प्रबोध देशपांडे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
अकोला : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या जबाबदारीतील थोडा भार कमी करत अकोला जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर दिली. गेल्या नऊ वर्षांत जिल्ह्याला लाभलेले राधाकृष्ण विखे पाटील चौथे पालकमंत्री. पालकमंत्र्यांमध्ये बदल होत असले तरी जिल्ह्यातील मोठे प्रश्न मात्र तेच आहेत. वर्षानुवर्षे त्याच प्रश्नांवर चर्चा व आढावा घेतला जातो. त्यामुळे हे प्रश्न कधी सुटतील का? असा प्रश्न निर्माण होतो. आपल्या व्यस्त कामकाजामुळे पालकमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस जिल्ह्याला अपेक्षित वेळ देऊ शकत नव्हते.
पालकमंत्री पदाची जबाबदारी येताच महसूलमंत्री विखे पाटील यांनी जिल्ह्यात दोन दिवस तळ ठोकून बैठकांचा धडाका लावला. पालकमंत्री पदावरील खांदेपालटचा भाजपला राजकीय फायदा होणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. अकोला जिल्ह्याला २०१४ पासून चार पालकमंत्री लाभले आहेत. २०१४ ते २०१९ जिल्ह्यातील डॉ. रणजीत पाटील पूर्णवेळ पालकमंत्री लाभले होते. त्यांच्या कार्यकाळात पोलीस निवासस्थान व इतरही काही प्रश्न मार्गी लागले. २०१९ पासून राज्याच्या मंत्रिमंडळात जिल्ह्याला स्थान मिळाले नाही. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारमध्ये शेजारच्या अमरावती जिल्ह्यातील आ.बच्चू कडूंवर पालकमंत्री पदाची जबाबदारी होती. त्यांनी जिल्ह्यात सातत्यपूर्ण दौरे करून प्रशासनावर वचक मिळवला. मात्र, जिल्ह्यातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प, मोठे प्रश्न मार्गी लावण्यात त्यांना यश आले नाही.
हेही वाचा >>> राजस्थानात भाजप आणि काँग्रेसमध्ये उमेदवार निवडीवरून चुरस वाढली
सत्तापरिवर्तनानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालकमंत्री पदाची धुरा सांभाळली. देवेंद्र फडणवीसांकडून जिल्ह्याला मोठ्या अपेक्षा होत्या. त्यांच्या कार्यकाळात जिल्ह्यातील महत्त्वाकांक्षी व मोठे प्रश्न मार्गी लागण्याची आशा होती. प्रत्यक्षात तसे घडले नाही. आपल्या व्यस्त कामकाजामुळे ते जिल्ह्याला वेळच देऊ शकले नाहीत. त्यांनी केवळ एक जिल्हा नियोजन समितीची सभा घेतली. आमदार रणधीर सावरकर यांनी समर्थपणे काम सांभाळले. आता पालकमंत्री पदावर महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची वर्णी लागली आहे. त्यांनी घेतलेल्या आढावा बैठकीमध्ये जिल्ह्यातील प्रश्नांवर ऊहापोह झाला. पश्चिम वऱ्हाडातील हवाई वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण शिवणी विमानतळाच्या धावपट्टीचे विस्तारीकरण गेल्या काही दशकांपासून रखडले आहे. यासाठी आवश्यक भूसंपादनासाठीचा २०१७ मधील ८५ कोटींचा प्रस्ताव आता १७० कोटींपर्यंत पोहोचला आहे. तरीही राज्य शासनाने त्यांला मंजुरात दिलेले नाही.
मध्य प्रदेश : काँग्रेसमध्ये अंतर्गत नाराजी असल्याचा भाजपाचा दावा!
आतापर्यंतच्या सर्वच पालकमंत्र्यांनी विमानतळाचा प्रश्न मार्गी लावू, असे आश्वस्थ केले. प्रत्यक्षात राजकीय उदासीनतेमुळे विमानतळाचा प्रश्न आजही कायम आहे. पालकमंत्री विखे पाटील यांनी देखील विमानतळासाठी आवश्यक निधी आणला जाईल, असे सांगितले. जिल्ह्यात खारपाणपट्ट्याचा शाप लागला आहे. खारपाणपट्ट्यातील नेरधामणा प्रकल्प पूर्णत्वास जाण्याची प्रतीक्षा आहे. आरोग्य व्यवस्थेच्या सक्षमीकरणासाठी अतिविशेषोपचार रुग्णालय उभारले, मात्र त्याला रिक्त पदांचे ग्रहण आहे. जिल्ह्यातील अपूर्ण, निकृष्ठ व खड्डेमय रस्ते नेहमीच चर्चेचा विषय असतो. अकोला-अकोटसह जिल्ह्यातील विविध रस्त्यांचे काम अद्यापही पूर्ण झालेले नसून दर्जाहीन रस्त्यांमुळे नागरिकांचे चांगलेच हाल होत आहेत. शहरातील उड्डाणपूल क्षतिग्रस्त झाला. शहरात नाट्यगृह उभारले पण निधीअभावी ते पूर्णत्वास जाऊ शकले नाही. पोलीस आयुक्तालयाचा प्रश्न रखडला आहे.
हेही वाचा >>> Telangana : कल्याणकारी योजना विरुद्ध बेरोजगारी-लाचखोरी; तेलंगणच्या जनतेसमोर काय आहेत पर्याय?
अवाजवी करवाढीसह महापालिकेच्या असंख्य प्रश्नांनी नागरिकांना घेरले आहे. अकोला शहरासह जिल्ह्याची वर्षानुवर्षे ही परिस्थिती कायम आहे. हे सर्व प्रश्न, समस्या सोडविण्याचे मोठे आव्हान पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासमोर राहील. आगामी वर्ष निवडणुकांचे आहे. त्यातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालकमंत्री म्हणून जिल्ह्याला फारसा वेळ देऊ शकत नसल्याने त्याचा नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता होती. हे लक्षात घेता राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर पालकमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली. नवी जबाबदारी येताच विखे पाटील कामाला लागले आहेत. दोन दिवस त्यांनी जिल्ह्यातील विविध विभागाचा आढावा घेतला. अकोलेकरांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री राजराजेश्वर मंदिराच्या प्रारूख आराखड्यासाठी ५० लाखांच्या निधीची त्यांनी घोषणा केली. आगामी काळात ते जिल्ह्यात सक्रिय राहण्याची चिन्हे आहेत. पालकमंत्री पदाचा लाभ भाजपला निवडणुकीत कितपत होतो, हे निकालानंतरच स्पष्ट होऊ शकेल.
फडणवीसांचे ‘पालकत्व’ हवेच
जिल्ह्याचे पालकमंत्रीपद सोडले तरी ‘पालकत्व’ सोडलेले नाही, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नुकतेच एका कार्यक्रमात म्हणाले. भाजपचे ज्येष्ठ नेते व उपमुख्यमंत्री म्हणून अकोला जिल्ह्याला देवेंद्र फडणवीसांच्या ‘पालकत्वा’ची गरज राहीलच. जिल्ह्याच्या विकासासाठी त्यांच्याकडून भरीव योगदानाची अकोलेकरांना अपेक्षा आहे.
अकोला जिल्ह्यातील विविध प्रकल्प, योजना व विकास कामांसह प्रशासनातील विभागांचा आढावा घेतला. लवकरच इतर प्रश्न व समस्यांची माहिती घेऊन त्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील. शिवणी विमानतळासह इतर कामांसाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल. – राधाकृष्ण विखे पाटील, पालकमंत्री, अकोला.