नवी दिल्ली: भाजपची देशव्यापी सदस्य नोंदणी मोहीम २ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या काळात टप्प्याटप्प्याने केली जाणार आहे. या मोहिमेचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फेरसदस्यत्वाचे नोंदणीपत्र राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या हस्ते देऊन केले जाईल, अशी माहिती मंगळवारी राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
जम्मू-काश्मीर, महाराष्ट्र, हरियाणा व झारखंड या राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक होत असल्याने या राज्यांना वगळून ही मोहीम राबवली जाईल. त्यासाठी १० लाख कार्यकर्त्यांना एका दिवसाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. दर पाच-सहा वर्षांनी सदस्य नोंदणीचा कार्यक्रम राबवला जातो. या वेळी सुमारे १० कोटी नवे सदस्य नोंदणी करण्याचे भाजपचे लक्ष्य आहे. २०१४ मध्ये ११ कोटी सदस्य तर, २०१९ मध्ये ७ कोटी नवे सदस्य पक्षाशी जोडले गेले होते.
हेही वाचा : मुंबईतील २२ जागांवर ठाकरे गटाचा दावा
भाजपने उपलब्ध करून दिलेल्या फोन क्रमांकावर ‘मिस्ड कॉल’ देऊन वा ‘नमो अॅप’ तसेच, भाजपच्या संकेतस्थळावर सदस्यत्वाची नोंदणी करता येऊ शकेल, असे तावडे यांनी सांगितले. ही सदस्य नोंदणी मोहीम पूर्ण झाल्यानंतर संघटनात्मक अध्यक्षांची नियुक्ती केली जाईल व त्यानंतर नव्या राष्ट्रीय अध्यक्षाची नेमणूक केली जाईल, असे तावडे यांनी सांगितले.
© The Indian Express (P) Ltd