अकोला : बंजारा समाजाच्या मतपेढीसाठी अखेरच्या क्षणी भाजपने महंत बाबुसिंग महाराज राठोड यांना विधान परिषदेवर संधी दिली आहे. या माध्यमातून भाजपने बंजारा समाजाला जवळ करण्याचा प्रयत्न केला आहे.
निवडणुकीसाठी मतदारांमधील विविध घटकांना आकर्षित करण्याचे राजकीय नेत्यांचे प्रयत्न असतात. लोकसभा निवडणुकीत महायुतीला अपेक्षित यश मिळाले नाही. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपसह महायुतीतील घटक पक्ष सतर्क झाले. राज्यात मोठ्या संख्येने असलेल्या बंजारा समाजाच्या मतपेढीवर सर्वच पक्षांचा डोळा आहे. यासाठी भाजपने तर विशेष रणनीती आखली. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, गोवा आदींसह अनेक प्रांतामध्ये दहा कोटीच्यावर लोकसंख्या असलेल्या बंजारा समाजाचे धार्मिक स्थळ म्हणून तीर्थक्षेत्र पोहरादेवीला मोठे महत्त्व आहे. त्यामुळे वाशीम जिल्ह्यातील पोहरादेवी विकास आराखडा हाती घेण्यात आला. पोहरादेवी येथे उभारलेल्या नंगारा वास्तू संग्रहालयाचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते ५ ऑक्टोबरला लोकार्पण केले. युती सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना या भवनाला मंजुरी मिळाली होती. सहा वर्षांमध्ये काम पूर्ण करून विधानसभा निवडणुकीच्या समोर नंगारा भवनाचे पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण झाले. आता पोहरादेवी येथील बंजारा समाजाच्या गुरूगादीचे पीठाधीश महंत बाबुसिंग महाराज राठोड यांची भाजपच्या कोट्यातून विधान परिषदेवर वर्णी लावण्यात आली आहे. बंजारा समाजामध्ये महंत धर्मगुरु बाबुसिंग महाराज यांचे मानाचे स्थान आहे. यांच्या शब्दाला वजन आहे. हे सर्व लक्षात घेता निवडणुकीत त्यांच्या वलयाचा लाभ करून घेण्यासाठी भाजपने त्यांना विधान परिषदेवर घेतले. निवडणुकीत भाजपची ही रणनीती काही मतदारसंघांमध्ये तरी निर्णायक ठरू शकते, असा राजकीय जाणकारांचा अंदाज आहे.
हेही वाचा – राळेगावमध्ये दोन माजी मंत्री समोरासमोर
महंत बाबुसिंग महाराज यांची पार्श्वभूमी काय?
बंजारा समाजाच्या गुरूगादीचे पीठाधीश धर्मगुरू संत रामराव महाराज यांचे निधन झाल्यावर त्यांचे वंशज महंत बाबुसिंग महाराज गोरपीठाची परंपरा चालवित आहेत. महंत बाबुसिंग महाराज हे संत रामराव महाराज यांचे पुतणे आहेत. रामराव बापू महाराजांच्या इच्छेनुसार बाबुसिंग महाराज यांना गादीचा वारसदार ठरविण्यात आले असून धर्मपीठाधीश्वर म्हणून सर्वानुमते मान्यता दिली. प्रेमसिंग महाराज यांचे बाबुसिंग महाराज हे चिरंजीव आहेत.
हेही वाचा – जेवणात थुंकी, लघवी मिसळल्यास आता तुरुंगवास होणार; योगी सरकारचा नवीन अध्यादेश काय आहे?
बंजारा समाजाची महत्त्वपूर्ण भूमिका
राज्यात विदर्भ, मराठवाडा, खान्देश आदी भागात बंजारा समाजाच्या मतदारांची मोठी संख्या आहे. २८८ पैकी सुमारे ४५ मतदारसंघात बंजारा समाजाची भूमिका निर्णायक ठरू शकते, असे समाजातील जाणकार व अभ्यासकांचे मत आहे. समाजाची गठ्ठा मतपेढी लक्षात घेता महायुतीने त्यासाठी मोर्चेबांधणी केली. बंजारा समाजाचे श्रद्धास्थान पोहरादेवी येथे विकासात्मक कार्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी दिला. बंजारा समाजाच्या प्रमुख मागण्यांमध्ये ‘बार्टी’च्या धर्तीवर ‘वसंतराव नाईक संशोधन व प्रशिक्षण संस्था’ वनार्टी स्थापन करण्याच्या मागणीला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. आता महंत बाबुसिंग महाराज यांना विधान परिषदेवर संधी देण्यात आली आहे.