संतोष प्रधान

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गेल्या दोन ते तीन वर्षांत भाजपला बालेकिल्ल्यांमध्येच पराभवाचे धक्के सहन करावे लागले आहेत. नव्याने कसबा पेठ मतदारसंघाचा समावेश त्यात झाला आहे.कसबा पेठ विधानसभा मतदारसंघ १९८५ पासून भाजपच्या ताब्यात होता. आधी अण्णा जोशी निवडून आले होते. त्यानंतर १९९० पासून गिरीश बापट हे सातत्याने निवडून आले. २०१९ मध्ये बापट लोकसभेवर निवडून गेल्यावर कसब्यातून भाजपच्या मुक्ता टिळक निवडून आल्या होत्या. जवळपास ३८ वर्षे भाजपच्या ताब्यात असलेल्या या मतदारसंघात काँग्रेसच्या रविंद्र धंगेकर यांनी विजय प्राप्त केला. जवळपास चार दशके ताब्यात असलेला बालेकिल्ला भाजपला गमवावा लागला.

हेही वाचा… नागपूरकरांची मते जिंकण्यासाठी भाजप काय जादू करणार ?

हेही वाचा… निवडणूक आयुक्तांच्या नेमणुकीसाठी ‘विशेष समिती,’ सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे विरोधकांकडून स्वागत!

गेल्याच महिन्यात नागपूर शिक्षक हा मतदारसंघही भाजप किंवा सहयोगी शिक्षक संघटनेला गमवावा लागला. याआधी नागपूर पदवीधर या पारंपारिक मतदारसंघात भाजपचा पराभव झाला. पुणे पदवीधर हा मतदारसंघही भाजपच्या ताब्यातून गेला. एकेकाळी पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांमध्ये भाजप किंवा सहयोगी आघाड्यांचे वर्चस्व होते. अमरावती पदवीधर हा गेली १२ वर्षे ताब्यात असलेल्या मतदारसंघातही भाजपचा पराभव झाला. नाशिक पदवीधर हा एकेकाळी भाजपचा बालेकिल्ला होता. पण तो मतदारसंघ आता ताब्यात राहिलेला नाही. यंदा तर भाजपकडे तगडा उमेदवारच नव्हता. सध्या पदवीधर आणि शिक्षकच्या १४ पैकी केवळ दोनच मतदारसंघांमध्ये भाजपचे आमदार आहेत.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp defeated in elections in its bastion assembly constituency print politics news asj