या वर्षाच्या अखेरीस तेलंगणा राज्यात विधानसभेची निवडणूक होणार आहे. सध्या येथे भारत राष्ट्र समिती (बीआएस) पक्षाची सत्ता असून मुख्यमंत्रिपदी के. चंद्रशेखर राव (केसीआर) हे आहेत. केसीआर यांना सत्तेवरून खाली खेचून या राज्यात सत्ता स्थापन करण्याचा काँग्रेस आणि भाजपाचा प्रयत्न आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षांकडून पूर्ण तकादीने जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जात आहे. दरम्यान १७ सप्टेंबर रोजी हैदराबाद संस्थान भारतात विलीन करण्यात आले होते. म्हणजेच १७ सप्टेंबर रोजी तेलंगणा राज्य भारतात विलीन झाले होते. त्यामुळे या दिवशी शक्तीप्रदर्शन करण्याचा प्रयत्न भाजपा आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांकडून होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

१७ सप्टेंबर दिनाचे महत्त्व काय?

१७ सप्टेंबर १९४८ रोजी हैदराबाद संस्थान भारतात विलीन करण्यात आले. या संस्थानात महाराष्ट्र, कर्नाटक राज्याचा काही भाग तसेच तेलंगणा राज्याचा सामवेश होता. भारताने ऑपरेशन पोलो या मोहिमेद्वारे भारतीय लष्कराच्या माध्यमातून हैदराबाद संस्थानवर हल्ला केल्यानंतर हे संस्थान भारतात विलीन करण्यात आले होते. हैदराबाद संस्थानचे शेवटचे निजाम मीर उस्मान अली खान यांची जाचक कर प्रणाली तसेच रझाकारांचा वाढता अत्याचार यामुळे या संस्थानधील जनता त्रासली होती. याच कारणामुळे या संस्थानमधील शेतकरी आणि कम्युनिष्टांनी मोठा लढा उभारला होता. या लढ्यामुळे येथील वातावरण ढवळून निघाले होते. पुढे याच अस्थिरतेमुळे भारताने हैदराबाद संस्थानवर लष्करी कारवाई करत हा प्रदेश भारतात विलीन केला होता. त्यामुळे १७ सप्टेंबर हा दिवस तेलंगणा राज्यासाठी महत्त्वाचा आहे.

भाजपा करणार शक्तिप्रदर्शन

या दिवसाचे महत्त्व ओळखून भाजपा पक्ष येथे मोठे शक्तिप्रदर्शन करण्याच्या प्रयत्नात आहे. सत्तेत आल्यापासून केसीआर सरकारने आतापर्यंत अधिकृतपणे हा दिवस साजरा केलेला नाही. मात्र २०२२ साली १७ सप्टेंबर हा दिवस ‘तेलंगाणा राष्ट्रीय एकता दिवस’ म्हणून साजरा केला जाईल, अशी घोषणा केली. मात्र भाजपाने आम्ही हा दिवस ‘तेलंगणा मुक्ती दिन’ म्हणून साजरू करू अशी भूमिका घेतलेली आहे. तेलंगणा हा प्रदेश याच दिवशी निजामाच्या तावडीतून मुक्त झाला होता, त्यामुळे तेलंगणा मुक्ती दिन साजरा करणे योग्य आहे, असे भाजपाचे मत आहे.

गेल्या वर्षी याच दिवशी भाजपाचे नेते तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी तेलंगणामध्ये एका मोठ्या सभेला संबोधित केले होते. यावेळी त्यांनी बीआरएस पक्षावर सडकून टीका केली होती. तर दुसरीकडे बीआरएस पक्षाने भाजपा या दिवसाचे राजकारण करू पाहात आहे, अशी टीका केली होती.

अमित शाह उपस्थित राहणार

या वर्षीदेखील भाजपाने १७ सप्टेंबर रोजी तेलंगणात मोठा कार्यक्रम आयोजित करण्याचे ठरवले आहे. या कार्यक्रमाला यावेळी अमित शाह उपस्थित राहणार आहेत. आपल्या या दौऱ्यात ते निजामाचे लष्कर आणि रझाकार यांच्याविरोधात लढताना जे भारतीय सैनिक हुतात्मा झाले होते, त्यांना आदरांजली वाहणार आहेत.

सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खरगे तेलंगणात

तर दुसरीकडे काँग्रेसदेखील या दिवशी तेलंगणात मोठे शक्तीप्रदर्शन करणार आहे. काँग्रेसने या दिवशी तेलंगणात काँग्रेसच्या कार्यकारी समितीची बैठक बोलावलेली आहे. याच दिवशी काँग्रेस तेलंगणाच्या जनतेला वेगवेगळी आश्वासनं देणार आहे. तसेच हैदराबाद जिल्ह्यातील तुक्कुगुडा येथे एका भव्य जाहीर सभेचे आयोजन केले जाणार आहे. काँग्रेसच्या या बैठकीला काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेसचे विद्यमान अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आदी महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत. याच दिवशी काँग्रेस पक्ष अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीच्या कल्याणासाठी स्वतंत्र घोषणा (आश्वासनं) करणार आहे.

बीआरएस पक्षाची काय तयारी?

सध्या सत्तेत असलेल्या बीआरएस पक्षानेदेखील आपल्या पातळीवर हा दिवस साजरा करण्यासाठी तयारी सुरू केली आहे. या दिवशी बीआरएस पक्ष त्यांच्या सरकारने केलेल्या कामाला लोकांपर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न करणार आहे. तसेच पक्षाचे कार्यकर्ते आपापल्या जिल्ह्यांत हा दिवस साजरा करणार आहेत. राज्याचे मंत्री राष्ट्रध्वज फडकावतील. तसेच सर्व ३३ जिह्यांत वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. केसीआर हैदराबादमध्ये एका कार्यक्रमात ध्वजारोहण करतील. या कार्यक्रमासाठीचे स्थळ अद्याप निश्चित झालेले नाही.

दरम्यान, या दिवसाचे राजकारण न करण्याची भूमिका, भूमिका बीआरएस पक्षाने घेतली आहे. तर केसीआर यांची कन्या के कविता १७ सप्टेंबर रोजी महिला आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा म्हणून एका रॅलीचे आयोजन करणार आहेत.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp congress brs mega show on 17 september in telangana prd