रत्नागिरी – रत्नागिरी भाजप एक नंबरचा पक्ष बनवायचा आहे. यासाठी कार्यकर्त्यांनी साथ द्यावी, असे आवाहन मंत्री नीतेश राणे यांनी केले आहे. मात्र नीतेश राणेंच्या या वक्तव्याने महायुतीतील भाजपानेच एक प्रकारे शिवसेना शिंदे गटासमोर आव्हान उभे केले आहे. उद्योगमंत्री उदय सामंत आपल्या बाल्लेकिल्ल्यात भाजपचे हे आव्हान कसे पेलतात याकडे सर्व जिल्हा वासियांचे लक्ष लागून राहीले आहे.
रत्नागिरी – सिंधुदुर्ग जिल्ह्याचे खासदार नारायण राणे यांच्या ७३ व्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी दक्षिण रत्नागिरी जिल्हा आयोजित, महाराष्ट्राचे मत्स्य व बंदर विकास मंत्री नीतेश राणे पुरस्कृत आणि बॉडी बिल्डींग अॅण्ड फिजिक्स स्पोर्ट असोसिएशन रत्नागिरी जिल्हा यांच्या मान्यतेने खासदार श्री २०२५ आणि मेन्स फिजिक्स खासदार श्री २०२५ या शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धकांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि भाजपा कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी राणे रत्नागिरीत आले होते.
भाजपाच्या कार्यकर्त्यांना बळ आणि प्रामुख्याने हिंदू समाजासोबत उभे राहण्यासाठी इथे आलो आहे. पक्ष म्हणून आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण, खासदार नारायण राणे या सगळ्याच प्रमुख नेत्यांच्या नेतृत्वाखाली आपल्या सगळ्यांना या रत्नागिरीमध्ये भारतीय जनता पक्षाचे मोठं काम उभं करायचं आहे आणि सातत्याने अशा पद्धतीचे कार्यक्रम आपण घेत राहिलो तर मला विश्वास आहे, येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये या रत्नागिरीमध्ये भारतीय जनता पक्ष हा एक नंबरचा पक्ष राहील. यासाठी एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून आपल्याला आपल्या पक्षाचे काम इथे उभं करायचे असून ती जबाबदारी आपल्या प्रमुख नेत्यांनी मला दिली आहे. या जिल्ह्याच्या संपर्क मंत्री बनवण्याच्या मागेही हाच उद्देश आपल्या नेत्यांचा असल्याचे नितेश राणे यांनी सांगितले.
भारतीय जनता पक्षाच्या इथल्या कार्यकर्त्याला रत्नागिरीमध्ये प्रत्येक क्षेत्रात स्थान मिळाले पाहिजे, ताकद मिळाली पाहिजे, जिल्हा नियोजन पासून ते विशेष कार्यकारी पदापर्यंत प्रत्येक पदांमध्ये भाजपचे स्थान इथे आता दिसणार असल्याचे सांगून भाजपा रत्नागिरीत वाढविण्यास सुरुवात केली आहे. मात्र मंत्री नीतेश राणे यांच्या या वक्तव्याने उद्योगमंत्री व रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या शिवसेनेपुढे एक प्रकारे भाजपाने आव्हान उभे केले आहे. याचाच एक भाग म्हणून भाजपाने रत्नागिरीत पर्यटन स्थळे तसेच गावागावात प्रवासी निवारा शेड तसेच स्वच्छ शौचालय उभारणीवर भर देण्यास सुरुवात केली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात भाजपाचे वर्चस्व वाढण्यासाठी माजी मंत्री व भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मत्स्य व्यवसाय मंत्री नीतेश राणे यांनी कंबर कसली आहे. महायुती मधील भाजपानेच शिवसेना शिंदे गटा समोर आव्हान उभे केल्याने आता शिंदे गटाच्या नेत्यांच्या भूमिकेकडे जिल्हा वासियांचे लक्ष लागून राहीले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेना फुटल्यानंतर शिवसेना शिंदे गटाचे वर्चस्व प्रस्थापीत झाले आहे.
जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटाचे तीन आमदार विधानसभा निवडणुकीत निवडून आले आहेत. तसेच शिवसेनेच्या ऑपरेशन टायगरने ठाकरेंची शिवसेनेला धक्का देत अनेक नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते शिवसेना शिंदे गटात दाखल झाल्याने जिल्ह्यात शिंदेच्या शिवसेनेचे वर्चस्व वाढले आहे. मात्र याच वर्चस्वाला सुरुंग लावण्याचे काम भाजपा कडून करण्यास सुरुवात झाली आहे. यात राणे कुटुंबाने व्यक्तिगत रत्नागिरी जिल्ह्याकडे लक्ष केंद्रीत केल्याने उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या बाल्ले किल्ल्यात भाजपाचे आव्हान उभे राहीले आहे. हे भाजपाचे आव्हान शिवसेना शिंदे गट कसे पेलणार याकडे आता जिल्हावासियांचे लक्ष लागून राहिले आहे.
सर्वच नेते आपला पक्ष वाढावा म्हणून काम करत असतात. रत्नागिरीत आता आणि पुढेही शिवसेनेचे वर्चस्व राहणार आहे. यासाठी आमचे नेते सक्षम आहेत. रत्नागिरीत शिवसेना हाच मोठा पक्ष असून वेळोवेळी पक्षाच्या नेते आणि पदाधिकारी यांच्या आढावा बैठका घेतल्या जात आहेत. – राहुल पंडीत, माजी जिल्हाप्रमुख, शिवसेना शिंदे गट, रत्नागिरी