२०२४ मधील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि भाजपा ब्राह्मण समाजाची मते मिळवण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. काही योजना आखून, सत्तेतील खुर्चीची वचने देऊन या समाजाला प्रभावीत करण्याचा प्रयत्न सुरू आहे. हरियाणामध्ये ब्राह्मण समाजाची मते मिळण्यामागे असणारी कारणे आणि या समाजाचे राजकीय स्थान याबाबत जाणून घेणे महत्त्वाचे ठरेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

२०२४ ला लोकसभा आणि विधानसभा निवडणुका होणार आहेत. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विविध पक्ष मतदारांनाआकर्षित करण्याच्या प्रयत्नात आहेत. हरियाणामध्ये काँग्रेस आणि भाजप हे पक्ष ब्राह्मण समाजाला प्रभावीत करीत असून, त्याचा परिणाम ‘मतपेटीवर’ होईल, असा कयास आहे.

ब्राह्मण समाजाला आकर्षित करण्यासाठी चढाओढ

हरियाणात पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजपा आणि प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेस राज्यातील ब्राह्मण समाजापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहेत. काँग्रेसचे विरोधी पक्षनेते भूपिंदर सिंग हुडा यांनी, काँग्रेस जिंकल्यास चारपैकी एक उपमुख्यमंत्री ब्राह्मण समाजाचा असेल, अशी घोषणा केली; तर मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी लवकरच ब्राह्मण समुदायासाठी महाकुंभ आयोजित करण्यात येईल, असे आश्वासन दिले.

हेही वाचा : समलैंगिकतेचे समर्थन, मात्र विवाहाला विरोध; रा. स्व. संघाचे धोरण असे का ?

मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी सोमवारी कैथलमधील एका वैद्यकीय महाविद्यालयाला ब्राह्मण समाजाचे प्रमुख दैवत असणाऱ्या श्री परशुरामांचे नाव दिले आणि ११ डिसेंबर रोजी कर्नाल येथे ब्राह्मण समूहासाठी दुसरा महाकुंभ आयोजित करण्यात येईल, अशी घोषणा केली. २०२२ मध्येही कर्नालमध्ये महाकुंभ आयोजित करण्यात आला होता. या वर्षी एप्रिलमध्ये खट्टर यांनी श्री परशुराम यांच्या नावाचे टपाल तिकीट प्रकाशित केले आणि परशुराम जयंतीच्या दिवशी राज्यात सरकारी सुट्टी जाहीर केली.

मागील आठवड्यात रोहतकमध्ये एका कार्यक्रमामध्ये बोलताना विरोधी पक्षनेते आणि दोन वेळा मुख्यमंत्री राहिलेले भूपिंदर सिंग हुडा यांनी, २०२४ मध्ये काँग्रेसची सत्ता आल्यास चारपैकी एक उपमुख्यमंत्री ब्राह्मण समाजाचा असेल, असे सांगितले. जाट समूह अधिक प्रमाणात असणाऱ्या हरियाणामध्ये ब्राह्मण समाज १२ टक्के आहे. २०१४ मध्ये विधानसभा निवडणुकीत भाजपने ९० सदस्यसंख्या असणाऱ्या सभागृहात ४७ जागा जिंकून प्रथमच बहुमत गाठले होते. त्यामध्ये पक्षाचे राज्य प्रमुख राम बिलास शर्मा हे एक ब्राह्मण नेते होते. ते मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत असतानाही भाजपाने मुख्यमंत्रीपद मनोहर लाल खट्टर यांना दिले. २०१९ च्या निवडणुकीत राम बिलास शर्मा यांचा पराभव झाला.

हरियाणा आणि ब्राह्मण समाज

जाटबहुल असणाऱ्या हरियाणामध्ये ब्राह्मण समाज १२ टक्के आहे. हरियाणाचे पहिले मुख्यमंत्री ब्राह्मण समाजाचे भागवत दयाल शर्मा होते. हरियाणाची स्थापना झाल्यापासून म्हणजेच १ नोव्हेंबर १९६६ पासून ब्राह्मण समाजातील झालेले ते एकमेव मुख्यमंत्री होते. काही महिन्यांनंतर त्यांची जागा राव बिरेंदर सिंग यांनी घेतली. १९६८ पासून आजपर्यंत बहुतांश वेळा जाट नेत्यांनी हरियाणावर राज्य केले आहे आणि त्यात काही अपवाद म्हणजे विशाल हरियाणा पार्टीचे राव बिरेंदर सिंग, काँग्रेसचे बनारसी दास गुप्ता, भजन लाल आणि विद्यमान खट्टर आहेत.

”भाजपाने कधीही जातीचे राजकारण केलेले नसले तरीही हरियाणात जाट समूह भाजपला मतदान करीत नव्हता. सध्या हरियाणात तीन प्रमुख जाट नेते आहेत. काँग्रेसचे भूपिंदर सिंग हुडा, आयएनएलडीचे ओम प्रकाश चौटाला, अभय चौटाला व जेजेपीचे दुष्यंत चौटाला या तीन नेत्यांच्या गटांमध्ये जाट समूहाच्या मतांची विभागणी होण्याची शक्यता आहे. बनिया आणि पंजाबी समुदायांव्यतिरिक्त ब्राह्मण मतदारांना आकर्षित करण्याचे हे कारण आहे,” असे भाजपाच्या एका वरिष्ठ नेत्याने द इंडियन एक्स्प्रेसला सांगितले.
ब्राह्मण समूहाला आकर्षित करण्याच्या या धोरणामुळे भाजपामधील ब्राह्मण नेत्यांच्या आकांक्षाही वाढल्या आहेत. मागील वर्षी मे महिन्यात झालेल्या एका जाहीर सभेत भाजपाचे रोहतकमधील खासदार अरविंद शर्मा यांनी ब्राह्मण मुख्यमंत्री असावा, असे मत मांडले.

भाजपाचे राज्यसभेचे खासदार कार्तिकेय शर्मा हे डिसेंबरमध्ये होणाऱ्या महाकुंभासाठी जनसमूह गोळा करण्याकरिता हरियाणा दौर्‍यावर आहेत. आतापर्यंत त्यांनी या संदर्भात कर्नाल, पानिपत, काइंड, कैथल, चरखी दादरी, झज्जर, भिवानी, अंबाला व गुरुग्राम या प्रदेशांना भेट दिली आहे. काँग्रेसने, याबाबत भाजपा जातीचे राजकारण करून फूट पाडत आहे, असे मत नोंदवले आहे. हुडा यांनी द इंडियन एक्स्प्रेसला सांगितले, ”आम्ही विभाजनाचे जातीचे राजकारण करीत नाही. जातीच्या नावावर लोकांमध्ये फूट पाडणाऱ्या भाजपापेक्षा आम्ही सर्व समाजामध्ये प्रेम-समता पसरवीत आहोत.” हुडा यांनी, ब्राह्मण व्यक्तीला उपमुख्यमंत्री करणार, असे आश्वासन दिल्यावर राम बिलास शर्मा यांनी, ”आमची नजर ही उच्च आसनावर आहे”, असे सांगितले. त्यातूनच मुख्यमंत्री ब्राह्मण समाजाचा असावा, असे त्यांना सूचित करायचे होते.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp congress battle to win support of brahmin community in haryana vvk
Show comments