वाई : शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव यांना सातारा लोकसभेची निवडणूक लढण्यास मुख्यमंत्र्यांनी अनुकूलता दर्शवली आहे. नायगाव (ता. खंडाळा) येथील कार्यक्रम संपल्यावर सर्व कार्यकर्त्यांसमोर त्यांनी सातारा लोकसभा लढूया, तयारी करा असे सांगत होकार दिला.

सातारा लोकसभा मतदारसंघात भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट आणि शिवसेना शिंदे गट यांनी हक्क सांगत तयारी सुरू केली आहे. भाजपने या मतदारसंघावर दावा करत आपलाच खासदार सर्वाधिक मताधिक्याने निवडून येणार असल्याचा दावा केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव यांनी यावेळी लोकसभा निवडणूक लढविण्याचा चंग बांधला आहे. सातारा लोकसभा मतदारसंघ पूर्वीपासून शिवसेनेचा आहे. मतदारसंघावर शिवसेनेचा हक्क असून यावेळेस या मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची तयारी केली आहे.

हेही वाचा – बिल्किस बानो प्रकरणी आरोपींच्या शिक्षामाफीवर महाराष्ट्र सरकार अनुकूल भूमिका घेणार का ?

महायुतीत भाजप खासदार उदयनराजे यांच्यासाठी आग्रही आहे. राष्ट्रवादी काँग्रेस उपमुख्यमंत्री अजित पवार गटही या मतदारसंघावर दावा सांगत आहे. आमदार मकरंद पाटील यांचे बंधू नितीन पाटील हे अजितदादा गटाकडून इच्छुक आहेत. त्यातच भाजपचे नेते व अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी यापूर्वीच पक्षाने संधी दिल्यास लोकसभा लढणार म्हणून शड्डू ठोकला आहे.

शिवसेनेच्या वतीने पुरुषोत्तम जाधव यांनी तर पूर्ण तयारी सुरू केली आहे. बुधवारी खंडाळ्यातील सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले होते. त्यावेळी कराड शहर तसेच कराड उत्तर व दक्षिण मतदारसंघातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेऊन सातारा लोकसभेवर शिवसेनेचा हक्क असून यावेळेस पुरुषोत्तम जाधव यांनाच उमेदवारी द्यावी, अशी आग्रही मागणी केली.

हेही वाचा – INDIA आघाडीतील मतभेद चव्हाट्यावर? राहुल गांधींच्या पदयात्रेतून वाद मिटणार का?

नायगाव येथील कार्यक्रम संपवून परत जाताना हेलिपॅडवर जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम जाधव यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली व सर्व नेत्यांपुढेच त्यांनी सातारा लोकसभेवर शिवसेनेचा हक्क असून या मतदारसंघातून मी इच्छुक असल्याचे त्यांनी सांगितले. त्यावर मुख्यमंत्र्यांनी असे असेल तर आता सातारा लोकसभेची निवडणूक आपण लढूया, तुम्ही तयारी करा असे सांगितले.

मुख्यमंत्र्यांनी पुरुषोत्तम जाधव यांना सातारा लोकसभेसाठी होकार दिला असला तरी हा मतदारसंघ महायुतीत शिवसेनेच्या शिंदे गटाला सुटणार का, हा खरा प्रश्न आहे.

Story img Loader