ठाणे : ठाणे जिल्ह्यातील वजनदार राजकीय नेते गणेश नाईक यांना राज्यमंत्री मंडळात संधी देत भाजपने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रभाव क्षेत्र असलेल्या ठाणे जिल्ह्यात पुन्हा एकदा शिंदे यांच्या विरोधात दबावाचे राजकारण सुरू केल्याची चर्चा आता रंगली आहे. शिंदे मुख्यमंत्री असताना रविंद्र चव्हाण हे भाजपाचे एकमेव मंत्री ठाणे जिल्ह्यात होते. मात्र मुख्यमंत्री पदाच्या प्रभावामुळे जिल्ह्यातील राजकारणात शिंदे पिता पुत्रांचाच प्रभाव होता. या काळात नवी मुंबईतील नाईकांचे आणि शिंदे यांचे फारसे सख्य पाहायला मिळाले नाही. आता नाईक यांनाच मंत्रीमंडळात संधी देत भाजपाने ठाणे जिल्ह्यात आक्रमक राजकारणाला सुरूवात केल्याचे बोलले जात आहे.
गणेश नाईक हे नवी मुंबईतील राजकारणातील मोठे प्रस्थ मानले जाते. यापूर्वी तीन-तीन वेळा त्यांनी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री पदही भूषविले आहे. एकनाथ शिंदे यांचा मंत्रीमंडळातील राजकारणात उदय होत असताना गणेश नाईक हे जिल्ह्यातील राजकारणात सर्वोच्च स्थानी होते. शिंदे यांचे गुरू आनंद दिघे आणि गणेश नाईक हे समकालीन राजकारणी आहेत. शिवसेनेत असताना दिघे यांच्याशीही नाईक यांचे फारसे जमले नाही. त्यामुळे जिल्ह्यातील राजकारणात एकनाथ शिंदे आणि नाईक यांचा नेहमीच संघर्ष पाहायला मिळाला. नाईक यांनी पुढे भाजपाची साथ धरली, तेव्हा देखिल शिंदे हे त्यांच्यापासून अंतर राखून राहिले. महाविकास आघाडीचे सरकार राज्यात आल्यानंतर मिळालेले नगरविकास मंत्री पद आणि त्यानंतर थेट मुख्यमंत्री पदाच्या प्रवासात एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबईतील गणेश नाईक यांच्या वर्चस्वाला आव्हान उभे केल्याचे पाहायला मिळाले. याच काळात नाईक यांचे नवी मुंबईतील कडवे विरोधक ताकदवान बनले. नगरविकास विभागाने गेल्या अडीच वर्षात घेतलेले निर्णय नाईक यांना रूचले नव्हते. श्रीकांत शिंदे यांच्या आग्रहास्तव कल्याण तालुक्यातील १४ गावे नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट करण्यात आली. या निर्णयास नाईक यांनी जाहिर विरोध केला. तसेच बारवी धरणाचे पाणी पुरेशा प्रमाणात नवी मुंबईस दिले जात नसल्याने नाईक संतापल्याचे पाहायला मिळाले.
आणखी वाचा-Mahila Samman Yojana : वित्त विभागाच्या चिंतेला न जुमानता दिल्ली सरकार महिलांना २१०० रुपये का देणार?
मंत्रीपदाची हुलकावलणी शिंदे यांच्यामुळेच?
अडीच वर्षांपूर्वी राज्यात महायुतीची सत्ता आल्यानंतरही गणेश नाईक यांना मंत्री पदाने दिलेली हुलकावणी शिंदे यांच्या दबावाच्या राजकारणाचा भाग होता अशी भावना नाईक समर्थकांमध्ये होती. नवी मुंबई महापालिका आणि सिडकोचा कारभार ठाण्यावरून हाकला जातो असा आक्षेप अनेकदा नाईक समर्थकांनी घेतला होता. ‘आमच्या शहराचे कारभारी ठरवणारे तुम्ही कोण ?’ असा सवाल एका जाहिर सभेत करत गणेश नाईकांनी तेव्हाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आव्हान दिल्याची चर्चाही रंगली होती. महापालिकेतील अधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांवरही नाईक नाराज असायचे. जाहिर कार्यक्रमात शिंदे नाईक यांना पुरेपुर मान देत. मात्र महापालिकेच्या निर्णय प्रक्रियेत नाईकांना डावलले जात असल्याचे त्यांच्या समर्थकांचे म्हणणे होते. ठाणे लोकसभा मतदारसंघातील उमेदवारी, ठाणे विधानसभा निवडणुकीत शिंदे यांच्या विरोधात झालेली बंडखोरी यांच्यामुळे देखिल या दोन्ही गटात संघर्ष झाल्याचे पाहायला मिळाले होते. या पार्श्वभुमीवर नाईक यांना मिळालेल्या मंत्रीपदाचे वेगवेगळे अर्थ काढले जात असून शिंदे यांच्या जिल्ह्यातील प्रभावाला आव्हान उभे करण्याचा हा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे.