केली. नाशिक ग्रामीणचे अध्यक्ष सुनील बच्छाव व शंकर वाघ यांनी मेळाव्यातील विविध व्यवस्था व वाहन व्यवस्थेबाबत माहिती दिली.