देशभरातली राजकारणी मंडळी दररोज कोणत्या न कोणत्या मुद्द्यावर वक्तव्य करत असतात, त्यांची अनेक वक्तव्य अशी असतात जी वादग्रस्त ठरतात. नुकतंच भाजपाच्या एका आमदाराने केलेल्या वक्तव्याने नवा वाद निर्माण झाला होता. याच पार्श्वभूमीवर भाजपाच्या पक्षश्रेष्ठींकडून कारवाई करत आमदाराची पक्षातून सहा वर्षांसाठी हकालपट्टी केली आहे. भाजपाचे कर्नाटकातील आमदार बसनगौडा पाटील यतनाळ यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. नेमके प्रकरण काय आहे? त्यांच्यावर ही कारवाई का करण्यात आली? कोण आहेत बसनगौडा पाटील? जाणून घेऊ.
प्रकरण काय?
भाजपाने कर्नाटकातील बंडखोर आमदार बसनगौडा पाटील यतनाळ यांना पक्षविरोधी वक्तव्य केल्याप्रकरणी त्यांची पक्षातून हकालपट्टी करत कारवाई केली आहे. राज्य युनिटचे अध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र आणि त्यांचे वडील व माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्याशी मतभेद असलेले कर्नाटकातील बंडखोर नेते बसनगौडा पाटील यतनाळ यांच्याविरुद्ध व्हीप जारी करत भाजपा पक्षश्रेष्ठींनी बुधवारी ही कारवाई केली आहे. अलीकडच्या काळात भाजपाकडून करण्यात आलेली अशा स्वरूपाची ही पहिलीच कारवाई आहे. यतनाळ यांची हकालपट्टी भाजपा वर्तुळात एक संकेत म्हणून पाहिली जात होती. बी. वाय. विजयेंद्र नोव्हेंबर २०२६ मध्ये त्यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होईपर्यंत राज्य युनिटचे नेतृत्व करत राहतील. यतनाळ यांना त्यांच्या कथित पक्षविरोधी कारवायांसाठी दुसरी कारणे दाखवा नोटीस बजावल्यानंतर जवळजवळ सहा आठवड्यांनी भाजपा नेतृत्वाने हे पाऊल उचलले.
पक्षाच्या केंद्रीय शिस्तपालन समितीचे सदस्य सचिव ओम पाठक यांनी यतनाळ यांना जारी केलेल्या भाजपाच्या आदेशात म्हटले आहे की, “केंद्रीय शिस्तपालन समितीने १० फेब्रुवारी २०२५ रोजीच्या कारणे दाखवा नोटीसवरील तुमच्या उत्तराचा विचार केला आहे आणि पूर्वीच्या कारणे दाखवा नोटीसच्या उत्तरात चांगल्या वर्तनाचे आश्वासन देऊनही, तुम्ही वारंवार पक्ष शिस्तीचे उल्लंघन केले आहे, याची गंभीर दखल घेतली आहे. त्यानुसार, तुम्हाला पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वावरून तात्काळ सहा वर्षांच्या कालावधीसाठी काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे आणि आता ज्या पक्ष पदावर असाल त्या पदावरून तुम्हाला काढून टाकण्यात आले आहे.”
१० फेब्रुवारी रोजी पक्षाच्या शिस्तीचे उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली बसनगौडा पाटील यांना तीन महिन्यांत दुसरी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. ज्येष्ठ आमदार आणि माजी केंद्रीय मंत्री असलेले बसनगौडा पाटील गेल्या काही महिन्यांपासून विजयेंद्र यांना पदावरून काढून टाकण्याची मागणी करत होते. माजी मंत्री रमेश जारकीहोली आणि माजी मंत्री कुमार बंगारप्पा यांसारख्या त्यांच्या गटातील काही सदस्यांसह बसनगौडा पाटील यांनी जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये अनेक वेळा दिल्लीला भेट देऊन पक्षश्रेष्ठींना विजयेंद्र यांना पदावरून काढण्याची विनंती केली होती.
यावर उत्तर देताना विजयेंद्र यांनी ‘एक्स’वरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, भाजपा नेतृत्वाने कधीही शिस्तीशी तडजोड केलेली नाही. “पक्षातील एकूण परिस्थितीवर सविस्तर चर्चा केल्यानंतर बसनगौडा पाटील यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली,” असे त्यांनी म्हटले आहे. त्यांनी दावा केला आहे की, त्यांनी या वादाबद्दल कधीही पक्ष नेतृत्वाकडे तक्रार केली नव्हती.
बसनगौडा पाटील यांना कारणे दाखवा नोटीस
भाजपा नेतृत्वाने डिसेंबर २०२४ मध्ये बसनगौडा पाटील यांना राज्यातील पक्ष नेतृत्वाविरुद्ध सतत टीका करणे आणि पक्षाच्या निर्देशांचे उल्लंघन केल्याबद्दल पहिली कारणे दाखवा नोटीस बजावली होती. बसनगौडा पाटील यांनी नोटीसला उत्तर देताना म्हटले होते की, त्यांनी राज्य युनिटमधील सध्याच्या परिस्थितीची नेतृत्वाला माहिती दिली आहे. त्यांच्याकडून विजयेंद्र यांच्यावर दररोज टीका केली जात होती. येडियुरप्पा यांच्या समर्थकांनी भाजपा नेतृत्वावर बसनगौडा पाटीलवरील कारवाईसाठी दबाव वाढवला. त्यानंतर १० फेब्रुवारी रोजी त्यांना दुसरी नोटीस बजावण्यात आली.
निलंबनावर बसनगौडा पाटील यांची प्रतिक्रिया
पक्ष नेतृत्वाच्या या निर्णयावर प्रतिक्रिया देत बसनगौडा पाटील यांनी ‘एक्स’वरील पोस्टमध्ये म्हटले आहे, घराणेशाहीचे राजकारण, भ्रष्टाचार, पक्षातील सुधारणांविरुद्ध बोलणे, एका उच्चपदस्थ व्यक्तीला काढून टाकणे आणि उत्तर कर्नाटकचा विकास करण्याची विनंती केल्याबद्दल पक्षाने मला सहा वर्षांसाठी काढून टाकले आहे. मला निलंबित करण्याचा पक्षाचा निर्णय भ्रष्टाचार, घराणेशाहीचे राजकारण, उत्तर कर्नाटकचा विकास आणि हिंदुत्वाच्या विरोधात असणाऱ्यांविरुद्धच्या माझ्या लढाईत अडथळा आणणार नाही, मी माझ्या लोकांची त्याच दृढतेने सेवा करत राहीन.”
नोव्हेंबर २०२३ मध्ये कर्नाटक भाजपाप्रमुख म्हणून विजयेंद्र यांची नियुक्ती झाल्यानंतर बसनगौडा पाटील यांनी येडियुरप्पा यांच्यावर आरोप केला होता की, त्यांनी शिकारीपुरा येथून पहिल्यांदाच आमदार झालेल्या त्यांच्या मुलाला पक्षाचे सर्वोच्च पद मिळवून देण्यासाठी भाजपाच्या पक्षश्रेष्ठींना ब्लॅकमेल केले. बसनगौडा पाटील यांनी विजयेंद्र यांना चरित्रहीन आणि भ्रष्टदेखील म्हटले होते.
बसनगौडा पाटील आणि विजयेंद्र यांच्यातील वादाला भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस (संघटना) बी. एल. संतोष आणि येडियुरप्पा यांच्यातील राज्य पक्ष युनिटवरील नियंत्रणावरून सुरू असलेल्या संघर्षाचाच परिणाम म्हणूनदेखील पाहिले जात होते. बसनगौडा पाटील हे बी. एल. संतोष यांच्या समर्थनात असल्याचे सांगण्यात येते.