चंद्रशेखर बोबडे
नागपूर : आता भाजपशी सलगी दाखवणारे शिंदे गटातील रामटेकचे अपक्ष आमदार आशीष जयस्वाल यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्याच अधिकृत उमेदवाराचा पराभव केला होता. त्यामुळेच भाजप कार्यकर्त्यांनी जयस्वाल यांचा समावेश शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळात नको, अशी भूमिका घेतल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांच्या संभाव्य मंत्र्यांच्या नावांची चर्चा सुरू झाली असताना शनिवारी जयस्वाल यांच्या रामटेक विधानसभा मतदारसंघातील भाजप कार्यकर्त्यांनी जयस्वाल यांना मंत्री करू नका, अशी मागणी करून नव्या वादाला तोंड फोडले आहे.
सेना बंडखोर आमदारांच्या गटात सर्वांत शेवटी सहभागी होणारे आशीष जयस्वाल हे चाणाक्ष राजकारणी म्हणून ओळखले जातात. १९९९ ते २००९ अशा विधानसभेच्या तीन निवडणुका त्यांनी शिवसेनेकडून लढवल्या व जिंकल्या. या १५ वर्षांत मतदारसंघात भाजप वाढू नये याची त्यांनी दक्षता घेतली. यासाठी कधी काँग्रेस तर कधी राष्ट्रवादीची मदत घेतली. २०१४ मध्ये युती तुटल्याने दोन्ही पक्ष स्वतंत्र लढले. यावेळी जयस्वाल यांचा भाजपने पराभव केला होता. त्यामुळे त्यांचा भाजपवर राग होता. त्यानंतर २०१९च्या निवडणुकीत भाजप-सेना युती असतानाही जयस्वाल यांनी भाजप उमेदवाराच्या विरोधात बंडखोरी करीत अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. या निवडणुकीत जयस्वाल यांनी भाजप उमेदवाराचा पराभव केला. त्यामुळे स्थानिक भाजप नेत्यांचा जयस्वाल यांच्यावर रोष आहे.
शिंदे सरकारबाबत सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी नाही
पूर्वाश्रमीचे शिवसैनिक, ज्येष्ठता आणि फडणवीस यांच्याशी असलेली जवळीक या माध्यमातून जयस्वाल यांनी शिंदेंच्या मंत्रिमंडळात संधी मिळावी म्हणून मोर्चेबांधणी सुरू केली आहे. ते मंत्री झाल्यास सर्व प्रथम मतदार संघात भाजपला संपवण्यासाठी प्रयत्न करतील, अशी भीती कार्यकर्त्यांना आहे. त्यामुळेच त्यांनी जयस्वाल मंत्री नको, अशी जाहीर भूमिका घेतली आहे. दरम्यान भाजपकडून आपल्याला विरोध होऊ शकतो. याची पूर्वकल्पना जयस्वाल यांना असावी. त्यामुळेच त्यांनी गुवाहाटीत जाण्यापूर्वी फडणवीस यांना फोन केला होता, असे माध्यमांना सांगून स्थानिक भाजप कार्यकर्त्यांचा रोष कमी करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, भाजप पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन जयस्वाल यांना मंत्रिपद देण्यास विरोध दर्शवून अजून त्यांचा रोष कमी झाला नसल्याचे दाखवून दिले. फडणवीस मुख्यमंत्री असताना २०१८ मध्ये शिवसेनेच्या कोट्यातून जयस्वाल यांची खनिकर्म महामंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली होती. ठाकरे सरकारच्या काळात ती कायम होती. सरकार कोसळल्यानंतरही ते अध्यक्ष आहेत. या महामंडळातील भ्रष्टाचाराबाबत यापूर्वी काँग्रेस नेत्यांनी आरोप केले होते. आता भाजप पदाधिकाऱ्यांनीही याचा पुनरुच्चार केला. याशिवाय धान खरेदी, वाळूचे अवैध उत्खननासह अनेक आरोप जयस्वाल यांच्यावर आहेत. त्यामुळे मतदारसंघातील भाजपचा विरोध जयस्वाल यांना मंत्रिपदापासून दूर ठेवणार की शिंदें-फडणवीस यांच्याशी असलेली जवळीक त्यांना तारणार हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.