सांगली : सांगली ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी इस्लामपूरचे निशीकांत पाटील यांची निवड झाल्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केले आहे. विधानसभा व लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक प्रमुख यांच्या नियुक्त्या करून दीड महिन्याचा अवधी झाल्यानंतर या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या असून य निमित्ताने लोकसभेबरोबरच विधानसभेची तयारी भाजपने सुरू केली आहे. ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी इस्लामपूरचे माजी नगराध्यक्ष पाटील यांची नियुक्ती करून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्यासमोर मतदारसंघातच आव्हान उभे करण्याचे मनसुबे भाजपचे दिसत आहेत.
भाजपचे जिल्हाध्यक्ष म्हणून यापूर्वी सलग पाच वर्षे पृथ्वीराज देशमुख यांच्या हाती सुत्रे होती. त्यांच्या कारकिर्दीमध्ये जिल्हा परिषदेची मित्रांनासोबत घेऊन पाच वर्षे सत्ता अबाधित ठेवण्याचे काम जसे झाले तसे पंचायत समितीची सत्ताही भाजपच्या हाती आली होती. पक्षाचा गावपातळीवर विस्तार होण्यास मदत झाली. तसेच २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत विद्यमान खासदार संजयकाका पाटील यांच्याबद्दल पक्षात असलेली नाराजी बाजूला ठेवून भाजपचा गड शाबूत ठेवण्याचे कामही झाले. आता ही जबाबदारी इस्लामपूरकरांकडे सोपविण्यात आली आहे.
हेही वाचा – पक्षवेध : राज्यात काँग्रेसला संधी, पण…
भाजपचे नवे जिल्हाध्यक्ष पाटील यांनी आमदार पाटील यांच्या नेतृत्वाला आव्हान देत थेट नगराध्यक्ष निवडीमध्ये यश मिळवले होते. विकास आघाडीचे पाठबळ यामागे होते. आमदार पाटील यांचा राष्ट्रवादीचा गट वगळता सर्व विरोधक यासाठी एकत्र आले होते. भाजप, शिवसेना, काँग्रेस आदी पक्ष यासाठी एकत्र आले होते. नगरपालिकेतही एक जागा अपक्ष सोडली तर राष्ट्रवादीच्या बरोबरीने सदस्य विकास आघाडीचे निवडून आले होते. यामुळे आमदार पाटील यांच्या गडाला सुरुंग लागू शकतो हे नगरपालिका निवडणुकीतून सिद्ध झाले. मात्र, त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या वाट्याला वाळव्याची जागा आल्याने सेनेकडून गौरव नायकवडी यांना उमेदवारी मिळाली. तरीही युती धर्माला तिलांजली देत पाटील यांनी अपक्ष मैदानात उतरून आमदार पाटील यांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र विरोधकातील बेकी हीच आमदार पाटील यांच्या पथ्यावर पडत असल्याची अनुभूती या निवडणुकीच्या निमित्ताने विरोधकांना आली. मात्र, विधानसभा निवडणुकीनंतरही पाटील यांनी राष्ट्रवादीला रोखण्यासाठीचे प्रयत्न सुरूच ठेवले असून मतदारसंघात त्यांचा संपर्क सुरूच आहे. जिल्हाध्यक्षपद मिळाल्यानंतर त्यांना मतदारसंघात किती वेळ देण्यास मिळेल आणि जिल्हाभर पक्ष बांधणीसाठी किती वेळ देता येईल हे पाहावे लागेल.
पक्ष नेतृत्वाने त्यांच्यावर सोपविलेल्या जबाबदारीचा कस लोकसभा निवडणुकीवेळी लागणार आहे. कारण मुळात त्यांचा मतदारसंघच हातकणंगले मतदारसंघात आहे. आणि त्यांना काम करावे लागणार आहे ते सांगली लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा क्षेत्रांमध्ये. त्यांचा जत, आटपाडी, विटा, कवठेमहांकाळ, तासगाव, पलूस, कडेगाव भागात संपर्क फारसा नाही. त्यांचे आतापर्यंतचे लक्ष्य केवळ वाळवा विधानसभा मतदारसंघाचे ध्येय ठेवूनच राहिले असल्याने यापुढील काळात त्यांच्यापुढे पक्ष बांधणीचे आव्हान असणार आहे. मतदारसंघामध्येही भाजपमध्ये फारसी अनुकूल स्थिती निर्माण करावी लागणार आहे. मूळ भाजप म्हणून ओळख असलेल्या विक्रम पाटील यांच्याबरोबरच महाडिक गटाशीही त्यांना जुळवून घ्यावे लागणार आहे. आपली ताकद निर्माण करीत असतानाच सांगली लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघात लक्ष घालावे लागणार आहे. यातच जिल्हा बँकेचे संचालक राहूल महाडिक यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या गटात येण्याचे दिलेले आमंत्रणही दुर्लक्ष करून चालणार नाही.
बदलत्या राजकीय समिकरणामध्ये अजित पवार यांचे प्रथम लक्ष्य आमदार पाटील हे असणार आहेत. राष्ट्रवादीमधील फुटीनंतर आमदार पाटील यांनी मूळच्या पक्षातच आपण असल्याचे जाहीर करीत पक्षाध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या बाजूंने खिंड लढविण्याचे काम करीत आहेत. यामुळे निशीकांत पाटील यांना ताकद देण्याचे काम भाजपकडून तर होणारच पण, अजितदादा गटाकडूनही शत्रूचा शत्रू तो मित्र या नात्याने मदत होऊ शकते. एक मात्र, खरे की पक्षात त्यांच्या निवडीला फारसे आव्हान मिळालेले नाही. यामुळे त्यांना पक्षाने संधीही दिली आहे. या संधीच्या मूळाशी मात्र, राष्ट्रवादीचे आमदार पाटील यांना मतदारसंघातच अडकवून ठेवण्याचे धोरण भाजपचे दिसत आहे.