उमाकांत देशपांडे

मुंबई : भाजपने राज्यात लोकसभेबरोबरच स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणुकीचीही तयारी सुरू केली आहे. भाजपकडे विधानसभेसाठी १६५ तगडे उमेदवार असून शिवसेना (शिंदे गट) आणि अपक्ष असे ५० आमदार गृहीत धरल्यास भाजपला ७३ मतदारसंघांसाठी मातब्बर नेत्यांची गरज भासणार आहे. त्यादृष्टीने वरिष्ठ नेत्यांशी त्यांच्याबरोबर चाचपणी व बोलणी सुरू आहेत, असे पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी सांगितले.

राज्यात विधानसभेच्या २८८ जागा असून त्यापैकी १६५ जागांवर विद्यमान आमदार आणि पक्षातील अन्य नेत्यांचा जिंकण्याची शक्यता गृहीत धरून विचार होऊ शकतो. तर शिंदे गटातील आमदार व अपक्ष आमदार अशा ५० जागा आहेत. उर्वरित ७३ जागांवर भाजपकडे योग्य उमेदवार नाहीत किंवा पक्षाची निवडणूक जिंकण्याची ताकद नाही, असे पक्षाकडून सुरू असलेल्या सर्वेक्षणात आढळून आले आहे. त्यामुळे या मतदारसंघात अन्य पक्षातील मातब्बर नेत्यांना भाजपबरोबर आणण्यावर पक्षाची भिस्त असणार आहे. भाजप आणि शिंदे गटाबरोबर जागावाटप झाले नसले तरी उद्धव ठाकरे बरोबर असताना जेवढ्या जागा दिल्या होत्या, तेवढ्या जागा दिल्या जाणार नाहीत. अन्य घटकपक्षांचा विचार करता जास्तीत जास्त ७०-८० जागा दिल्या जाऊ शकतील. लोकसभा निवडणुका झाल्यावर आणि केंद्रात पुन्हा मोदी सरकार आल्यावर भाजपमध्ये येऊ इच्छिणाऱ्या नेत्यांची संख्या वाढेल. तेव्हा ७३ मतदारसंघाचा विचार करून अन्य पक्षातील नेत्यांना भाजपमध्ये किंवा गरजेनुसार शिंदे गटात प्रवेश देण्यावर विचार होईल आणि त्यादृष्टीने शोध सुरू आहे, असे पक्षातील सूत्रांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेही वाचा… भाजप, काँग्रेस प्रवास केलेले आशिष देशमुख पुन्हा भाजपवासी ?

अन्य पक्षातील काही चांगले नेते भाजपमध्ये येण्यास तयार आहेत, काही नेते त्या पक्षात नाराज आहेत, तर काही नेत्यांच्या केंद्रीय तपास यंत्रणांकडून चौकशा सुरू आहेत. हे पाहता पुढील काही महिन्यात भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या नेत्यांचा ओघ वाढेल, असे सूत्रांनी नमूद केले.