बुलढाणा : निवडणूक व्यवस्थापनात इतर पक्षांपेक्षा काकणभर पुढे असलेल्या भाजपने विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर करण्यातही आघाडी घेतली. मात्र, बुलढाणा जिल्ह्यातील भाजपचा बालेकिल्ला असलेल्या मलकापूर विधानसभेसाठी उमेदवार जाहीर झाला नाही. पहिली यादी जाहीर झाल्यानंतर सहा दिवस झाले तरीही उमेदवारीचा फैसला झाला नाही. मलकापूरचा तिढा राजधानी दिल्लीपर्यंत गेल्याने तेथील उमेदवारीचा फैसला अंतिम टप्प्यात होण्याची शक्यता आहे. प्राप्त माहितीनुसार, उमेदवारीच्या अंतिम शर्यतीत माजी आमदार चैनसुख संचेती आणि संघ परिवारातील मनीष लखानी ही दोनच नावे उरली आहे. उर्वरित नावे मागे पडली आहे.
भाजपच्या वाट्याला आलेल्या चार पैकी तीन ठिकाणचे उमेदवार १९ ऑक्टोबरला जाहीर झाले. जळगाव जामोद (संजय कुटे), खामगाव (आकाश फुंडकर) आणि चिखली (श्वेता महाले) मधून विद्यमान आमदारांना पुन्हा संधी दिली आहे. मात्र, मलकापूर विधानसभा मतदारसंघातील उमेदवार जाहीर करण्यात आला नाही. यामुळे राजकीय वर्तुळात विविध तर्क वितर्क काढण्यात येत आहे. मलकापूर मतदारसंघावर तब्बल तीन दशके अधिराज्य गाजविणारे माजी आमदार चैनसुख संचेती यांच्यासाठी हा सूचक इशारा ठरला. सन १९९५ मध्ये भाजपने उमेदवारी नाकारल्याने संचेती यांनी बंड पुकारत अपक्ष म्हणून निवडणूक लढविली. ते आमदार झाले आणि नंतर भाजपचे सर्वेसर्वा झाले. १९९५ ते २०१४ दरम्यान ते सलग पाच वेळा आमदार राहिले. २०१९ मध्येही त्यांना भाजपाने उमेदवारी दिली. मात्र, काँग्रेसने राजेश एकडे यांना उमेदवारी देण्याचा काँग्रेसचा डाव यशस्वी झाला. तीन दशकातील संचेतींचा तो पहिला पराभव ठरला.
हे ही वाचा… चावडी : बिनधास्त नाना
त्यांच्याविरुद्ध निर्माण झालेली ‘अँटी इन्कबन्सी’, पंचवीस वर्षे आमदार आणि मतदारसंघाचा अपेक्षित विकास न करणे हे दोन मुद्दे त्यांच्या विरोधात गेले. अलीकडे मलकापूर अर्बन बँक आरडबघाईस आली आणि ठेवीदारांचे पैसे अडकणे , यामुळे निर्माण झालेली नाराजी, भाजपाचे शिवचंद्र तायडे यांच्याशी झालेली फारकत, बाजार समिती सभापती अविश्वास प्रकरणी संचेती आणि तायडे गटात झालेला राडा, न्यायालयापर्यंत गेलेला वाद हे घटक देखील त्यांच्यासाठी अडचणीचे ठरले आहे. पहिल्या यादीत त्यांचे नाव नव्हते, त्यासाठी हे घटकसुद्धा कारणीभूत ठरले.
यंदा नवीन चेहरा?
भाजप यंदा नवीन चेहरा देण्याच्या मनस्थितीत असल्याची चर्चा सुरू आहे. भाजपकडून चैनसुख संचेती, त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी शिवचंद्र तायडे, त्यांच्या अर्धांगिनी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष उमा तायडे हे इच्छुक होते. यात अलीकडे मनीष लखानी यांची भर पडली. संघ परिवाराशी निगडित असलेले लखानी हे संघाचे (खामगाव) जिल्हा संपर्क प्रमुख आहेत. यासाठी संचेती आणि तायडे यांची समजूत घालण्याचे वा मनधरणीचे प्रयत्न पक्षश्रेष्ठींनी केले. यातील तायडे दाम्पत्याची समजूत घालण्यात आणि त्यांना थोपविण्यात पक्ष यशस्वी झाला आहे. मात्र, सातव्यांदा लढण्यासाठी सज्ज असणारे संचेती यासाठी फारसे तयार नसल्याचे समजते. अपक्ष म्हणून मैदानात उतरण्यास देखील ते तयार असल्याचे चित्र आहे. त्यांची नाराजी पत्करून नवा चेहरा उतरविण्यासाचा धोका पत्करण्यास पक्ष तयार नाही. त्यामुळे संचेतींच्या संभाव्य उमेदवारीवरुन पक्षात दोन मतप्रवाह निर्माण झाल्याचे वृत्त आहे. यामुळे भाजपच्या दुसऱ्या यादीत मलकापूरचा समावेश राहतो का आणि उमेदवारी कुणाला भेटते हा औत्सुक्याचा विषय आहे.
हे ही वाचा… कार्तिकी एकादशीच्या महापूजेचा मान यंदा कोणाला?
माजी नगराध्यक्ष बंडाच्या तयारीत?
काँग्रेसने आमदार एकडे यांना पुन्हा संधी दिली आहे. मात्र, यामुळे काँग्रेसचे काही नेते प्रामुख्याने माजी नगराध्यक्ष हरीश रावळ नाराज झाले आहे. ते बंड करणार असल्याची चर्चा मतदारसंघात सुरू आहे.