मध्य प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने काँग्रेसला पराभूत केले. ही निवडणूक जिंकल्यानंतर भाजपा कोणत्या नेत्याची मुख्यमंत्रिपदी नियुक्ती करणार, याची सर्वांनाच उत्सुकता लागली होती. या निमित्ताने चार वेळा मुख्यमंत्री राहिलेले शिवराजसिंह यांना पुन्हा संधी मिळणार का? असे विचारले जात होते. मात्र यावेळी भाजपाने शिवराजसिंह यांच्याऐवजी ५८ वर्षीय ओबीसी नेते मोहन यादव यांची मुख्यमंत्रिपदासाठी निवड केली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने भाजपाने मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदी ओबीसी चेहरा दिल्याचे म्हटले जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मोहन यादव मध्य प्रदेशचे नवे मुख्यमंत्री

नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत मोहन यादव यांनी काँग्रेसच्या उमेदवाराचा १२ हजार ९४१ मतांनी पराभव केला होता. मुख्यमंत्रिपदी असताना शिवराजसिंह चौहान ‘लाडली बहणा’ या योजनेची प्रभावी अंमलबजावणी केली होती. या योजनेमुळे मध्य प्रदेशच्या महिलांनी भाजपाला भरभरून मते दिली. त्यामुळे यावेळीदेखील शिवराजसिंह यांनाच मुख्यमंत्री केले जाऊ शकते, असा कयास लावला जात होता. मात्र भाजपाने मोहन यादव यांची मुख्यमंत्रिपदासाठी निवड केली.

शिवराजसिंह चौहान यांनीच प्रस्ताव मांडला?

भाजपाचे जबलपूरचे आमदार राकेश सिंह यांच्या म्हणण्यानुसार शिवराजसिंह यांनीच मोहन यादव यांना मुख्यमंत्रिपद द्यावे, असा प्रस्ताव ठेवला होता. राकेश यांनी मोहन यादव यांच्या निवडीबाबत प्रतिक्रिया दिली आहे. “मोहन यादव हे एक प्रभावी आणि सक्षम प्रशासक आहेत. पक्षाचे विकासाचे धोरण ते पुढे घेऊन जातील, अशी आम्ही आशा करतो. भाजपाने मला आमदार म्हणून राहण्यााचा आदेश दिलेला आहे. ते कर्तव्य मी पार पाडणार आहे. मी मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत नव्हतो,” असे सिंह म्हणाले.

भोपाळच्या बैठकीत निर्णय

यादव हे ओबीसी समाजातून येतात. नव्या मुख्यमंत्र्याची निवड करण्यासाठी भाजपाने भोपाळमध्ये एक बैठक बोलावली होती. या बैठकीत केंद्रीय निरीक्षकांच्या उपस्थितीत मोहन यादव यांची मुख्यमंत्रिपदी निवड करण्यात आली.

“नवा विकास, नवी उर्जा, नव्या आशेसाठी हा निर्णय”

या निवडीनंतर भाजपाचे सरचिटमीस आणि आमदार असलेले कैलास विजयवर्गीय यांनी प्रतिक्रिया दिली. “नवा विकास, नवी उर्जा, नव्या आशेसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. नरेंद्र मोदी हे नव्या भारतासाठी काम करत आहेत. यात मध्य प्रदेश हे राज्य एक आदर्श म्हणून नेतृत्व करेल. नव्या नेतृत्वाखाली मध्य प्रदेश हे राज्य नरेंद्र मोदी यांच्या सर्व अपेक्षा पूर्ण करेल,” असे विजयवर्गीय म्हणाले.

मोहन यादव कोण आहेत?

मोहन यादव हे उज्जैन मतदारसंघाचे तीन वेळा आमदार राहिलेले आहेत. शिवराजसिंह चौहान यांच्या मंत्रिमंडळात ते शिक्षणमंत्री होते. मध्य प्रदेश विधानसभेच्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार त्यांनी कायद्यात पदवी आणि व्यवस्थापनशास्त्रात पदव्युत्तर पदवी मिळवलेली आहे. विशेष म्हणजे त्यांचे डॉक्टरेटपर्यंत शिक्षण झालेले आहे. राज्य पर्यटनाच्या प्रचार-प्रसारात मोलाची कामगिरी केल्यामुळे त्यांना २०११-२०१२ आणि २०१२-२०१३ या वर्षासाठी राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानित करण्यात आलेले आहे.

अभाविपपासून राजकीय कारकिर्दीला सुरुवात

यादव यांच्या राजकीय कारकिर्दीला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेपासून (अभाविप) सुरुवात झाली. माधव विज्ञान महाविद्यालत असताना ते अभाविपचे सहसचिव झाले. १९८४ साली ते अभाविपचे अध्यक्ष झाले. याच वर्षी त्यांनी अभाविपअंतर्गंत उज्जैन शहराचे शहरमंत्री म्हणून काम पाहिले.

अभाविपमध्ये भूषवली महत्त्वाची पदे

यादव १९८८ साली अभाविपचे मध्य प्रदेश युनिटचे सहमंत्री तसेच राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य होते. १९८९-९० मध्ये ते मध्य प्रदेश युनिटचे मंत्री झाले. १९९१-९२ मध्ये ते राष्ट्रीय मंत्री झाले. १९९३-९५ या काळात ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे को एरिया इन्चार्ज होते. १९९७ साली ते मध्य प्रदेश भाजपा युवा मोर्चाच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य होते.

पश्चिम रेल्वे बोर्डाच्या सल्लागार समितीचे सदस्य

१९९८ साली ते पश्चिम रेल्वे बोर्डाच्या सल्लागार समितीचे सदस्य होते. त्याच वर्षी ते भाजपा युवा मोर्चाच्या उज्जैन विभागाचे प्रभारी होते. २०००-२००३ या काळात ते उज्जैनमधील विक्रम विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य होते.

२००४ साली भाजपाच्या कार्यकारिणीचे सदस्य

२००० ते २००३ या काळात त्यांनी भाजपाचे शहर जिल्हा सरचिटणीस म्हणून काम पाहिले. २००४ साली ते भाजपाच्या कार्यकारिणीचे सदस्य होते. २००४ ते २०१० या काळात ते उज्जैन विकास प्राधिकरणाचे (राज्यमंत्रिपदाचा दर्जा) अध्यक्ष होते.

पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष

२०११-२०१३ या काळात ते मध्य प्रदेश राज्य पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष (राज्यमंत्रिपदाचा दर्जा) होते. सध्या ते मध्य प्रदेशच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य आहेत. २०१२ ते २०१६ या काळात भाजपच्या अखिल भारतीय सांस्कृतिक प्रकोष्ठचे सह-संयोजक होते.