लोकसभा निवडणुकीत राम मंदिराचा मुद्दा केंद्रस्थानी आहे. देशातील प्रचारसभांमध्ये भाजपा राम मंदिर मुद्द्यावर जोर देताना दिसत आहे. परंतु, स्वतः छोट्या पडद्यावर प्रभू श्रीरामाची भूमिका साकारणारे अरुण गोविल यांनी केवळ राम नामानेच हा विजय शक्य नसल्याचे सांगितले आहे. अरुण गोविल यांना भाजपाने मेरठ लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

१९८० मध्ये छोट्या पडद्यावर गाजलेल्या रामायण या मालिकेत प्रभू श्रीरामाची भूमिका साकारणाऱ्या अरुण गोविल यांनी मेरठमध्ये मोठ्या प्रचारसभेचे आयोजन केले होते. त्यावेळी त्या मालिकेत सीतामातेची भूमिका साकारणार्‍या दीपिका चिखलिया आणि लक्ष्मणाची भूमिका साकारणारे सुनील लहरी यांचीदेखील उपस्थिती होती. या अभिनेत्यांना पाहण्यासाठी लोकांची खूप मोठ्या प्रमाणावर गर्दी जमली होती. या प्रचारसभेतील गर्दी म्हणजे रामायण या मालिकेतून मिळालेल्या लोकप्रियतेचा प्रत्यय होता. असे असले तरी निवडणुकीत विजय मिळविण्यासाठी प्रभू रामासह पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ ही दोन नावेही महत्त्वाची असल्याचे अरुण गोविल म्हणाले.

अरुण गोविल यांनी मेरठमध्ये मोठ्या प्रचारसभेचे आयोजन केले होते. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

हेही वाचा : भाजपा उमेदवाराला जिंकून देणारा काँग्रेस उमेदवार बेपत्ता; गुजरातमध्ये नक्की काय घडतेय?

अरुण गोविल यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ यांच्या नावांची गरज का?

मेरठमध्ये आयोजित प्रचारसभेत “जो राम को लाये हैं, हम उनको लायेंगे (ज्यांनी रामाला आणले, त्यांना आम्ही आणू.) आणि ‘जय श्रीराम’च्या घोषणांनी वातावरण दुमदुमले. ऑटोरिक्षांसह घोडदळातील वाहनांवरही “इस पर सवार, मोदी का परिवार”, अशी पोस्टर्स लावल्याचे पाहायला मिळाले. अरुण गोविल ‘दी इंडियन एक्स्प्रेस’ला म्हणाले, “पंतप्रधान आणि उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी केवळ मेरठच नव्हे, तर पश्चिम उत्तर प्रदेशातील प्रमुख जागांसाठी माझ्यावर विश्वास ठेवला आहे. ही रणनीती केवळ मोजक्या नेत्यांना माहीत आहे. मी आता मेरठलाच आपली जन्मभूमी आणि कर्मभूमी मानले आहे.”

शुक्रवारी (२६ एप्रिल) मेरठमध्ये मतदान आहे. मोदी आणि आदित्यनाथ या दोघांनीही मेरठमध्ये प्रचार केला आहे. मोदींनी ३१ मार्च रोजी अधिकृतपणे मेरठमधून त्यांच्या निवडणूक प्रचाराची सुरुवात केली. या प्रचारसभेत मोदी यांनी लोकांना पश्चिमेकडील एनडीएच्या इतर उमेदवारांसह गोविल यांना मतदान करण्याचे आवाहन केले. उत्तर प्रदेशच्या मेरठमधील किथौर शहरात १८ एप्रिल रोजी एका सभेला संबोधित करताना योगी म्हणाले, “गोविल यांनी जेव्हा रामाची भूमिका साकारली, तेव्हा त्यांनी आधीच कल्पना केली होती की, अयोध्या राम मंदिर ज्या वर्षी उभे राहील, त्याच वर्षी ते स्वतःसाठी मते मागतील.”

गोविल म्हणाले, “मतदारांनी माझ्या बाजूने आधीच निकाल ठरविला आहे. ही निवडणूक देशासाठी आहे आणि देशातील जनतेने आधीच ठरवले आहे की, देश आणि विकासासाठी मोदीजीच तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील.“ भाजपाने गेल्या तीन वेळा मेरठ लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवला असल्याचे सांगत गोविल म्हणतात, “या भागात मोठ्या प्रमाणावर विकास झाला आहे; पण तरीही अनेक गोष्टी पूर्ववत राहिल्या आहेत.”

“मोदीजी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, हेच सत्य”

लहरी म्हणाले, “दीपिका चिखलिया यांना योगायोगाने १९९१ मध्ये गुजरातमधील बडोदा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली होती; ज्यात त्या विजयी झाल्या होत्या. यंदा त्यांनी गोविल यांच्यासाठी प्रचार करण्याचा निर्णय घेतला. “भाजपाने मेरठमधून जेव्हा त्यांच्या नावाची घोषणा केली, तेव्हा आम्ही तिघे अयोध्येत होतो आणि तिथेच आम्ही त्यांचा प्रचार करण्याचा निर्णय घेतला. कारण- सत्य त्यांच्याबरोबर आहे आणि सत्य हे आहे की, मोदीजी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार.” ते पुढे म्हणाले, “कोरोना काळातील रामायण या मालिकेच्या पुन:प्रक्षेपणाने आम्हाला प्रसिद्धीच्या झोतात आणले. आता प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करीत, प्रत्यक्षात राम होण्याची वेळ आली आहे.”

मेरठ लोकसभा मतदारसंघातील पक्षनिहाय टक्केवारी (छायाचित्र-लोकसत्ता डिजिटल टिम)

पहिल्यांदा मेरठमधून एकही मुस्लीम उमेदवार नाही

लोकांचे मोठ्या संख्येने समर्थन मिळत असले तरीही गोविल यांना काही आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. या भागात मुस्लीम समुदायाची संख्या लक्षणीय आहे. परंतु, पहिल्यांदाच या जागेवरून प्रमुख राजकीय पक्षाने मुस्लिमांना उमेदवारी दिलेली नाही. स्वयंसेवक संघाच्या एका वरिष्ठ कार्यकर्त्याने कबूल केले, “ज्या मतदारसंघात मुस्लिम उमेदवाराची संख्या ३६ टक्के आहे त्या मतदारसंघात मुस्लीम उमेदवाराच्या अनुपस्थितीमुळे काही अडचणी येऊ शकतात. त्याशिवाय गोविल यांच्यावर ‘बाहेरील’ असण्याचाही टॅग आहे.”

समाजवादी पक्ष व काँग्रेसच्या संयुक्त उमेदवार व मेरठच्या माजी महापौर सुनीता वर्मा या दलित आहेत; तर बसपने देवव्रत त्यागी यांना उमेदवारी दिली आहे. देवव्रत हे ब्राह्मण समाजातील आहेत. वर्मा यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यापूर्वी सपाने मेरठमध्ये दोनदा आपले उमेदवार बदलले.

मेरठमधील सद्य:स्थिती

२०१९ मध्ये भाजपाच्या राजेंद्र अग्रवाल यांनी मेरठची जागा फक्त पाच हजार मतांच्या फरकाने जिंकली होती. २०१४ मध्ये अग्रवाल यांनी हीच जागा २.३ लाख मतांनी जिंकली होती. त्यामुळे हा फरक खूप मोठा होता. २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत मेरठ लोकसभा मतदारसंघातील सात विधानसभा मतदारसंघांपैकी फक्त तीन जागा भाजपाने जिंकल्या; तर इतर चार जागा सपा-आरएलडी युतीकडे गेल्या. मात्र, आता आरएलडी हा भाजपाचा मित्रपक्ष आहे.

गोविल २६ एप्रिल रोजी मतदारांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करीत आहेत. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

भाजपाच्या उत्तर प्रदेश ट्रेड सेलचे प्रमुख विनीत शारदा यांनी गोविल हे ‘बाहेरचे’ असल्याचा आरोप फेटाळून लावला. “१९५१ पासून १६ सार्वत्रिक निवडणुकांमध्ये मेरठने शाह नवाज खान, मोहसिना किदवईव, अवतार सिंह भदाना यांच्यासारखे १० बाहेरील उमेदवार निवडून दिले आहेत. गोविल हे याच मातीतील आहेत. कारण- ते इथेच जन्मले आणि इथेच शिकले आहेत; मग ते बाहेरचे कसे?”, असे शारदा म्हणाले.

सेवानिवृत्त वरिष्ठ भविष्य निर्वाह निधी अधिकारी के. के. शर्मादेखील म्हणाले, “उमेदवार स्थानिक आहे की बाहेरचा याची आम्हाला चिंता नाही. २०२२ च्या निवडणुकीत आम्ही सपाच्या रफिक अन्सारी (स्थानिक) यांना निवडून दिले; पण निवडून आल्यापासून त्यांनी तोंडही दाखविलेले नाही. आमचा गोविल यांच्यावर विश्वास आहे. ते म्हणाले आहेत की, ते लोकांसाठी कायम उपलब्ध असतील. ते इथे स्थायिक होण्यासाठी घरही शोधत आहेत.”

सपाचे माजी मेरठ जिल्हा युनिट प्रमुख राजपाल यादव म्हणतात की, मुस्लिम उमेदवार नसणे म्हणजे समाजाची मते पक्षाच्या वर्मा यांच्याकडे येतील. “वर्मा यांना विजयी होण्याची चांगली संधी आहे. कारण- मुस्लीम त्यांना मतदान करतील; तर हिंदू मतांचे भाजपा आणि बसप यांच्यामध्ये विभाजन होईल,” असे यादव म्हणाले.

हेही वाचा : “…भारताची परिस्थिती रशियासारखी होईल”, भगवंत मान यांचा आरोप; मोदींविषयी काय म्हणाले?

पहिल्या टप्प्यातील मतदानाची टक्केवारी घसरल्याचे चित्र आहे. अशात गोविल २६ एप्रिल रोजी मतदारांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करीत आहेत. “तुमचे मत द्या. तसे केल्याने, तुम्ही नवीन सरकारद्वारे तयार केल्या जाणाऱ्या धोरणांचादेखील एक भाग व्हाल”, असे रविवारी (२१ एप्रिल) ते एका बैठकीत म्हणाले.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp candidate arun govil meerut loksabha rac