BJP Politics News : गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला मोठा फटका बसला. मात्र, त्यानंतर महाराष्ट्र, हरियाणा व झारखंड या राज्यांतील विधानसभा निवडणुका जिंकून पक्षाने जोरदार पुनरागमन केलं. इतकंच नाही, तर दिल्ली विधानसभा निवडणुकीतही भाजपानं आपल्या विजयाचा सिलसिला कायम ठेवला. अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीला सत्तेतून बाजूला सारून भाजपानं तब्बल २७ वर्षांनंतर राजधानीत सत्ता स्थापन केली. आता पक्षाचे पुढील लक्ष्य बिहार निवडणूक आहे. मात्र, त्याआधीच भाजपामध्ये अंतर्गत वाद उफाळून आला आहे. अनेक राज्यांत पक्षातील नेत्यांमध्ये मतभेद होत असल्याचं दिसून येत आहे. उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री व लोकसभा खासदार त्रिवेंद्र सिंह रावत यांनी संसदेत बोलताना आपल्याच पक्षाला घरचा आहेर दिला आहे. उत्तराखंडमध्ये मोठ्या प्रमाणात बेकायदा खाणकाम होत असल्याचं सांगून त्यांनी आपल्याच पक्षातील नेत्यांवर अप्रत्यक्ष टीका केली आहे.
भाजपा नेत्यांमध्ये मतभेद का?
दुसरीकडे उत्तर प्रदेशमधील लोणीचे आमदार नंदकिशोर गुर्जर यांनी अलीकडेच योगी आदित्यनाथ सरकारला लक्ष्य केलं होतं. त्यावरून भाजपा पक्षश्रेष्ठींनी त्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे. कर्नाटकमध्येही भाजपाच्या नेत्यांमध्ये अंतर्गत वाद उफाळून आला आहे. माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा, त्यांचे पुत्र व राज्य भाजपा प्रमुख बी. वाय. विजयेंद्र यांच्यावर टीका केल्याप्रकरणी पक्षश्रेष्ठींनी आमदार बसनगौडा पाटील यत्नल यांची हकालपट्टी केली आहे. भाजपाच्या अंतर्गत सूत्रांनी सांगितले की, पक्षाच्या राज्य युनिट्समधील गटबाजी समोर येण्याचे एक कारण म्हणजे पक्षात होत असलेली इनकमिंग आहे.
माजी मुख्यमंत्र्यांचा सरकारला घरचा आहेर
दुसऱ्या पक्षातून भाजपात आलेल्या नेत्यांना मोठमोठ्या जबाबदाऱ्या दिल्या जात आहेत. त्यामुळे पक्षाशी एकनिष्ठ असलेल्या नेत्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. उत्तराखंडमध्ये भाजपा नेत्यांमध्ये मतभेद होण्याचं प्रकरण थोडं वेगळं आहे. “त्रिवेंद्र सिंह रावत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्र्यांसमोर संसदेतच राज्यातील पक्षनेतृत्वावर बोट ठेवलं आहे. उत्तराखंडमध्ये सर्रासपणे बेकायदा खाणकाम सुरू असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्र्यांकडून केला जातोय. त्यामुळे हे प्रकरण खूपच गंभीर आहे”, अशी चिंता भाजपाच्या एका नेत्यानं व्यक्त केली आहे.
आणखी वाचा : RSSचा निर्णय, आता महिला शासकांचीही जयंती होणार साजरी; लक्ष महिला मतदारांवर?
उत्तराखंडमध्ये भाजपात दुफळी
दरम्यान, उत्तराखंडमधील भाजपा नेत्यांमधील संबंध दिवसेंदिवस ताणले जात आहेत. त्यामागचं कारण म्हणज रावत हे सातत्यानं राज्याच्या खाण विभागाचे सचिव ब्रजेश संत यांना लक्ष्य करीत आहेत. त्यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना सचिवांनी एक तथ्य पत्रक जाहीर केलं. त्यावर पत्रकारांनी रावत यांना विचारलं असता, “वाघ कुत्र्याची शिकार करीत नाही”, असं उत्तर त्यांनी दिलं. रावत हे उच्चवर्णीय ठाकूर आणि ब्रजेश संत हे दलित असल्यानं त्यांच्या वक्तव्याला जातीयवादी ठरवण्यात आलं. त्यानंतर उत्तराखंड आयएएस असोसिएशननं रावत यांच्या विधानाबाबत निषेध व्यक्त केला.
भाजपाने मुख्यमंत्री कसे बदलले?
आयएएस असोशिएशननं रावत यांच्याविरोधात केलेलं आंदोलन मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांचा आशीर्वादानंच झालं होतं, असं सांगितलं जात आहे. उत्तराखंडमध्ये भाजपा नेत्यांमध्ये पडलेल्या दुफळीवर बोलताना पक्षातील एका वरिष्ठ नेत्यानं नाराजी व्यक्त केली आहे. “हे राज्य भाजपाशासित राज्यासारखं वाटत नाही”, असं त्यांनी म्हटलं आहे. तसं पाहता, भाजपाला उत्तराखंडमध्ये नेहमीच गटबाजीचा सामना करावा लागला आहे. २००७ मध्ये जेव्हा पक्षानं राज्यात सत्ता स्थापन केली, तेव्हा निवृत्त मेजर जनरल बी. सी. खंडुरी यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. मात्र, त्यांचा कार्यकाळ फक्त दोन वर्षंच टिकला. २००९ मध्ये त्यांची जागा रमेश पोखरियाल निशंक यांनी घेतली. २०११ मध्ये विधानसभा निवडणुकीच्या अवघ्या पाच महिन्यांपूर्वी खंडुरी यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्यात आलं.
रावत यांच्या निराशेचं कारण काय?
२०१७ मध्ये भाजपाला पुन्हा उत्तराखंडची सत्ता मिळाली. त्यावेळी पक्षानं त्रिवेंद्र सिंह रावत यांना मुख्यमंत्रिपदाचा मान दिला. त्याआधी त्यांनी राज्यातील विविध मंत्रिपदं भूषवली होती. २०२१ पर्यंत रावत हे मुख्यमंत्री पदावर कायम राहिले. मात्र, विधानसभा निवडणुकीला केवळ चार महिने शिल्लक असताना त्यांची जागा लोकसभा खासदार तिरथसिंग रावत यांनी घेतली. रावत २०१७ ते २०२१ या कालावधीत उत्तराखंडचे मुख्यमंत्री होते. त्याआधी ते राज्यातील विविध विभागांत मंत्री म्हणूनही कार्यरत होते. दरम्यान, २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपानं राज्यात पुन्हा सत्तेत येण्याची किमया करून दाखवली. त्यानंतर पुष्कर सिंह धामी यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.
हेही वाचा : Prakash Karat interview : भाजपाला निवडणूक जिंकण्यासाठी संघ कशी मदत करतो? विरोधीपक्ष कुठे कमी पडतात?
मुख्यमंत्री धामींवर भाजपा हायकमांड नाराज?
विशेष बाब म्हणजे या निवडणुकीत धामी यांचा खतिमा मतदारसंघातून पराभव झाला होता. त्यांच्या पराभवाचं कारण पक्षातील अंतर्गत मतभेद असल्याचं सांगितलं जातं. पराभवानंतरही धामी यांना मुख्यमंत्री करण्यात आलं. मात्र, त्यांच्या टीकाकारांचं म्हणणं आहे की, भाजपा हायकमांड त्यांच्या नेतृत्वावर फारशी खूश दिसून येत नाही. पक्षाच्या एका खासदारानं सांगितलं, “मुख्यमंत्री धामी दिल्लीला वारंवार भेट देतात, जिथे ते केंद्रीय नेत्यांशी भेटून त्यांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न करतात. त्यांचे सरकार अजूनही चांगले काम करीत नाही. तळागाळातील लोकांच्या प्रश्नांबाबत योग्य रीत्या काम करण्यात ते अपयशी ठरत आहेत.”
भाजपाचे नेते काय म्हणाले?
दरम्यान, लोकसभा खासदार व राज्याचे माजी मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी धामी यांच्यावर केलेल्या आरोपांमध्ये काही तथ्य नसल्याचं भाजपाच्या एका नेत्यानं सांगितलं. “रावत हे जाणूनबुजून धामी यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. याद्वारे त्यांची मुख्यमंत्री पदावरून हकालपट्टी केली जाईल आणि त्यांची जागा रावत यांना घेता येईल”, असंही ते म्हणाले. उत्तराखंडमध्ये जसे भाजपाच्या नेत्यांमध्ये मतभेद आहेत, तसेच मतभेद उत्तर प्रदेशातही असल्याचे दिसून येत आहे.
उत्तर प्रदेशात भाजपामध्ये कशामुळे वाद?
योगी आदित्यनाथ सरकारवर टीका करणारे भाजपाचे आमदार गुर्जर हे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांचे निकटवर्तीय आहेत. मौर्य यांचे मुख्यमंत्र्यांशी असलेले संबंध काही दिवसांपासून ताणले गेले आहेत. कर्नाटकातील आमदार यत्नल यांची हकालपट्टी करून भाजपानं आपण येडियुरप्पा आणि विजयेंद्र यांच्या पाठीशी असल्याचं दाखवून दिलं आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यांवर अनेकदा तीक्ष्ण टिप्पणी करणारे यत्नल आता हिंदूंच्या रक्षणासाठी नवीन पक्ष सुरू करण्याची शक्यता आहे. पक्षातील नेत्यांमध्ये निर्माण झालेले मतभेद मिटविण्यासाठी भाजपा हायकमांड काय निर्णय घेणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.