लवकरच मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा होणार आहे. तसेच आगामी वर्षात लोकसभेची निवडणूक होणार आहे. याच कारणामुळे सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर सडकून टीका करताना दिसत आहेत. मोदी सरकारच्या काळात भ्रष्टाचार बोकाळल्याचा, महागाई गगनाला भिडल्याचा आरोप काँग्रेस पक्ष करीत आहे. तर भाजपाकडून काँग्रेसवर घराणेशाहीचा आरोप केला जातोय. विशेष म्हणजे हे दोन्ही पक्ष केलेल्या आरोपांना तेवढ्याच क्षमतेने प्रत्युत्तरही देत आहेत. दरम्यान, भाजपाने काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि काँग्रेसच्या नेत्या तथा राहुल गांधी यांच्या भगिनी प्रियांका गांधी-वाड्रा यांच्यात सर्वकाही आलबेल नसल्याचा दावा केला आहे. काँग्रेसकडून प्रियांका गांधी-वाड्रा यांना डावलले जात असल्याचेही भाजपाने म्हटले आहे. भाजपाच्या या दाव्याला काँग्रेसने सडेतोड उत्तर दिले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भाजपाने शेअर केला व्हिडीओ

भाजपाने रविवारी (३ सप्टेंबर) एक्सवर (पूर्वीचे ट्विटर) एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये भाजपाने प्रियांका गांधी-वाड्रा आणि राहुल गांधी या भाऊ-बहिणीमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याचा दावा केला. काँग्रेस पक्षाकडून नेहमीच राहुल गांधी यांना पुढे केले जाते. प्रियांका गांधी-वाड्रा यांचा फक्त राजकीय अस्त्र म्हणूनच वापर केला जातो, असा दावा भाजपाने या व्हिडीओमध्ये केला. काँग्रेसने मात्र भाजपाचे हे सर्व दावे फेटाळून लावले आहेत.

“नेहमी राहुल गांधींनाच पुढे केले जाते”

“राहुल गांधी आणि प्रियांका गांधी-वाड्रा याच्यातील संबंध हे सामान्य भाऊ-बहिणीसारखे नाहीत. प्रियांका गांधी-वाड्रा या राहुल गांधी यांच्यापेक्षा सरस आहेत. काँग्रेसकडून मात्र नेहमीच राहुल गांधी यांना पुढे केले जाते. सोनिया गांधी यादेखील नेहमीच राहुल गांधी यांच्या पाठीशी असतात. याच कारणामुळे प्रियांका गांधी-वाड्रा या घमंडी युतीच्या (इंडिया आघाडी) बैठकीपासून दूर होत्या. प्रियांका गांधी-वाड्रा यांचा फक्त निवडणुकीसाठी वापर केला जात आहे,” असे कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आले आहे.

“राहुल गांधींमुळे ३९ निवडणुकांत पराभव झाला, तरी …”

एकूण साडेपाच मिनिटांच्या या व्हिडीओमध्ये प्रियांका गांधी-वाड्रा यांना कसे डावलण्यात येत आहे, असे निवेदक सांगताना दिसतोय. विशेष म्हणजे रक्षाबंधनाच्या दिवशी राहुल गांधी यांनी राखीदेखील बांधलेली नाही, असा दावा या व्हिडीओत करण्यात आला आहे. “हिमाचल प्रदेश व कर्नाटकमध्ये प्रियांका गांधी-वाड्रा यांनी एकूण २८ सभा घेतल्या होत्या. त्या राज्यांत काँग्रेस पक्षाचा विजय झाला होता. या विजयासाठी प्रियांका गांधी-वाड्रा यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. दुसरीकडे राहुल गांधी यांच्यामुळे काँग्रेसचा एकूण ३९ निवडणुकांमध्ये पराभव झाला. असे असले तरी सर्व विजयांचे श्रेय हे राहुल गांधी यांनाच दिले जाते. याच कारणामुळे कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीतील विजयानंतर मंचावर प्रियांका गांधी-वाड्रा यांनी राहुल गांधी यांच्यापासून अंतर राखले होते,” असा दावा भाजपा या व्हिडीओमध्ये करताना दिसत आहे.

“डोळे आणि मेंदूवर उपचार करून घ्या”

दरम्यान, भाजपाच्या या दाव्याला काँग्रेसनेही सडेतोड उत्तर दिले आहे. काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया श्रीनेत यांनी भाजपाचे हे सर्व दावे फेटाळून लावले. सर्वच कुटुंबे ही भाजपाप्रमाणे नसतात, असा टोला श्रीनेत यांनी लगावला. भाजपाला प्रत्युत्तर देण्यासाठी त्यांनी राहुल गांधी यांचा हातात राखी असलेला फोटो समाजमाध्यमांवर शेअर केला. तसेच “तुमचे डोळे आणि मेंदू यावर उपचार करून घ्या. रक्षाबंधनाच्या दिवशी राहुल गांधी यांच्या हातात राखी होती. खरं पाहायचं झालं, तर राहुल गांधी वर्षभर हातात राखी ठेवतात,” असे सुप्रिया श्रीनेत म्हणाल्या.

प्रियांका चतुर्वेदी यांची भाजपावर सडकून टीका

दुसरीकडे शिवसेना (उबाठा) पक्षाच्या नेत्या प्रियांका चतुर्वेदी यांनीदेखील भाजपावर सडकून टीका केली. “व्हिडीओतील स्क्रिप्ट मूर्ख ट्रोल कंपनीने लिहिल्याचे हा पूर्ण व्हिडीओ पाहिल्यावर समजते. सत्तेत राहण्यासाठी भाजपाकडून जे केले जात आहे, ते पाहून त्यांच्यावर दया केली पाहिजे,” असे चतुर्वेदी म्हणाल्या.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp claims tension between priyanka gandhi and rahul gandhi congress rejected supriya shrinate criticizes bjp prd
Show comments