लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
मुंबई : भारतीय जनता पक्ष (भाजप) महाराष्ट्रात किमान १५५ जागा लढविण्यावर ठाम आहे. त्यातच शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेसलाही (अजित पवार) अधिक जागा हव्या असल्याने ‘महायुती’चे जागावाटप रखडले आहे. महायुतीत काही जागांवर वाद असून जागावाटपाचा हा तिढा भाजप पक्षश्रेष्ठींच्या मध्यस्थीनंतरच सुटण्याची चिन्हे आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली भाजपच्या केंद्रीय संसदीय मंडळाची बुधवारी नवी दिल्लीत बैठक होणार असून, विधानसभा निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांची पहिली यादी बुधवारी रात्री उशिरा किंवा गुरुवारी जाहीर होण्याची शक्यता आहे.
विधानसभा निवडणुकीत किमान १२० हून अधिक जागा मिळविण्याचे भाजपचे उद्दिष्ट आहे. त्यादृष्टीने १५५-१६० जागा लढविण्यावर भाजप ठाम आहे. भाजपने १५५-१६० जागा लढविल्यास शिंदे व पवार गटाला १२८-१३३ जागा मिळणार आहेत. शिंदे गटाला ७५-८० आणि पवार गटाला ५३-५८ जागा मिळतील. या दोघांनाही आणखी जागा हव्या असल्याने जागावाटप पूर्ण झालेले नाही. जागावाटपाला चार-पाच दिवस लागतील, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात जागावाटप अंतिम करण्यासाठी दोन-तीन दिवसांमध्ये सलग चर्चा होणार आहेत, त्यावेळी वादाच्या जागांवर भाजप पक्षश्रेष्ठी निर्णय देतील, असे सूत्रांनी सांगितले.
हेही वाचा >>>जाहीरनाम्याऐवजी ‘अंमलबजावणी आराखडा’; भाजपकडून ३० सदस्यांची जाहीरनामा समिती स्थापन
भाजपच्या केंद्रीय छाननी समिती व निवडणूक समितीची नवी दिल्लीत सोमवारी बैठक झाली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय निवडणूक प्रभारी भूपेंद्र यादव, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, केंद्रीय सरचिटणीस विनोद तावडे, देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आदी नेते या बैठकीस उपस्थित होते. भाजपने गेल्या निवडणुकीत जिंकलेल्या आणि कमी फरकाने हरलेल्या जागांबाबतच्या रणनीतीवर चर्चा झाली. त्या ठिकाणच्या काही उमेदवारांची शिफारस संसदीय मंडळास करण्यात आली असून, पहिल्या यादीवर बुधवारी शिक्कामोर्तब होईल. त्यानंतर ही यादी रात्री उशिरा किंवा गुरुवारी जाहीर होईल, असे पक्षातील सूत्रांनी नमूद केले.
सामूहिक नेतृत्वाची पुन्हा सूचना
विधानसभा निवडणुकीत एखाद्या नेत्याच्या मर्जीवर उमेदवारी किंवा राज्यातील महत्त्वाचे निर्णय न घेता सामूहिक नेतृत्वाच्या माध्यमातून बहुमताने निर्णय प्रक्रिया राबवावी, अशी सूचना अमित शहा यांनी दिल्लीतील बैठकीत पुन्हा दिल्याचे सूत्रांनी सांगितले. पक्षाची जाहिरात व प्रचार मोहीम एखाद्या नेत्याभोवती गुंफण्यात येऊ नये, अशी अपेक्षा पक्षश्रेष्ठींनी व्यक्त केली आहे.