गुजरात विधानसभा निवडणूक तोंडावर आली आहे. विविध राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. दरम्यान, सत्ताधारी भारतीय जनता पार्टीतही बदलाचे वारे वाहू लागले आहेत. राजकोट येथून लढलेल्या चारही विद्यमान आमदारांना भाजपानं डच्चू दिला आहे. त्यांच्याऐवजी नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. असं असलं तरी भाजपानं संबंधित आमदारांना व्यासपीठावर बसवून त्यांचा मान राखला आहे.
यंदा उमेदवारी न मिळालेले संबंधित चारही आमदार व्यासपीठावर असताना केंद्रीय आरोग्य मंत्री आणि भाजपा नेते मनसुख मांडविया म्हणाले की, हा भाजपा आणि इतर राजकीय पक्षातील फरक आहे. संबंधित आमदारांना यंदा भाजपाकडून उमेदवारी देण्यात आली नाही, तरीही त्यांच्या चेहऱ्यावर राग किंवा द्वेष दिसत नाही, हे कार्यकर्त्यांवरील संस्कार दर्शवतात.
“या शहरातील असंख्य कार्यकर्त्यांनी पक्षाकडे निवडणुकीची तिकीटं मागितली होती, पण अनेकांना तिकीटं मिळाली नाहीत. केवळ चार कार्यकर्त्यांना तिकीटं मिळाली आहेत. काही विद्यमान आमदारांनाही तिकीट मिळालं नाही. पण त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव, बोलणं, वाक्य, शब्द, भाषा आणि स्वर हे त्यांचे संस्कार (सद्गुण) दर्शवतात, असे माझे निरीक्षण आहे. त्यांना उमेदवारी मिळाली नसली तरी आपला कार्यकर्ता विजयी करायचा, अशी त्यांची भूमिका आहे” असंही मांडविया म्हणाले.
राजकोट (पश्चिम) चे विद्यमान आमदार विजय रुपाणी यांना गेल्यावर्षी एका रात्रीत मुख्यमंत्रीपदावरून हटवण्यात आले होते. आता ते या निवडणुकीच्या स्पर्धेतूनही बाहेर पडले आहेत. रुपाणी यांच्यासह राजकोट (पूर्व)चे विद्यमान आमदार आणि परिवहन राज्यमंत्री अरविंद रैयानी, राजकोट (दक्षिण) चे आमदार गोविंद पटेल आणि राजकोट (ग्रामीण) चे आमदार लखाभाई सगठिया आदि नेत्यांना भाजपानं उमेदवारी नाकारली आहे. संबंधित नेत्यांऐवजी नवख्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे.