भाजपाने त्रिपुरा विधानसभेची निवडणूक जिंकली आहे. ६० जागांवर झालेल्या या निवडणुकीत भाजपाने ३२ जागांवर विजय मिळवत बहुमताचा आकडा पार केला आहे. निवडणूक जिंकल्यानंतर येथे कोणाच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडणार, याची सर्वांनाच उत्सुकता लागली होती. आगामी लोकसभा निवडणूक लक्षात घेता यावेळी भाजपा महिलेला संधी देणार, असे म्हटले जात होते. त्यासाठी प्रतिमा भौमिक यांचे नाव आघाडीवर होते. मात्र भाजपाने पुन्हा एकदा माणिक साहा यांचीच मुख्यमंत्रीपदासाठी निवड केली आहे. येत्या आठ मार्च रोजी ते मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील.
हेही वाचा >>> ‘देशातील सर्वात भ्रष्ट सरकार’ अशी टीका करणारा भाजप संगमांच्या मांडीला मांडी लावून सरकारमध्ये सहभागी
प्रतिमा भौमिक यांच्या नावाची होती चर्चा
माणिक साहा यांना दिल्लीत स्थान देऊन प्रतिमा भौमिक यांची मुख्यमंत्रीपदी नेमणूक केली जाईल, असे म्हटले जात होते. प्रतिमा भौमिक या शेतकरी कुटुंबातील आहेत. त्यांचे गाव बांगलादेशच्या सीमेवर आहे. भौमिक या त्यांच्या मतदारसंघातून ३५०० मताधिक्याने निवडून आल्या आहेत. त्रिपुरामध्ये या वेळी पुरुषांपेक्षा महिलांनी अधिक मतदान केले. हे प्रमाण अनुक्रमे ८६.१२ आणि ८९.१७ टक्के असे आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणूक लक्षात घेता महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी हा निर्णय घेतला जाऊ शकतो, असा कयास लावला जात होता. मात्र ऐनवेळी भाजपाने पुन्हा एकदा माणिस साहा यांचंच नाव मुख्यमंत्रीपदासाठी निश्चित केलं. येत्या ८ मार्च रोजी साहा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील.
हेही वाचा >>> ल्हापूर दौऱ्यात संजय राऊत यांच्याकडून महाविकास आघाडीतील ऐक्यावर भर
…नंतरच माणिक साहा यांच्या नावावर शिक्कामोर्तब
निवडणूक जिंकल्यानंतर भाजपाने मुख्यमंत्रीपदासाठी योग्य नेत्याची निवड करण्यासाठी हालचाली सुरू केल्या होत्या. त्यासाठी आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सर्मा यांनी रविवारी त्रुपुरामध्ये दाखल होत, भाजपाच्या नेत्यांची बैठक घेतली. त्याआधी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचीही भेट घेतली होती. त्रिपुरा सरकारमधील मंत्री तसेच मुख्यमंत्रीपदासाठीच्या नावाची या बैठकीत चर्चा झाली होती. त्यानंतर माणिक साहा यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे.
हेही वाचा >>>पश्चिम बंगालमध्ये तृणमूलला मोठा धक्का, पोटनिवडणुकीत पराभव; ममता बॅनर्जींवर मुस्लीम मतदार नाराज?
भाजपाने दिलेला शब्द पाळला
त्रिपुरा निवडणुकीमध्ये भाजपाने आम्ही जिंकलो तर माणिक साहा हेच मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असतील, असे जाहीर केले होते. मात्र निवडणुकीनंतर एका महिला उमेदवाराचा या खुर्चीसाठी विचार केला जात होता. दुसरीकडे भाजपाने ही निवडणूक साहा यांच्याच नेतृत्वात लढवली होती. तसेच अगरतळा या प्रतिष्ठेच्या मतदारसंघात साहा यांचा विजय झाल्यामुळे भाजपाला त्यांच्या नावाला प्राधान्य द्यावे लागले. त्यामुळे ठरल्याप्रमाणे त्रिपुराच्या मुख्यमंत्रीपदी माणिक साहा हेच विराजमान होणार आहेत.