भंडारा : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या नेतेमंडळींनी साकोली विधानसभा मतदारसंघ काबीज करण्याचा जणू चंग बांधला आहे. कारण, हा मतदारसंघ एकेकाळी भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा. मात्र, मागील दशकभरात या मतदारसंघात बरीच उलथापालट झाली. ती पाहता भाजपला साकोलीचा ‘गड’ पुन्हा काबीज करणे कठीणच जाईल अशी चिन्हे आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले येथील आमदार असून त्यांच्याविरोधात तुल्यबळ उमेदवार सापडेना, अशी स्थिती तूर्त भाजपमध्ये आहे.
२००९ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसमधून आलेल्या पटोले यांना भाजपने उमेदवारी दिली. पटोले भाजपचे उमेदवार का झाले यामागची पार्श्वभूमी थोडी वेगळी आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघाची रचना बदलली होती. मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर पटोलेंचा लाखांदूर मतदारसंघ साकोली मतदारसंघात समाविष्ट करण्यात आला. त्यावेळी काँग्रेसचे सेवक वाघाये साकोली विधानसभेचे आमदार होते. त्यांना डावलून काँग्रेस आपल्याला उमेदवारी देणार नाही, याची जाणीव झाल्याने पटोले यांनी भाजपमध्ये प्रवेश केला, असे राजकीय जाणकार सांगतात.
आणखी वाचा-विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे ‘भारत जोडो’ अभियानाला साकडे
पटोले भाजपमध्येही फार काळ रमले नाहीत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपविरोधात बंड पुकारले आणि पुन्हा काँग्रेसमध्ये पुनर्प्रवेश केला. पटोले यांनी २०१९ ची लोकसभा निवडणूक थेट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याविरोधात नागपुरातून लढवली, पण त्यांचा पराभव झाला. नंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पटोले काँग्रेसकडून साकोलीतून लढले. त्यांच्याविरोधात भाजपने तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खास मर्जीतले परिणय फुके यांना उमेदवारी दिली होती. स्थानिक विरुद्ध आयात, अशी ही लढत होती. ती अटीतटीचीच झाली. फुके त्यावेळी भंडारा-गोंदियाचे पालकमंत्री होते, तर पटोले काँग्रेसचे ‘हेवीवेट’ नेते होते. दुसरीकडे, विद्यमान आमदार वाघाये यांनी बंडखोरी करत वंचित बहुजन आघाडीकडून विधानसभा निवडणूक लढवली. यामुळे साकोलीतील लढतीला तिरंगी वळण प्राप्त झाले. तरीही पटोले यांनी ही निवडणूक जिंकून काँग्रेसमधील आपले स्थान अधिकच मजबूत केले.
आणखी वाचा-चिपळूणमध्ये भास्कर जाधव यांच्या विरोधात कोण लढणार ?
भाजपने फुके यांना नुकतेच विधानपरिषदेत पाठवून साकोलीतून नवीन उमेदवार दिला जाईल, असे संकेत दिले आहेत. कारण, आयात नव्हे, स्थानिक उमेदवारच पटोले यांना तुल्यबळ लढत देऊ शकतो, अशी स्थानिक भाजप नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची भावना आहे. भाजपकडे इच्छुकांची लांबलचक यादी आहे. मात्र, साकोलीसह संपूर्ण भंडारा जिल्ह्यात पटोले यांनी जे राजकीय वर्चस्व प्रस्थापित केले आहे, ते मोडीत काढण्याइतका प्रभावी नेता भाजपला अद्याप गवसलेला नाही! यामुळे साकोलीचा ‘गड’ सर करणे भाजपसाठी कठीणच मानले जात आहे.