महेश सरलष्कर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘गुजरातचे मुख्यमंत्री ते पंतप्रधान’ अशा वीस वर्षांच्या राजकीय सत्ताप्रमुखपदाच्या प्रवासावर आधारित ‘मोदी @ २०’ हे इंग्रजी पुस्तक प्रकाशित झाले आहे. त्यानिमित्ताने भाजपने देशभर जनसंपर्क मोहीम राबवली असून त्याअंतर्गत मेळावे घेतले जात आहेत. ही मोहीम गतिमान झाली असून आत्तापर्यंत सुमारे पाचशे मेळावे घेण्यात आले आहेत, पुढील दोन आठवडे ते महिनाभरात आणखी ५०० मेळावे घेतले जातील. महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत २० मेळावे झाले असून सुमारे ४० मेळावे होणार आहेत.
भाजपची ‘मोदी@२०’ ही मोहीम प्रामुख्याने लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आखण्यात आली आहे. नव्या संभाव्य मतदारांना भाजपशी जोडून घेणे तसेच, विधानसभा व लोकसभा निवडणुकीसाठी मोदींचे नेतृत्त्व खुंटी हलवून बळकट करणे असे दोन प्रमुख उद्देश असल्याचे मानले जाते. या मोहिमेअंतर्गत प्रत्येक जिल्ह्यामध्ये किमान दोन मेळावे घेतले जातात.
हेही वाचा… जळगावमध्ये शिंदे गटाच्या आशा पल्लवीत
पहिल्या मेळाव्यात शिक्षक, प्राध्यापक, डॉक्टर, वकील, व्यापारी, उद्योजक, व्यवस्थापक अशा विविध क्षेत्रांतील व्यावसायिकांना निमंत्रण दिले जाते. व्यावसायिकांच्या गटामध्ये ‘मोदी@२०’ या पुस्तकाच्या निमित्ताने मोदींचे सुशासन हा चर्चेचा विषय असतो. याशिवाय, देशाच्या राजकारणावर, भाजपच्या राजकीय धोरणांवर, केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजनांवर, मोदींच्या कार्यपद्धतीवर, भाजपच्या आगामी कार्यक्रमांवरही चर्चा केली जाते. मुख्यतः भाजपशी जोडल्या न गेलेल्या पण, निर्णयप्रक्रियेत महत्त्वाच्या ठरू शकणाऱ्या समाजातील घटकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला जातो. या मेळाव्यांमध्ये भाजपचे प्रतिनिधीही उपस्थित असतात. ‘मोदी@२०’मधील दुसरा मेळावा, विद्यापीठांमध्ये वा शैक्षणिक संस्थांमध्ये घेतला जातो. तिथे विद्यार्थी व शिक्षक आपापसांमध्ये ‘मोदी@२०’ या पुस्तकावर चर्चा करतात. महाविद्यालयीन विद्यार्थी हे भाजपचे नजिकच्या भविष्यातील मतदार होऊ शकतात, हा मुद्दा अप्रत्यक्षपणे ‘मोदी@२०’च्या मोहिमेतून अधोरेखित होत आहे. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकशाही मार्गाने निवडून येऊन राज्य आणि केंद्रांमध्ये दोन दशके प्रमुख भूषवत आहेत. हा आकड्यांतील विक्रम नव्हे तर, लोकांचा त्यांच्यावरील विश्वास आहे. सलग २१ वर्षे सत्तेच्या प्रमुखपदावर राहणे हे सुशासनामुळे मोदींना शक्य झाले आहे. हाच संदेश देशभर लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मोदी@२० ही मोहीम राबवली जात आहे’, अशी माहिती राज्यसभेचे खासदार व या मोहिमेचे समन्वयक प्रकाश जावडेकर यांनी दिली.
हेही वाचा… चंद्रकांत पाटील यांची जबाबदारी वाढली
‘मोदी@२०’ या मूळ इंग्रजी पुस्तकाची हिंदी आवृत्तीही काही दिवसांपूर्वी प्रकाशित झाली असून गुजरात, दिल्ली, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये प्रकाशनाचे कार्यक्रम घेण्यात आले. उत्तर प्रदेशात मोदींचा लोकसभा मतदारसंघ, वाराणसीमध्येही पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम झाला. इंग्रजी व हिंदी आवृत्तीनंतर आता मराठी, गुजराती, कन्नड, तामीळ, तेलुगु आणि उडिया या भाषांमध्येही ‘मोदी@२०’चा अनुवाद केला जाणार आहे. मराठीतील अनुवादित पुस्तकाचे प्रकाशन ऑक्टोबरमध्ये होणार असल्याची माहिती जावडेकर यांनी दिली.
हेही वाचा… दसरा मेळाव्यापूर्वी शिवसेनेला मोठा धक्का देण्याची शिंदे गटाची योजना
‘इन्फोसिस’चे सह-अध्यक्ष नंदन निलेकणी, ‘इन्फोसिस’ फाऊंडेशनच्या अध्यक्ष सुधा मूर्ती, सद् गुरू जग्गी वासुदेव, अभिनेते अनुपम खेर, कृषि तज्ज्ञ अशोक गुलाटी, अर्थतज्ज्ञ अरविंद पनगढिया, हृदय शल्यचिकित्सक डॉ. देवी शेट्टी अशा अनेक मान्यवरांनी मोदींशी झालेल्या प्रत्यक्ष संवादांचे अनुभव या पुस्तकात मांडलेले आहेत. या पुस्तकाला गानसम्राज्ञी दिगंवत लता मंगेशकर यांनी प्रस्तावना लिहिलेली आहे. विविध प्रादेशिक भाषांमध्ये पुस्तक अनुवादित झाले तर, स्थानिक भाषेत लोकांना मोदींच्या नेतृत्वाचे महत्त्व समजू शकेल. मातृभाषेतून लोकांशी जोडून घेणे अधिक सोपे जाते, असे जावडेकर म्हणाले.
हेही वाचा… महाराष्ट्रानंतर तेलंगणातील सरकार पडणार? भाजपा प्रदेशाध्यक्षांच्या दाव्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ
काँग्रेस सरकारच्या काळात नंदन निलेकणी हे ‘आधार’ यंत्रणेच्या अंमलबजावणीचे प्रमुख होते. त्यावेळी १५ कोटी आधारकार्डांचे वाटपही झाले होते. त्यानंतर, निलेकणी यांना २०१४ मध्ये काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी दिली. मोदी पंतप्रधान झाल्यावर ‘आधार’चे काम काढून घेतले जाईल असे त्यांना वाटले होते पण, मोदींनी निलेकणींचे तीन तासांचे सादरीकरण पाहिले आणि त्यांनी निलेकणींकडेच या कामाची जबाबदारी कायम ठेवली. असे ‘मोदींच्या सुशासना’चे अनुभव पुस्तकात असून हा मुद्दा मेळाव्यांमधील चर्चेतील महत्त्वाचा घटक असल्याचे जावडेकर यांनी सांगितले.