आपले उमेदवार लोकांबरोबर किती जोडले गेले होते? राज्यघटना आणि आरक्षणाच्या मुद्द्यावरून झालेला प्रचार किती प्रभावी ठरला? राज्य अथवा केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयांच्या निकालाचा काय परिणाम झाला? अशा स्वरुपाच्या प्रश्नांची उत्तरे शोधून भारतीय जनता पार्टी उत्तर प्रदेशमधील आपल्या खराब कामगिरीचे विश्लेषण करत आहे. अशाप्रकारच्या अनेक प्रश्नांची यादी तयार करण्यात आली असून वस्तुनिष्ठ विश्लेषण करून खराब कामगिरीमागची कारणे शोधण्याचा प्रयत्न पक्षाकडून केला जात आहे. या लोकसभा निवडणुकीमध्ये उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, हरियाणा आणि पंजाब या चार राज्यांमधील भाजपाची कामगिरी अत्यंत खराब राहिलेली आहे. खासकरून उत्तर प्रदेशमध्ये अशा प्रकारची कामगिरी होणे भाजपाला अजिबातच अपेक्षित नव्हते. उत्तर प्रदेशमध्ये असलेल्या लोकसभेच्या एकूण ८० जागांपैकी २०१९ मध्ये भाजपाला ६२ जागा मिळाल्या होत्या. या निवडणुकीत हा आकडा ३३ वर घसरला आहे, तर मतटक्का ४९.९८ वरून ४१.३७ वर आला आहे. उत्तर प्रदेशमध्ये सत्तेत असूनही अनेक मतदारसंघांमध्ये पराभवाची नामुष्की का ओढावली, याचे परिशीलन भाजपा करणार आहे. वाराणसी आणि लखनौ हे दोन मतदारसंघ वगळता इतर मतदारसंघांमध्ये याबाबतची चाचपणी केली जाणार आहे. फक्त पराभूत झालेल्या मतदारसंघांमध्येच नाही तर जिथे मताधिक्य घटले आहे, अशा मतदारसंघांचाही आढावा घेतला जाणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा