पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुण्याचा नियोजित दौरा पावसामुळे रद्द करण्यात आल्याने भारतीय जनता पक्षाकडून होणारे शक्तिप्रदर्शनही ‘पाण्यात’ गेले. पावसाच्या शक्यतेने विविध पर्यायांची चाचपणी भाजप पदाधिकाऱ्यांकडून शेवटपर्यंत करण्यात आली. मात्र बंदिस्त सभागृहात पंतप्रधान मोदी यांची सभा घेतल्यास जास्तीत जास्त तीन हजार नागरिक उपस्थित राहू शकणार असल्याचे स्पष्ट झाले. नियोजन फसल्याने मोदींच्या दौऱ्यासाठी केलेला कोट्यवधी रुपयांच्या खर्चावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले.

मेट्रो प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या मार्गिकेअंतर्गत शिवाजीनगर जिल्हा न्यायालय ते स्वारगेट या ३.४२ किलोमीटर लांबीच्या भुयारी मार्गाचे लोकार्पण आणि स्वारगेट-कात्रज या विस्तारीत मेट्रो मार्गिकेच्या भूमिपूजनासह एकूण बारा प्रकल्पांचे लोकार्पण पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते गुरुवारी होणार होते. उद्घाटनाच्या कार्यक्रमानंतर सर परशुरामभाऊ महाविद्यालयाच्या मैदानावर मोदी यांची सभाही नियोजित होती. पंतप्रधान मोदी यांच्या या दौऱ्यासाठी गेल्या काही दिवसांपासून पोलीस, महापालिका आणि जिल्हा प्रशासनाकडून जोरदार तयारी करण्यात आली होती. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोदी यांचा हा दौरा असल्याने भाजपनेही जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याची तयारी केली होती. मात्र बुधवारी दुपारनंतर झालेला पाऊस आणि गुरुवारी शहरात मुसळधार पावसाच्या अंदाजाने हवामान विभागाने दिलेला लाल इशारा या पार्श्वभूमीवर मोदी यांचा दौरा होणार का, अशी विचारणा सुरू झाली होती. मात्र, गुरुवारी मोदी यांचा दौरा रद्द करण्यात आल्याने खर्चाबरोबर भाजपचे शक्तिप्रदर्शनही पाण्यात गेले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही कोणत्याही परिस्थितीत मोदी यांची सभा होईल, असे जाहीर केले होते. मोदी यांची सभा स्वारगेट परिसरातील महापालिकेच्या गणेश कला क्रीडा रंगमंच येथे घेण्याच्या पर्यायावरही चर्चा करण्यात आली. मात्र, गणेश कला क्रीडा रंगमंच येथे तीन हजार नागरिकच उपस्थित राहू शकणार असल्याने मोदींची सभा रद्द करण्यात आली.

हेही वाचा >>>महायुतीमध्ये बाळापूर मतदारसंघ कळीचा मुद्दा

ऑनलाइन उद्घाटन २९ सप्टेंबरला

पंतप्रधान नरेंद मोदी हे पुणे मेट्रोचे उद्घाटन रविवारी २९ सप्टेंबर रोजी ऑनलाइन पद्धतीने करणार आहेत. पावसाच्या शक्यतेने गुरुवारी केले जाणारे उद्घाटन पंतप्रधानांचा दौरा रद्द झाल्याने लांबले होते. सोलापूर विमानतळ लोकार्पण, भिडेवाडा भूमिपूजन, बिडकिन औद्याोगिक नोड शुभारंभ सुद्धा याच कार्यक्रमात होणार आहे.