उमाकांत देशपांडे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई : पराभवाच्या भीतीने भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना युतीचे उमेदवार मुरजी पटेल यांनी अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीतून अखेर माघार घेतली आहे. या निवडणुकीत पराभव झाला तर आगामी मुंबईसह अन्य महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने युतीच्या मनोधैर्यावर आणि जनमानसातील प्रतिमेवर परिणाम होईल, अशी भीती असल्याने पटेल यांची उमेदवारी मागे घेण्याची नामुष्की भाजपवर ओढवली. ही जागा आपल्या वाट्याला न आल्याने शिंदे गटानेही उमेदवार माघारीसाठी दबाव आणल्याने भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

हेही वाचा : पालकमंत्री उदय सामंतांच्या सामोपचाराच्या भूमिकेमुळे ‘नियोजन’ची बैठक खेळीमेळीत

भाजपचे महाराष्ट्र प्रभारी सी. टी. रवी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह प्रदेश सुकाणू समितीतील काही नेते बैठकीत सहभागी झाले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबरही भाजप नेत्यांनी चर्चा केल्यावर आणि दिल्लीत पक्षश्रेष्ठींची परवानगी घेतल्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पटेल यांची उमेदवारी मागे घेण्याची घोषणा केली.शिवसेनेतील फुटीनंतर ही निवडणूक अतिशय अटीतटीची होईल, अशी अपेक्षा होती. निवडणूक लढविणार असल्याने शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह आपल्याला मिळावे, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली आणि शिवसेना नाव व धनुष्यबाण चिन्ह गोठविले गेले. ठाकरे व शिंदे गटाला निवडणुकीपुरती दोन स्वतंत्र पक्षनावे व चिन्हे मिळाली.

हेही वाचा : पराभवाच्या भीतीने मुरजी पटेल माघार घेणार?

भाजपच्या दबावामुळे शिंदे गटाने केलेल्या या हालचालींमुळे जनमानसात नाराजीचे वातावरण निर्माण झाले व ठाकरे गट आक्रमक झाला. शिंदे गटाने ठाकरे गटाच्या उमेदवार ॠतुजा लटके यांना आपल्या बाजूने वळविण्याचे प्रयत्न फसल्यावर त्यांचा महापालिका सेवेचा राजीनामा तांत्रिक मुद्द्यावर आयुक्तांवर दबाव आणून मंजूर करणे लांबविण्याचे प्रयत्न झाले. त्यातही उच्च न्यायालयाने दणका दिल्याने युतीची पंचाईत झाली.

हेही वाचा : साईबाबा प्रकरणात कुणाचे चुकले? काय चुकले?

लटके यांना लढत देईल, असा तुल्यबळ उमेदवार शिंदे गटाकडे नसल्याचे कारण देत भाजपने ही जागा आपल्याकडे घेतली. पण भाजपकडेही मुरजी पटेल यांच्याव्यतिरिक्त अन्य उमेदवार नव्हता. पटेल यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने त्यांचे नगरसेवकपद गेले. पटेल हे वादग्रस्त उमेदवार असल्याने आणि काँग्रेस व शिवसेनेतून त्यांचा भाजपकडे प्रवास झाल्याने स्थानिक भाजप कार्यकर्तेही नाराज होते. पटेल हे मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांचे विश्वासू असून त्यांच्यामुळेच पटेल यांना उमेदवारी मिळाली. अन्य काही नेते पटेल यांना उमेदवारी देण्यास अनुकूल नव्हते. त्यामुळेच पटेल यांची उमेदवारी मागे घेण्यास शेलार यांनीच बैठकीत तीव्र विरोध केला. पराभवाच्या भीतीने युतीने उमेदवार मागे घेतला, असा प्रचार होईल आणि महापालिका निवडणुकांना सामोरे जाताना मनोधैर्यावर परिणाम होईल, टीकेला सामोरे जावे लागेल, अशी भूमिका शेलार यांनी मांडली.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp candidate murji patel withdraws due fear of defeat andheri by election rutuja latke cm eknath shinde devendra fadanvis print politics news tmb 01