काँग्रेसच्या काळात हिंदू समाजावर वर्चस्व गाजविण्यासाठी संविधानात अनावश्यक बदल करण्यात आले असून, ते बदल काढून टाकायचे असल्यास भाजपाला संसदेत दोन-तृतियांश बहुमताची आवश्यकता आहे. त्याशिवाय संविधानात बदल करता येणार नाही. त्यासाठी भाजपाला ४०० जागांची आवश्यकता आहे. अशा प्रकारचे विधान रविवारी भाजपाचे खासदार तथा माजी केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे यांनी केले होते.
अनंतकुमार हेडगे यांच्या विधानानंतर देशातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. विविध स्तरांतून या विधानाचा निषेध करण्यात येत आहे. भाजपानेही त्यांच्या विधानापासून स्वत:ला दूर ठेवले आहे. त्यांचं विधान वैयक्तिक असून, त्याचा पक्षाशी काहीही संबंध नाही, असे भाजपाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच अनंतकुमार हेडगे यांच्याकडून स्पष्टीकरण मागविण्यात आल्याचेही भाजपाकडून सांगण्यात आले आहे.
हेही वाचा – सर्वपक्षीय नेतेमंडळींचा घराणेशाहीवर भर! उमेदवारी नातेवाईकांना मिळण्यासाठी आटापिटा
या संदर्भात बोलताना, भाजपाचे नेते गौरव भाटिया यांनी प्रतिक्रिया दिली. “अनंतकुमार हेडगे यांचं विधान वैयक्तिक असून, त्याचा भाजपाचा काहीही संबंध नाही. त्यांच्या या विधानाची दखल भाजपानं घेतली आहे. तसेच त्यांच्याकडून स्पष्टीकरणही मागितलं आहे. भाजपानं घेतलेला प्रत्येक निर्णय, नेहमीच देशाच्या हिताचा राहिला आहे. संविधानाशी तो सुसंगत राहिला आहे”, असे ते म्हणाले.
त्याशिवाय भाजपानेही एक्स या सोशल मीडिया साईटवर पोस्ट करीत, त्यांच्या विधानाशी पक्षाचा काहीही संबंध नसल्याचं म्हटले आहे. “खासदार अनंतकुमार हेगडे यांनी संविधानासंदर्भात केलेलं विधान, हे त्यांचं वैयक्तिक मत आहे. त्याचा पक्षाशी काहीही संबंध नाही. भाजपासाठी देशाचं संविधान सर्वोच्च आहे. तसेच संविधानाचं रक्षण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत”, अशी प्रतिक्रिया भाजपाकडून देण्यात आली आहे. तसेच या प्रकरणी अनंतकुमार हेगडे यांच्याकडून स्पष्टीकरण मागण्यात आलं असल्याचेही भाजपाकडून सांगण्यात आलं आहे.
दरम्यान, अनंतकुमार हेडगे यांच्या विधानानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही भाजपा आणि पंतप्रधान मोदी यांना लक्ष्य केले. अनंतकुमार हेडगे यांचे विधान म्हणजे पंतप्रधान मोदी आणि भाजपाच्या छुप्या अजेड्यांची सार्वजनिक कबुली आहे. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान नष्ट करणे हे त्यांचे अंतिम ध्येय आहे. ते न्याय, समानता, नागरी हक्क व लोकशाहीचा तिरस्कार करतात. समाजात फूट पाडून, माध्यमांना गुलाम बनवून, तपास संस्थांना अपंग करून आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य संपवून, त्यांना भारताच्या लोकशाहीला हुकूमशाहीत बदलायचे आहे,” अशी टीका त्यांनी केली.
त्याशिवाय काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनीही हेगडे यांच्या विधानावरून भाजपावर टीका केली आहे. “या देशातील लोकशाही संपवून हुकूमशाही लादण्याचा पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हेतू स्पष्ट झाला आहे. त्यांना अनुसूचित जाती-जमाती आणि ओबीसींचे अधिकार हिरावून घ्यायचे आहेत. त्यांना या देशात कोणत्याही निवडणुका घ्यायच्या नाहीत. तसेच त्यांना भारतातील धर्मनिरपेक्षता आणि विविधतेतील एकता संपुष्टात आणायची आहे,” असे ते म्हणाले.
हेही वाचा – भाजपला प्रादेशिक पक्षांच्या मैत्रीची आवश्यकता का भासू लागली ?
अनंतकुमार हेडगे नेमके काय म्हणाले होते?
कर्नाटकमधील उत्तर कन्नड जिल्ह्यात सिद्धपूर येथे एका सभेत बोलताना खासदार हेगडे यांनी संविधानात बदल करण्यासंदर्भात विधान केले होते. आपल्याला संविधानात बदल करावे लागणार आहेत. काँग्रेसच्या काळात संविधानात काही अनावश्यक बदल करण्यात आले, विशेषतः हिंदू समाजाला अंकित ठेवण्यासाठी हे बदल केले गेले होते. हे सर्व बदलायचे असेल, तर दोन-तृतियांश बहुमताशिवाय पर्याय नाही. तसेच पक्षाकडे २० राज्यांत सत्ता असणेही आवश्यक आहे, असे ते म्हणाले होते.