विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या तेलंगणा राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. सध्या येथे भारत राष्ट्र समिती (बीआरएस) पक्षाची सत्ता असून काँग्रेस आणि भाजपा ही निवडणूक जिंकण्यासाठी स्वतंत्रपणे प्रयत्न करत आहेत. दरम्यान, येथे ३० नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून त्यासाठी भाजपाने नुकतीच आपल्या उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत भाजपाने एकूण ३५ जागांसाठी उमेदवारांची नावे जाहीर केली असून या यादीत भाजपाने मागास प्रवर्गातील नेत्यांना उमेदवारी देण्यास प्राधान्य दिले आहे.
तेलंगणात ११९ जागांसाठी निवडणूक
भाजपाने गुरुवारी (२ नोव्हेंबर) आपल्या उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत एकूण ३५ उमेदवारांची नावे आहेत. यामध्ये अभिनेते आणि राजकारणी पी बाबू मोहन, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे सदस्य मारी शशिधर रेड्डी, तेलंगणा भाजपाचे उपाध्यक्ष येंदला लक्ष्मीनारायणा, माजी मंत्री सी कृष्ण यादव, माजी आमदार एनव्हीएसएस प्रभाकर यांचा समावेश आहे. आपल्या तिसऱ्या यादीनंतर भाजपाने जाहीर केलेल्या उमेदवारांची संख्या ही ८८ वर पोहोचली आहे. तेलंगणात ३० नोव्हेंबर रोजी ११९ जागांसाठी मतदान होणार आहे. पहिल्या यादीत भाजपाने ५२ तर दुसऱ्या यादीत केवळ एका उमेदवाराचे नाव जाहीर केले होते.
अद्याप ३१ जागांसाठी उमेदवारांची घोषणा बाकी
भाजपाने अद्याप ३१ जागांसाठी उमेदवारांची घोषणा केलेली नाही. आगामी काळात बीआरएस आणि काँग्रेस या पक्षांतील काही नेते बंडखोरी करण्याची शक्यता आहे. या बंडखोरी केलेल्या नेत्यांना सामावून घेण्यासाठी या जागांचा वापर केला जाऊ शकतो. तसेच अभिनेते आणि राजकारणी के पवन कल्याण यांच्या जन सेना पार्टी (जेएसपी) या पक्षाशीदेखील भाजपाची बोलणी सुरू आहे. त्यामुळे युती झाल्यास याच ३१ जागांतील काही जागा जेएसपी पक्षाला दिल्या जाण्याची शक्यता आहे. भाजपाने आपल्या तिसऱ्या यादीत मागासवर्गातील १३, अनुसूचित जमातीतील ३, अनुसूचित जातीतील ५ आणि खुल्या प्रवर्गातील १४ नेत्यांना उमेदवारी दिली आहे.
५२ पैकी २० उमेदवार मागासवर्गीय
भाजपाने जाहीर केलेल्या आपल्या पहिल्या यादीतील एकूण ५२ उमेदवारांपैकी २० उमेदवार हे मागास प्रवर्गातील आहेत. भाजपाचे नेते अमित शाह यांनी नुकतेच आम्ही निवडून आल्यास मागासवर्गीय नेत्याला मुख्यमंत्रीपद देऊ, अशी घोषणा केली होती. त्यानंतर आता तिसऱ्या यादीत भाजपाने अनेक मागासवर्गीय नेत्यांना तिकीट दिले आहे. भाजपाने जाहीर केलेल्या तिसऱ्या यादीत फक्त सी श्रीलता रेड्डी या एकमेव महिला उमेदवार आहेत. त्यांना हुजूरनगर या मतदारसंघासाठी तिकीट देण्यात आले आहे.
बाबू मोहन भाजपाला ठोकणार होते रामराम, पण….
गेल्या काही दिवसांपासून बाबू मोहन हे भाजपाचे नेते तसेच भाजपावर टीका करत होते. २८ ऑक्टोबर रोजी बोलताना त्यांनी मी भाजपा पक्षाला रामराम ठोकणार असल्याचे सांगितले होते. तसेच मी भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवणार नाही, असेही जाहीर केले होते. त्यांनी तेलंगणा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष जी किशन रेड्डी यांच्यावरही टीका केली होती. मात्र पक्षविरोधी भूमिका घेऊनही भाजपाने त्यांना तिकीट दिले आहे. जी विवेकानंद कोमातीरेड्डी, राजगोपाल रेड्डी या नेत्यांनी नुकतेच भाजपाला सोडचिठ्ठी देऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यानंतर बाबू मोहन हेदेखील भाजपा सोडण्याच्या तयारीत होते. त्यामुळे बाहू यांच्या जाण्याने होणारी संभाव्य पडझड रोखण्यासाठी भाजपाने त्यांना तिकीट दिले आहे. बाबू मोहन हे संगारेड्डी जिल्ह्यातील आंदोले मतदारसंघातून निवडणूक लढवतील.
बाबू मोहन हे एन. चंद्राबाबू नायडू यांच्या सरकारमध्ये मंत्री
बाबू मोहन हे यापूर्वी भारत राष्ट्र समिती या पक्षाकडून आमदार राहिलेले आहेत. आंदोले या मतदारसंघातूनच ते याआधी टीडीपी पक्षाकडून दोन वेळा आमदार राहिलेले आहेत. एन. चंद्राबाबू नायडू यांच्या सरकारमध्ये ते कामगारमंत्री होते. २००४ आणि २००९ सालच्या निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराने त्यांचा पराभव केला होता. आंध्र प्रदेशचे विभाजन होण्यापूर्वी त्यांनी टीडीपी पक्षातून बीआरएस पक्षात प्रवेश केला होता.
जेएसपीला हव्या असणाऱ्या जागांवर दिले उमेदवार
दरम्यान, भाजपा आणि जेएसपी या दोन पक्षांत युतीसाठी बोलणी सुरू आहे. जेएसपीने भाजपाकडे काही जागांची मागणी केली आहे. मात्र एकीकडे चर्चा सुरू असताना भाजपाने दुसरीकडे जेएसपीला हव्या असणाऱ्या जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत. यात उप्पल, लाल बहादूर शास्त्री नगर, जुबली हील्स, पिनापाका (एसटी), साटुपाली (एससी) या जागांचा समावेश आहे. त्यामुळे या दोन पक्षांत युती होणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.