हरियाणात विधानसभेच्या ९० जागांसाठी ५ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी भाजपाकडून ६७ उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीद्वारे जातीय समीकरण साधण्याचा प्रयत्न भाजपाकडून करण्यात आला आहे. मात्र, पहिली यादी जाहीर होताच भाजपाच्या अनेक नेते आणि पदाधिकाऱ्यांनी नाराज होत पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे; तर काही पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या पदांचे राजीनामे दिले आहेत. त्यामुळे जातीय समीकरण साधण्याचा प्रयत्न आता भाजपाच्या अंगलट येतो की काय, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भाजपाच्या ६७ उमेदवारांच्या पहिल्या यादीत भाजपाने १३ जाट उमेदवारांना विधानसभेचं तिकीट दिलं आहे. त्यामध्ये कमलेश धांडा, महिपाल धांडा, देवेंद्र बबली, जे. पी. दलाल, सुनील सांगवान, श्रुती चौधरी, दीपक हुडा, मंजू हुडा, ओ. पी. धनकर, कॅप्टन अभिमन्यू, अनिल दहिना, संजय कबलाना व उम्मेद पटुवास यांचा समावेश आहे.

हेही वाचा – Punjab AAP: मोफत देण्याच्या घोषणा ‘आप’च्या अंगलट; पंजाबमध्ये विजेवरील अनुदान रद्द, इंधनावरही कर

काही महिन्यांपूर्वी झालेल्या शेतकरी आंदोलनाचा सर्वाधिक प्रभाव हा पंजाब आणि हरियाणात बघायला मिळाला होता. या भागांतील बहुसंख्य शेतकरी जाट समाजाचे आहेत. त्याशिवाय कुस्तीपटूंच्या आंदोलनानंतरही जाट समाज भाजपापासून दूर गेल्याचं चित्र आहे. त्यामुळे भाजपाच्या या निर्णयाकडे जाट समाजाला आकर्षित करण्याचा प्रयत्न म्हणून बघितलं जात आहे.

जाट समाजाव्यतिरिक्त भाजपानं १६ ओबीसी समाजातील उमेदवारांनाही संधी दिली आहे. ओबीसी समुदायानं गेल्या १० वर्षांत भाजपाला समर्थन दिलं आहे. मात्र, आता ओबीसी समाजही भाजपासून दूर जात असल्याचं चित्र आहे. त्यामुळेच यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला उत्तर प्रदेश, हरियाणा, राजस्थान, महाराष्ट्र व बिहारमधील काही जागांवर फटका बसला आहे. त्याशिवाय पहिल्या यादीत नाव नसल्यानं पक्षाचे राज्य ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष करणदेव कंबोज यांनीही त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्याचाही फटका भाजपाला बसण्याची शक्यता आहे.

याव्यतिरिक्त भाजपानं पहिल्या यादीत १३ दलित, नऊ ब्राह्मण, आठ पंजाबी, पाच वैश्य, दोन राजपूत व एका शीख उमेदवाराला संधी दिली आहे. पहिल्या यादीमुळे बनिया व जैन या समाजांच्या भाजपा नेत्यांमध्ये नाराजी असल्याची माहिती आहे. पक्षाचे खासदार व उद्योगपती नवीन जिंदाल यांच्या आई सावित्री जिंदाल यांनी हिसारमधून निवडणूक लढविणार असल्याचं जाहीर केलं आहे. तसेच त्यांनी भूपेंद्र सिंग हुड्डा यांचंही कौतुकही केलं आहे. त्याशिवाय सोनिपतमधून तिकीट नाकारल्यानं माजी मंत्री कविता जैन, तसेच भाजपाचे हिसारचे नेते तरुण जैन यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. दोघेही अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. त्याचप्रमाणे भाजपाच्या बिझनेस सेलचे सहसंयोजक नवीन गोयल यांनीही पक्षाला राम राम ठोकला आहे.

हेही वाचा – Himachal Pradesh : काँग्रेसच्या मंत्र्याचं भाषण ऐकताच भाजपा आमदारांचा जल्लोष, तर मुख्यमंत्री स्तब्ध; हिमाचलच्या विधानसभेत काय घडलं?

या यादीमुळे भाजपातील दलित नेत्यांमध्येही नाराजी दिसून आली आहे. रतिया (एससी-राखीव) मतदारसंघातून तिकीट नाकारल्यानं भाजपा आमदार लक्ष्मण नापा यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. भाजपानं रतियातून सिरसाच्या खासदार सुनीता दुग्गल यांना उमेदवारी दिली आहे.

महत्त्वाचं म्हणजे भाजपाच्या नाराज नेत्यांमध्ये मंत्र्यांचादेखील समावेश आहे. हरियाणाचे ऊर्जा मंत्री रणजित चौटाला यांनीही पक्षाचा राजीनामा दिला आहे. गुडगावमधून भाजपानं मुकेश शर्मा यांना उमेदवारी दिली आहे. भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष जी. एल. शर्माही नाराज आहेत. या नाराजीतूनच त्यांनी काँग्रेस नेते दीपेंद्र सिंग हुड्डा यांचीही भेट घेतली आहे. त्याशिवाय सामाजिक न्याय राज्यमंत्री बिशंभर वाल्मीकी यांनीही पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp facing revolt from party leaders after denial of tickets to balance caste equations spb