नवी दिल्ली : राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी भाजपच्या ११० जागांवरील उमेदवारांवर बुधवारी शिक्कामोर्तब करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत सुमारे अडीच तास झालेल्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीमध्ये उमेदवारांच्या निवडीबाबत अंतिम निर्णय घेण्यात आला. भाजपची पहिली यादी शुक्रवारी जाहीर होण्याची शक्यता आहे.

महायुतीतील जागावाटपही निश्चित झाले असून त्याबाबत गुरुवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भेट घेणार आहेत. त्यानंतर महायुतीतील जागावाटपही जाहीर केले जाणार आहे. हरियाणाच्या नवनियुक्त भाजप सरकारचा गुरुवारी शपथविधी असल्यामुळे अमित शहा चंडीगडमध्ये असतील. तिथे शिंदे व अजित पवार शहा यांची भेट घेण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्रीपदाच्या निवडीसंदर्भातील बैठकीसाठी शहा चंडीगडला गेल्यामुळे बुधवारी होणारा शिंदे व अजित पवार यांचा दिल्लीदौरा रद्द करण्यात आला.

हेही वाचा >>>Omar Abdullah swearing-in ceremony: जम्मू-काश्मीरमध्ये आघाडी असूनही काँग्रेस सत्तेतून बाहेर का?

दिल्लीतील भाजपच्या मुख्यालयामध्ये सोमवारी पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा व अमित शहा यांनी प्रदेश भाजपच्या सुकाणू समितीतील नेत्यांची बैठक घेतली होती. या बैठकीमध्ये संभाव्य उमेदवारांची यादी तयार करण्यात आली होती. मोदींच्या उपस्थितीत बुधवारी झालेल्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीमध्ये अमित शहा, राजनाथ सिंह, जे. पी. नड्डा, देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील, रावसाहेब दानवे, आशीष शेलार, विनोद तावडे, पीयूष गोयल, भूपेंद्र यादव, अश्विनी वैष्णव, पंकजा मुंडे आदी नेते सहभागी झाले होते.

हेही वाचा >>>पवार ते पवार असा आमदार हिरामण खोसकर यांचा राजकीय प्रवास

भाजप १६० जागा लढवणार?

महायुतीतील जागावाटप जाहीर होण्यापूर्वीच बुधवारी भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक घेण्यात आली. भाजप सुमारे १६० जागा लढवणार असला तरी २०१९ मध्ये जिंकलेल्या जागा भाजपच्या वाट्याला येणार आहेत. अशा जागांवरील उमेदवारांबाबत बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आला असल्याचे समजते. त्यापैकी ६०-७० उमेदवारांची नावे पहिल्या यादीमध्ये जाहीर केली जाऊ शकतात.