महेश सरलष्कर
उत्तर भारतात भाजपने हुकुमी यश मिळवले असले तरी, दक्षिणेकडील राज्यांमध्ये भाजपला विस्तार करता आलेला नाही. कर्नाटकमध्ये भाजपचे सरकार असले तरी, दक्षिणेत जाण्याचा मार्ग तेलंगणातून जातो, हे ओळखून भाजपने गेल्या वर्षीपासून चलो दक्षिण मोहीम सुरू केली. त्याचाच भाग म्हणून भाजपने तेलंगणामध्ये पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक घेतली आहे. सिकंदराबादमध्ये आजपासून (१ जुलै) तीन दिवस भाजपचे नेते विचारमंथन करणार आहेत. ३ जुलै रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींची जंगी सभा घेण्यात येणार आहे. ‘’चलो दक्षिण’’ मोहिमेसाठी भाजपने तेलंगणाचा सोपा पर्याय निवडल्याचे दिसते.
सुमारे १८ वर्षांनंतर भाजपची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक तेलंगणात होत आहे. २००४ मध्ये तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी हैदरबादमध्ये झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये सहभागी झाले होते तर, उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांनी इथल्या सरदार पटेल मैदानावर दमदार भाषण केले होते. सुमारे दोन दशकांच्या कालावधीत आंध्र प्रदेशचे विभाजन झाले असून तेलंगणाची निर्मिती झाली आहे. वाजपेयींच्या काळात आंध्र प्रदेशच्या भाजपची सूत्रे विद्यमान उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्याकडे होती. त्यांनी आंध्र प्रदेशात भाजपचा फारसा विस्तार केला नाही. नायडूंनी तेलुगु देसमचे प्रमुख चंद्राबाबू नायडू यांना आंध्र प्रदेश आंदण देऊन टाकल्याबद्दल भाजपमध्ये नाराजी व्यक्त केली जाते. नायडूंना राष्ट्रपती पदाचा उमेदवार न करण्यामागे हेही प्रमुख कारण मानले जाते.
आंध्र प्रदेशपेक्षा तेलंगणा सोपे?
२०१४ मध्ये केंद्रात मोदी-शहांची सत्ता आल्यानंतर पक्षविस्तारावर अधिक भर दिला गेला होता. त्याअंतर्गत आता दक्षिणेकडेही पक्षविस्तार करण्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. केंद्रातील सत्तेला ८ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत कार्यक्रम न घेता तेलंगणामध्ये जाहीर सभा घेतली होती व घराणेशाही असलेल्या राजकीय पक्षांच्या भ्रष्टाचारावर टीका केली होती. भाजपने पहिल्यांदा आक्रमक प्रचार केला तो बृहन् हैदराबाद महापालिका निवडणुकीत. भाजपने महापालिकेत ४७ जागा जिंकल्या. राज्या-राज्यांमध्ये प्रादेशिक पक्षांना टक्कर देऊन भाजपच्या विस्ताराचा प्रयत्न तेलंगणामध्येही सुरू झाला आहे.
भाजपचे तीन दिवस शक्तिप्रदर्शन
दक्षिणेत आंध्र प्रदेशच्या तुलनेत तेलंगणामध्ये भाजपला पक्षविस्ताराच्या संधी अधिक असल्याचे भाजपनेत्यांचे म्हणणे आहे. छोट्या राज्यांना भाजपने नेहमीच पाठिंबा दिला आहे. काँग्रेस कमकुवत झाल्यामुळे भाजपची थेट लढाई तेलंगण राष्ट्र समितीशी असेल. तेलुगु देसमचे प्रमुख चंद्राबाबू नायडू यांना आंध्र प्रदेश प्रमाणे अजूनही तेलंगणामध्येही राजकीय सत्ता मिळवण्याची मनीषा असली तरी, आंध्र प्रदेशचे विद्यमान मुख्यमंत्री व वायएसआर काँग्रेसचे प्रमुख जगनमोहन यांनी मात्र फक्त आंध्र प्रदेशवर लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळेच भाजपने ‘’चलो तेलंगणा’’चा नारा दिला आहे. हैदराबादमध्ये भाजप आणि सत्ताधारी तेलंगण राष्ट्र समितीमध्ये फलकबाजी सुरू झाली आहे. ‘’सोलू डोरा, सेलावू डोरा’’ (खूप झाले सर, आता निघा) असा नारा भाजपने दिला असून तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांना थेट आव्हान दिले आहे. तेलंगण राष्ट्र समितीनेही भाजपविरोधात ‘’मोदी हटाओ, भारत बचाव’’चा प्रचारसुरू केला आहे. तेलंगणामध्ये २०२३च्या अखेरीस विधानसभेची निवडणूक होणार असून त्यानंतर सहा महिन्यांमध्ये २०२४ ची लोकसभा निवडणूक होणार आहे.
हिंदुत्वासाठी ‘’भाग्यलक्ष्मी’’
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा शुक्रवारी तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व अन्य ज्येष्ठ नेते २ व ३ जुलै रोजी हैदराबादमध्ये दाखल होतील. नड्डा यांचा शमशाद परिसरातून जंगी रोड शो आयोजित करण्यात आला आहे. या रोड शोच्या माध्यमातून भाजपच्या शक्तिप्रदर्शनाला सुरुवात होईल व त्यांची सांगता रविवारी सिकंदरबादामधील परेड मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जाहीर सभेद्वारे होणार आहे. भाजपसाठी ही विजयसंकल्प सभा असेल. तिथे भाजपचे सर्व केंद्रीयमंत्री, १८ राज्यांचे मुख्यमंत्री, तेलंगणातील भाजपचे नेते-पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. हैदराबादमधील चारमिनारलगत असलेले भाग्यलक्ष्मी मंदिर हा देखील भाजपसाठी राजकीय शक्तिप्रदर्शनाचे ठिकाण असेल. बृहन् हैदराबाद महापालिकेच्या निवडणुकीत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रचारसभेत हैदराबादचे नामांतर भाग्यनगर केले पाहिजे, अशी मागणी केली होती. हिंदुत्वाच्या प्रचारासाठी भाजपने भाग्यलक्ष्मी मंदिराचा जाणीवपूर्वक उल्लेख केल्याचे सांगितले जात होते. सिकंदराबादमध्ये होणाऱ्या राष्ट्रीय कार्यकारिणीसाठी भाजपच्या मंत्र्यांसह ३०० नेते हैदराबादमध्ये येणार असून अनेक भाग्यलक्ष्मी देवीच्या दर्शनासाठी मंदिराला भेट देण्याची शक्यता आहे.