महेश सरलष्कर
कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा प्रचार थंडावला असून बुधवारी होणाऱ्या मतदानाकडे भाजपचे लक्ष असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या झंझावाती प्रचारानंतर कर्नाटकमध्ये काँग्रेसविरोधातील प्रामुख्याने चार मुद्द्यांवर भाजपची मदार असल्याचे स्पष्ट झाले. या चारही मुद्द्यांची खैरात काँग्रेसनेच भाजपला वाटली आहे.
कर्नाटकमध्ये लिंगायत समाजाच्या मतांवर भाजपच्या यशापयशाची शक्यता अवलंबून आहे. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई तसेच, दिग्गज नेते येडियुरप्पा हे दोघेही लिंगायत समाजातील आघाडीचे नेते आहेत. भाजपचा भर लिंगायत मतदारांवर राहिलेला आहे. लिंगायत मतदार खेचून घेण्याचा प्रयत्न काँग्रेसने केले होता. मात्र, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांनी बोम्मई सरकारच्या भ्रष्टाचारावर टीका करताना लिंगायत समाजाला अप्रत्यक्ष लक्ष्य केले. सिध्दरामय्यांच्या टिप्पणीचा वेगळा अर्थ काढला गेला. लिंगायत समाज भ्रष्ट असल्याचे सिद्धरामय्या म्हणत असल्याचा संदेश लिंगायत समाजापर्यंत पोहोचला असल्याचे मानले जाते. काँग्रेसने बोम्मई सरकारच्या ४० टक्के कमिशनवाल्या सरकारवर प्रहार केला असला तरी, सिद्धरामय्या यांच्या टिप्पणीमुळे लिंगायत मतदारांचे ध्रुवीकरण झाले तर त्याचा फायदा भाजपला होण्याची शक्यता आहे.
काँग्रेसने जाहीरनाम्यामध्ये बजरंग दलावर बंदी घालण्याचे आश्वासन दिले असून हा मुद्दा मोदींनी अखेरच्या दोन दिवसांच्या प्रचारामध्ये उचलून धरला आणि काँग्रेसवर प्रचंड टीका केली. बजरंग दलावर बंदीच्या मुद्द्यामुळे भाजपला धार्मिक ध्रुवीकरणाची संधी मिळाल्याचे मानले जात आहे. काँग्रेसने सर्व प्रचार स्थानिक मुद्द्यांच्या आधारे केला होता. काँग्रेस म्हणजे ‘स्थानिकांचा आवाज’ अशी भूमिका घेऊन राहुल गांधींनी संपूर्ण प्रचार केला होता. त्यामुळे धर्माचा मुद्दा प्रचारात अग्रभागी नव्हता. काँग्रेसच्या जाहीरनाम्यात बजरंग दलाचा उल्लेख झाल्यामुळे काँग्रेस हिंदू विरोधी असल्याची आवई उठवण्याची संधी भाजपला मिळाली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचारात उतरेपर्यंत भाजप बचावात्मक पवित्र्यामध्ये असल्याचे दिसत होते. मोदींचे प्रचारदौरे सुरू होण्याआधी एक-दोन दिवस काँग्रेसचे पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी मोदींना ‘विषारी साप’ म्हणून भाजपच्या हाती आक्रमक होण्यासाठी कोलीत दिले. खरगेंच्या आधी काँग्रेसच्या नेत्यांनी मोदींवर भाष्य करणे जाणीवपूर्वक टाळले होते. खरगेंचा संयम ढळल्याची कदाचित मोठी किंमत काँग्रेसला कर्नाटक निवडणुकीत द्यावी लागू शकेल. मोदींचा काँग्रेसविरोधातील प्रहार भाजपसाठी नेहमीच लाभदायक ठरलेला आहे. मोदींनी काँग्रेसच्या भ्रष्टाचाराचा मुद्दा उकरून काढला. काँग्रेसची सरकारे ८५ टक्के कमिशनवाली होती, असा आरोप केला. काँग्रेसच्या नेत्यांनी माझी ९१ वेळा अवहेलना केली, गांधी घराण्याच्या फायद्यासाठी काँग्रेसला कर्नाटकामध्ये सत्ता मिळवायची आहे, जनता शंकर असून मी त्यांच्या मानेतील साप बनून त्यांचे रक्षण करेन, अशी मोदींनी काँग्रेसविरोधात चौफेर फटकेबाजी केली.
हुबळीमधील प्रचारसभेत काँग्रेसच्या माजी पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांनी, कर्नाटकासंदर्भात ‘सार्वभौमत्व’ असा शब्द वापरल्याचा आरोप करत भाजपने रान उठवले आहे. या सभेत सोनिया गांधी हिंदीतून भाषण करत होत्या. काँग्रेसच्या समाजमाध्यम विभागातील कोणी तरी इंग्रजी अनुवाद करताना ‘सार्वभौम’ असा शब्दप्रयोग केला. या इंग्रजी ट्वीटचा आधार घेत भाजपने काँग्रेस पक्ष ‘तुकडे तुकडे टोळीचा म्होरक्या’ असल्याचा आरोप केला. हा आरोप भाजपने पूर्वीही केला होता. कर्नाटकमध्ये सोनिया गांधींच्या या कथित शब्दाचा आधार घेत काँग्रेस राष्ट्रद्रोही असल्याचा प्रचार भाजपने केला. ‘सार्वभौम’ हा शब्द सोनिया गांधी यांच्या भाषणामध्ये नसल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे. मात्र, काँग्रेसच्या ट्वीटचा आधार घेत प्रचाराच्या अखेरच्या दिवशी मोदींनी काँग्रेससारख्या देशविरोधी पक्षाला मते न देण्याचे आवाहन केले.
कर्नाटकमध्ये सुरुवातीपासून प्रचाराची दिशा काँग्रेसने निश्चित केली होती. मोदींच्या प्रचारानंतर प्रचाराची सूत्रे काँग्रेसच्या हातून निसटल्याचे दिसले. बोम्मई सरकारवर नाराज असलेले पण, मत कोणाला द्यायचे याबाबत संभ्रम असलेल्या कुंपणावरील मतदारांना आकर्षित करण्याचे काम मोदींच्या प्रचाराने झाले असू शकते. त्यासाठी संधी मात्र काँग्रेसनेच भाजपला दिली.