लोकसभा निवडणुकीच अयोध्येमध्ये राममंदिर बांधण्याची स्वप्नपूर्ती झाल्याबद्दल भाजपने देशभर रामाच्या नावाने मते मागितली होती. पण राममंदिराचा भाजपला लोकसभा निवडणुकीत फायदा झाला नाही. यामुळेच बहुधा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपला रामाचा विसर पडला असावा. भाजपची फौजच प्रचारात उतरली असली तरी एकाही नेत्याने आतापर्यंत राम किंवा राममंदिराचे नावही घेतलेले नाही. लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या केंद्रस्थानी राममंदिराचा मुद्दा होता. पण ज्या आयोध्येवरून देशाचे राजकारण तापले तेथे भाजपचा पराभव व्हावा आणि समाजवादी पक्ष जिंकावा हे विचार करण्याजोगे आहे. अयोध्येतील समाजवादी पक्षाच्या विजयामागे स्थानिकांचा भाजपवरील रोष कारणीभूत होता. वाराणसीतून जिंकलेल्या पंतप्रधान मोदी यांचे मताधिक्य शिरुरमधून जिंकलेल्या आमच्या अमोल कोल्हे यांच्यापेक्षा कमी आहे. आपण मतदारांना कमी लेखतो. त्यांना गृहित धरतो. वातावरण, समाजमाध्यांमातील चर्चेत वाहून जातो. त्यामुळे स्थनिक परिस्थिती, वस्तुस्थिती काय आहे याकडे आपले लक्ष नसते हे लोकसभा निवडणुकीत स्पष्ट झाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महागाई, बेरोजगारी मुख्य मुद्दे

राज्यातील विधानसभा निवडणुकीत महागाई आणि बेरोजगारी हे मुख्य मुद्दे आहेतच. प्रचारादरम्यान राज्यभरात फिरल्यानंतर महागाई आणि बेरोजगारीवरून जनतेमध्ये प्रचंड अस्वस्थता असल्याचे प्रकर्षाने जाणवते. सोयाबीन, दूध, कांदा, कापूस अशा शेतपिकांच्या हमीभावाचा प्रश्नही गंभीर असून त्यावरून सरकार विरोधात शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. शिक्षण महाग झाले आहे. पण त्यातुलनेत लोकांच्या वेतनात वाढ झालेली नाही. ही चिंताजनक बाब आहे. निवडणुका येतील, जातील पण राज्यातील आर्थिक गंभीर स्थिताचा विचार होणे गरजेचे आहे. लोकांमध्ये असंतोष, अस्वस्थता वाढत असून त्यावर विचार होणे गरजेचे आहे. महिला सुरक्षिततेचा मुद्दाही गंभीर आहे. एकूणच राज्यातील महत्वाचे आणि गंभीर प्रश्न मतदारांपर्यंत पोहचविण्यात आम्ही यशस्वी ठरलो असून लोकांमधील ही अस्वस्थता मतदानातून व्यक्त होईल.

हेही वाचा:खोटे कथानक निवडणुकीत चालणार नाही!

लाडकी बहीण आणि संजय गांधी निराधार योजनांमध्ये फरक नाही

लाडकी बहीण योजनेची वेळ आणि सरकाचा उद्देश पाहिल्यास लोकसभेतील पराभवामुळेच सरकारला लाडक्या बहिणींची आठवण झाली हे स्पष्टच आहे. देशात काँग्रेस सरकारच्या काळात कित्येक वर्षापासून संजय गांधी निराधार योजना सुरू आहे. संजय गांधी निराधार योजना आणि लाडकी बहीण योजनेत फारसा फरक नाही. गरीब कष्टकऱ्यांसाठी अशा योजना हव्यात. रेवडी संस्कृतीवर सर्वाधिक टीका करणाऱ्या पंतप्रधान मोदी यांच्या भाजपशासित राज्यांमध्येच अशा योजनांचा सुळसुळाट आहे. दिल्लीत अरविंद केजरीवाल यांनी वीज, शिक्षण, आरोग्याच्या योजना जशा राबविल्या, तशा योजना हव्यात. पण त्याबाबत सर्वंकष चर्चा व्हायला हवी अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

‘महाराष्ट्राची सगळ्यात लाडकी बहीण मी आहे’

मी सोन्याचा चमचा तोंडात घेऊनच जन्मल्याचे अजित पवार यांनी जाहीर केल्याने आपण या योजनेत बसत नाही. लाडकी बहीण योजनेत आम्ही महिलांना दरमहा तीन हजार रुपये देण्याचे आश्वासन दिले आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि माजी वित्तमंत्री जयंत पाटील यांनी विचारपूर्वक हे आश्वासन दिले आहे. या दोन्ही नेत्यांनी अभ्यास करून हे आश्वासन दिले आहे. वित्तीय नियोजन करून महिलांच्या भत्त्यात वाढ केली जाईल.

हेही वाचा:लक्षवेधी लढत: शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी वादाचा दुसरा अंक

महायुतीत अधिक बंडखोरी

महाविकास आघाडीत जागावाटप तसेच उमेदवारी अर्ज दाखल करण्यावरून गोंधळ झाला किंवा परस्परांच्या विरोधात उमेदवार उभे केले, अशी टीका केली जाते. पण महायुतीतही तोच प्रकार झाला आहे. मुख्यमंत्री शिंदे हे अजित पवारांवर तर अजित पवार मुख्यमंत्र्यांवर कुरघोडी करतात. जाहीर भाषणांमधून परस्परांची उणीदुणी काढतात. अजित पवारांचा पक्ष सरकारी योजनेत मुख्यमंत्र्यांचे नाव घेत नाही. दौंड, भोर, पुरंदर, शिरुर या मतदारसंघातच महायुतीचे उमेदवार परस्परांच्या विरोधात लढत आहेत.

अजित पवारांना आता फडणवीसांचे मार्गदर्शन

भाजप आणि शिवसेना (शिंदे) गटाने एकत्र राहावे. आपल्यात अजित पवार नको, अशी चर्चा असेल तर त्याचे उत्तर देवेंद्र फडणवीस यांनाच विचारावे. अजित पवार भाजप आणि शिवसेनेबरोबर (शिंदे) आहेत. देवेंद्र फडणवीस म्हणतात, अजित पवार आताच आमच्यात आलेत. हळूहळू आमचे शिकतील. म्हणजे अजित पवार यांनी मार्गदर्शन सुरू झालेले आहे. अजित पवार भाजपबरोबर जाताना त्यांना मुख्यमंत्री मिळणार आहे, म्हणून जात असल्याचे सांगितले जात होते. सध्या तरी चित्र वेगळे दिसते.

हेही वाचा:लक्षवेधी लढत: माजी मंत्री राजेश टोपे यांची कसोटी

देवेंद्र फडणवीस संगतीमुळे बिघडले

‘बटेंगे तो कटेंगे’, ‘एक है तो सेफ है’, च्या घोषणा देण्याशिवाय त्यांच्याकडे कोणता कार्यक्रम नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदीं किंवा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घोषणा करणे समजू शकतो. पण देवेंद्र फडणवीस यांनी या घोषणा करणे अपेक्षित नव्हते. देवेंद्र फडणवीसांनी खरोखर महाराष्ट्राच्या जनतेला निराश केले आहे. ते विरोधी पक्षनेते, मुख्यमंत्री आणि आता दोन पक्ष फोडूनही उपमुख्यमंत्री झाले आहेत. ते अभ्यासू नेते आहेत. पण त्यांना संगत चांगली मिळाली नाही, चुकीच्या संगतीमुळे ते बिघडले आहेत. फडणवीसांनी मागील विधानसभा निवडणुकीत अजित पवारांनी ७० हजार कोटी रुपयांचा भष्ट्राचार केल्याचा आरोप केला आणि त्यावर विधानसभेची निवडणूक लढविली होत आणि आता त्या विषयावर ते गप्प आहेत. फडणवीस हे सुसंस्कृत असावेत हा माझा समज होता.

ईडी, सीबीआयला घाबरून मराठी मातीशी गद्दारी केली

ईडी, सीबीआयला घाबरून अनेक जण भाजपमध्ये गेले किंवा महायुतीत गेले आहेत. भाजप रोज आमच्या पराभवासाठी प्रयत्न करीत आहे. आमच्यात राजकीय मतभेद असले तरीही वैचारिक बैठक चांगली होती, राजकीय विरोधकांसोबतही आमचे मैत्रीचे संबंध होते. ही वैचारिक प्रगल्भता कुठे गेली. महाराष्ट्राराच्या राजकारणात आता कटुता आली आहे. ईडी, सीबीआयला घाबरून भाजपबरोबर गेलेल्यांनी मतदारसंघातील लोकांशी, मराठी लोकांशी, मातीशी गद्दारी केली आहे. संजय राऊत, अनिल देशमुख तुरुंगात जाऊन आले आहेत. आता त्यांच्यावरील आरोपात काहीही तथ्य नाही, हे सर्वांसमोर आले आहे. ज्यांनी काय चुका केल्या नाहीत, त्यांना घाबरण्याची गरज काय ? ज्यांनी गद्दारी केली, त्यांना पाडलेच पाहिजे कारण त्यांनी लोकांशी गद्दारी केली आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp forget ram says supriya sule at loksatta loksamvad print politics news css