मोहनीराज लहाडे
नगरःमहाराष्ट्रातील ज्या १४ लोकसभा मतदारसंघावर भाजपने लक्ष केंद्रित केले आहे, त्यामध्ये नगरमधील शिर्डी या राखीव लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे. शिर्डी मतदारसंघ ‘शत प्रतिशत भाजप’ करण्यासाठी पक्षाने यापूर्वीच संघटनात्मक पातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. आता दुसऱ्या बाजूने त्याला विकास योजनांची जोड देत शिर्डी मतदारसंघाची बांधणी करत हा मतदारसंघ भाजपला अनुकूल करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. शिर्डीच्या विकासासाठी निर्माण केले जाणारे सेतू थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी निगडित ठरत आहेत. त्यातूनच नगर आणि शिर्डी मतदारसंघाचे महत्त्व भाजपासाठी अधोरेखित ठरत आहेत.
हेही वाचा >>> काँग्रेसचा आणखी एक बालेकिल्ला ढासळला, अमूल डेअरीवर भाजपाची सत्ता
साईबाबा देवस्थानमुळे शिर्डी मतदारसंघाकडे जागतिक पातळीवरून लक्ष असते. सुरुवातीला शिर्डी मतदारसंघ समृद्धी महामार्गाने जोडण्यात आला. नागपूर ते मुंबई या ७०१ किमी. लांबीच्या महामार्गाच्या पहिला टप्प्याचे, नागपूर ते शिर्डी या ५२० किमी. महामार्गाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात करण्यात आले. त्यानंतर गेल्याच आठवड्यात मुंबई ते शिर्डी म्हणजे ‘वंदे भारत रेल्वे’ची सुरुवातही करण्यात आली. त्याचेही उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. पंतप्रधानांच्या हस्ते झालेल्या या दोन्ही कार्यक्रमांचे थेट प्रक्षेपण शिर्डीसह नगर मतदारसंघात ठिकठिकाणी भाजपकडून करण्यात आले होते. आता नुकतेच शिर्डीच्या विमानतळावरील ‘नाईट लँडिंग’ला परवानगी देण्यात आली आहे. गेल्या सहा वर्षांपासुन हा प्रश्न प्रलंबित होता. त्यामध्येही पंतप्रधान मोदी यांनी लक्ष घातले होते. पंतप्रधान मोदी आणि शिर्डी मतदारसंघासाठी सुरू होणाऱ्या योजना लक्षात घेतल्या म्हणजे भाजपने शिर्डी मतदारसंघावरील लक्ष केंद्रित केल्याची बाब लक्षात येते.
आता पुढील एक-दीड महिन्यात निळवंडे प्रकल्पाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्याचा घाट घातला जात आहे. त्यासाठी मोदी यांना शिर्डी मतदारसंघात निमंत्रित करण्याचे प्रयत्न महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी सुरू केले आहेत. निळवंडे प्रकल्प हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प समजला जातो. दीर्घकाळापासून रेंगाळलेल्या या प्रकल्पाचे काम जवळपास आता पूर्ण होत आले आहे. केवळ उद्घाटनाची प्रतीक्षा आहे. संपूर्ण शिर्डी लोकसभा मतदारसंघाला प्रकल्पाच्या पाण्याचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे सिंचन क्षेत्रात मोठी वाढ होणार आहे. त्याचे श्रेय घेण्याची प्रयत्न भाजपने सुरू केले आहेत.
हेही वाचा >>> उद्धव ठाकरे यांच्यापुढे आता पर्याय कोणते?
हा मतदारसंघ तसा काँग्रेसचा, पूर्वीचा नाव कोपरगाव. पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांचे वडील स्व. बाळासाहेब विखे यांचा हा परंपरागत मतदारसंघ. त्यांनी दीर्घकाळ या मतदारसंघातून लोकसभेची प्रतिनिधित्व केले. बाळासाहेब विखे नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाकडे सरकल्यानंतर, १९९६ मध्ये एकदा भाजपने, भीमराव बडदे यांच्या रूपाने विजयही मिळवला होता. सन २००९ मध्ये मतदारसंघांच्या फेररचनेनंतर तो शिर्डी राखीव झाला. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनीही या मतदारसंघातून निवडणूक लढवली. मात्र त्यांचा पराभव झाला. ही निवडणूक राज्यभर गाजली. आठवले या पराभवाबद्दल विखे यांना जबाबदार धरतात. काँग्रेसच्या भाऊसाहेब वाकचौरे यांनी त्यांचा पराभव केला. नंतर या मतदारसंघातून शिवसेनेचे सदाशिव लोखंडे नशीबवान ठरले.
शिर्डीत भाजपकडून या मतदारसंघात ‘शत प्रतिशत भाजप’ योजना संघटनात्मक दृष्टीने राबवण्यास सुरुवात करण्यात आली आहे. शक्ती केंद्र, बूथ केंद्र तयार केले जात आहेत. केंद्रीय मंत्री प्रल्हादसिंग पटेल यांची मतदारसंघ प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यांनी आत्तापर्यंत तीन दौरे करत मतदारसंघात मुक्काम केला. केंद्रीय योजनांच्या लाभार्थ्यांशी थेट संपर्क सुरू केला आहे. जुन्या भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांना सक्रिय केले जात आहे. महसूल मंत्री विखे व लोकसभा मतदारसंघाचे प्रभारी म्हणून आ. डॉ. राहुल आहेर यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आली आहे. वयोश्री योजनेतून शेकडो लाभार्थी बांधले जात आहेत.
केवळ भाजपच नव्हे तर रा. स्व. संघ परिवारातील, भाजपसलग्न बजरंग दल, विश्व हिंदू परिषद आदी संघटनाही शिर्डी लोकसभा मतदारसंघात सक्रिय झाल्या आहेत. त्याचे पडसाद राहुरी तालुक्यात पहावयास मिळाले. परिवारातील केंद्रीय सामाजिक समरसता मंचचे प्रमुख देवजी रावत यांनीही या मतदारसंघात दौरा करत लक्ष घातले आहे.
हेही वाचा >>> भाजपची काँग्रेस होईल ही भीती फडणवीस यांना का वाटते?
शिर्डी लोकसभा मतदारसंघात अकोले, संगमनेर, कोपरगाव, राहता, श्रीरामपूर व राहुरी या सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. त्यातील राहता वगळता इतर सर्व मतदारसंघात, दोन काँग्रेसचे व तीन राष्ट्रवादीचे, असे विरोधी आमदार आहेत. संगमनेरमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे भाचे व ‘पदवीधर’ मतदारसंघातील नवनिर्वाचित आमदार सत्यजित तांबे यांची भाजपशी जवळीक निर्माण झाली आहे. विरोधकांचे प्राबल्य असलेल्या मतदारसंघाला विविध योजनातून बांधण्याचा प्रयत्न भाजपने सुरू केला आहे. सध्या या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे सदाशिव लोखंडे यांनी एकनाथ शिंदे यांना साथ दिली. हा मतदारसंघ जरी शिवसेनेशी जोडला गेला असला तरी भाजपने या मतदारसंघात वर्चस्व निर्माण करण्याचे पद्धतशीर प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे खासदार लोखंडे कोणता पर्याय स्वीकारतात, याकडे मतदारांचे लक्ष राहणार आहे.