दिगंबर शिंदे
महापौर निवडीवेळी भाजपमध्ये फूट पाडून भाजपला सत्तेवरून पायउतार होण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा डाव भाजपने स्थायी सभापती निवडीवेळी उलटवून परतफेड सव्याज केली आहे. स्थायी समितीमध्ये भाजपचेच बहुमत असले तरी राष्ट्रवादीचे दोन सदस्य सभापती निवडीवेळी गैरहजर राहिल्याने काँग्रेस व राष्ट्रवादीमध्ये आता दुरावा निर्माण झाल्याचे चित्र निर्माण करण्यात भाजप यशस्वी ठरला आहे. यामुळे वर्षभरावर आलेल्या निवडणुका दोन्ही काँग्रेसच्यादृष्टीने सोप्या तर नसणारच पण अस्तित्वाचा प्रश्न उपस्थित करणाऱ्या ठरतील याची चुणूक स्थायी सभापती निवडीवेळी झालेल्या घडामोडीने दिली आहे.
दीड वर्षा पूर्वी झालेल्या महापौर निवडीवेळी भाजपच्या तंबूतील सात सदस्य फोडून काँग्रेसच्या मदतीने राष्ट्रवादीने सत्ता बदल घडवून आणला. याला केवळ महापालिकेतील सत्तासंघर्षच कारणीभूत होता असे नाही, तर राज्यामध्ये झालेला सत्ताबदल हे मूळ कारण होते. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यामुळे महापालिकेत भाजपला सत्तेवरून पायउतार करण्यास पोषक स्थिती निर्माण झाली होती. याचा नेमका फायदा उठवत राष्ट्रवादीने संख्याबळ कमी असताना विरोधकांच्या तंबुतील कुमक आणण्याच्या अटीवर महापौर पदावर दावा सांगून पद पटकावले. मात्र, गेल्या दीड वर्षात केवळ उपमहापौर पदच काँग्रेसच्या वाट्याला आले असताना स्थायी सभापतीची संधी काँग्रेसला देणार या गाजरावर राष्ट्रवादी सत्ता भोगत आहे. याचे शल्य काँग्रेसला अगोदरपासून आहेच, मात्र, बोलता येत नाही आणि सहनही होत नाही अशी अवस्था काँग्रेसची झाली आहे.
हेही वाचा… कुकडी प्रकल्पातील पाणीप्रश्न पेटण्याची चिन्हे, नगर विरुद्ध पुणे वादाची फोडणी
सत्तेत सहभागी असतानाही निर्णय प्रक्रियेमध्ये काँग्रेसला फारसे स्थान नाही. घनकचरा प्रकल्पामध्येही काँग्रेसला फारसे महत्व का दिले जात नाही याचे शल्य तर आहेच, पण पक्षाचे नेते सांगतात म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या पंगतीला बसण्याची वेळ काँग्रेसवर आली आहे. त्यात काँग्रेस अंतर्गत तीन गट असल्याने याचा नेमका फायदा राष्ट्रवादी घेत आली. याचा फटका पक्षास तर बसतोच आहे, पण सदस्यांची नाराजीही वेळोवेळी डोके वर काढत आहे. महापौर पदाची होत असलेली मागणीही त्याचाच एक भाग आहे.
हेही वाचा… Video : “मी मिसेस केजरीवाल यांना हात जोडून सांगतो, तुमच्याशिवाय या माणसाला…”, भाजपा खासदाराचा टोला!
राष्ट्रवादीने महापौर पदावर हक्क सांगत असताना उपमहापौर आणि स्थायी सभापती पद काँग्रेसला देणार असा शब्द दिला होता. उपमहापौरांची निवड महापौराबरोबरच झाल्याने त्यावेळी एवढी एकच संधी काँग्रेसला मिळाली. मात्र, स्थायी सभापती निवडीवेळी भाजपमधील असंतुष्टांना आपल्याकडे खेचण्याचे काम काँग्रेसलाच करावे लागणार होते. मात्र, यासाठी लागणारी ताकद काँग्रेस नेत्यांकडून मिळू शकली नाही हीसुध्दा वस्तुस्थिती आहे. मात्र पद पाहिजे तर त्यासाठी करावी लागणारी यातायात त्यांनीच करावी अशी राष्ट्रवादीची भूमिका रास्त असली तरी यामागेही पक्षांतर्गत कुरघोडीचे राजकारणही महत्वाचे ठरले आहे.
स्थायी समितीमध्ये भाजपचे ९ तर काँग्रेसचे ४ आणि राष्ट्रवादीचे ३ सदस्य आहेत. बुधवारी सभापती निवडीवेळी आघाडीची सर्व मते काँग्रेसचे उमेदवार संतोष पाटील यांना पडली असती तरी भाजपचे संख्याबळ अधिक असल्याने त्यांचाच सभापती होणार हे कागदोपत्री स्पष्ट आहे. मात्र भाजपमधील उणिवा शोधून वर्मी घाव घालून जसे राष्ट्रवादीने महापौर पद पटकावले तसे काँग्रेसला करता आले नाही. काँग्रेसचा उमेदवार पराभूत झाला याचे शल्य काँग्रेसला फारसे नाही, कारण कागदोपत्री संख्येचे गणित जमतच नव्हते. तथापि, राष्ट्रवादी काँग्रेसच्या संगीता हारगे आणि पवित्रा केरीपाळे या दोन सदस्या जाणीवपूर्वक गैरहजर राहिल्या. जेणेकरून राष्ट्रवादी फोडाफोडी करू शकते तर आम्हीही जशास तसे उत्तर देऊ शकतो हेच भाजपला दाखवायाचे होते. राष्ट्रवादीचा ‘कार्यक्रम’ करण्यात भाजपला यश आले.
हेही वाचा… …तर नोटांवरही मोदींचाच फोटो छापला असता; अहमदाबादमधील कॉलेजला पंतप्रधानांचे नाव देण्याने वाद
आता या दोन सदस्यांना अपात्रतेबाबत कारणे दाखवा नोटीसा राष्ट्रवादीने बजावल्या आहेत. हा प्रकार म्हणजे बैल गेला आणि झोपा केला असाच आहे. भाजपने कारवाईचा प्रस्ताव दिलेल्या नगरसेवकांचा गेली दीड वर्षे झाले निकाल लागलेला नाही, आता या दोन सदस्याबाबत तात्काळ निर्णय होणेही अपेक्षित नाही. वर्षभरावर निवडणुका आल्या आहेत, तोपर्यंत आयर्विन पूलाखालून बरेच पाणी वाहून जाणार आहे.
स्थायी सदस्य पदासाठी हारगे व नर्गिस सय्यद यांना एक वर्षासाठी संधी देण्यात आली होती. मुदत संपताच दोघींना राजीनामा देण्यास सांगण्यात आले. मात्र, हारगे यांनी राजीनामा देण्यास नकार दिला तर सय्यद यांनी राजीनामा दिलेला असतानाही त्यांना पुन्हा संधी देण्यात आली. पक्षांतर्गत गटबाजीतून हे घडले. आताही राष्ट्रवादी अंतर्गत असलेल्या गटबाजीतून या दोन सदस्यांनी दांडी मारल्याचे सांगितले जात असले तरी त्याला प्रत्युत्तर म्हणून अपात्रतेच्या नोटीसा बजावण्यात आल्याचे बोलले जात आहे.
राष्ट्रवादीचा अंतर्गत मामला
स्थायी समितीमध्ये आमचे स्पष्ट बहुमत असल्याने आम्हाला बाहेरून मदत घेण्याची गरजच नव्हती. मतामधून भाजप एकसंघ असल्याचे स्पष्ट झाले असून राष्ट्रवादीचे दोन सदस्य हे अंतर्गत वादातून गैरहजर राहिले असण्याची शययता असून तो त्यांचा अंतर्गत मामला आहे – शेखर इनामदार, नगरसेवक, भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य
राष्ट्रवादीने दगा दिला
स्थायी सभापती निवडीवेळी आवश्यक संख्याबळाची जुळणी काँग्रेसने केली होती. मात्र, अखेरच्या क्षणी राष्ट्रवादी काँग्रेसने दगा दिला. संयुक्त बैठकीमध्ये आघाडीच्या उमेदवारांच्या मागे ठामपणे राहण्याचे शब्द देऊनही दोन सदस्य गैरहजर राहिले. याबाबत सर्व घडामोडी पक्षाच्या नेत्यांना सांगून पुढील भूमिका निश्चित केली जाईल – संजय मेंढे, गटनेते काँग्रेस